शाळेसोबतच निसर्गात रमणारा निसर्गशिक्षक मिलिंद गिरधारी

मी दहावीत असताना मला शाळेत इंग्रजी विषय शिकविण्यासाठी श्री गुलाब सपकाळ नावाचे एक शिक्षक बदली होऊन शाळेत आले. माझ्यासाठी आणि शाळेतील अनेक विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षक म्हणजे नवी जीवनदृष्टी देणारे जीवन शिक्षण देणारे शिक्षक ठरले. एकच वर्ष ते मला शिकवायला होते खरे पण त्यांचा प्रभाव आजही माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांवर आहे.

गडकिल्ले, भ्रमंती, गिर्यारोहण, वनस्पती, झाडे, झुडपे इत्यादीं तसेच या सर्वच क्षेत्रात काम करणा-या दिग्गज मंडळींसोबत नुसती ओळख नाही तर चक्क खुप जवळुन सहवास मला लाभला तो देखील माझ्या या शिक्षकांमुळेच.

एक शिक्षक काय करु शकतो, त्याने काय केले पाहिजे, कसे जीवन जगले पाहिजे याचे सपकाळ सर म्हणजे जिवंत उदाहरण होय. त्यांनी निवृत्त होऊन अनेक वर्षे झाली आता. मी देखील संसारात पडलो, मुले झाली. मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने अनेक खाजगी तसेच सरकारी शाळांमधील शिक्षकांशी संबंध आला. खाजगी शाळा तर शिक्षणाच्या बाजारपेठा झालेल्या असल्याचे दुःखद चित्र सर्रास पहावयास मिळाला. पैशासाठी भुकेलेल्या या शाळा व या शाळांचे मालक विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची भुक निर्माण करु शकत नाहीत. चुकून एखाद्या विद्यार्थात अशी भुक असेलच तर तिचे शमन करण्याची क्षमता अशा शाळांमध्ये नाहीये. परिक्षेमध्ये मार्क्स मिळविणे, त्यासाठी स्पर्धा वाढविणे यावरच सर्व शिक्षण व्यवस्थेचा सध्या जोर आहे यात कुणाचेही दुमत असु नये.

हल्ली हल्ली सपकाळ सरांसारखे निष्ठावान शिक्षक दिसणे, भेटणे , कार्यरत असलेले पाहणे म्हणजे अशक्य गोष्ट आहे असा माझा समज पक्का होत चालला होता. सध्या विद्यार्थीकेंद्रीत शिक्षक भेटणे अवघड होत चालले आहे. आता सर्वकाही पैसा, सुखोपभोग, ऐषोआराम व शहर केंद्रीत आहेत. काही कर्मचारी राहतात शहरांमध्ये व नोकरी असते गावखेड्यांत. यांची स्वतःची मुले कधीही सरकारी शाळांमध्ये शिकत नाहीत. ज्या कामासाठी आपण मोठाले पगार घेतो ते विद्यार्थी आपल्या जीवनाचे केंद्र नाहीयेत याची खंत तर सोडाच पण साधी जाणीव देखील अनेकाना नसते. यांना केवळ शासकीय निकषांनुसार काम करायचे असते. सोप्या भाषेत केवळ पाट्या टाकण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. ब-याच जणांचे नोकरीसोबत एखाद दुसरे व्यवसाय देखील असतात, कुणी पत्रकारिता करते तर कुणी जमिनींचे व्यवहारामध्ये दलाली करतात. कुणाला निव्वळ प्रसिध्दी मिळविण्यात स्वारस्य असते तर कुणाला केवळ दिखावा करण्यात समाधान वाटते.

दरवर्षी मी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण, निसर्ग संरक्षण, संवर्धन, प्रबोधन यामध्ये काम करणा-या अपरिचीत तरीही उलेखनीय काम करणा-या एका व्यक्तिचे कार्य , चरित्र लेख स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न करतो. या वर्षी कुणाविषयी लेख लिहावा हे अगदी शेवटपर्यंत ठरवता आलेच नव्हते कारण निसर्गशाळेच्या कामात जवळजवळ मागील महिना गेला. वादळ, अवकाळी पाऊस, त्यामुळे झालेले नुकसान, दुरुस्ती, नवीन झाडे लावण्यासाठीची खड्डे घेण्याची तयारी, रोपवाटीका बनविण्यासाठी पिशव्या खत-मातीने भरणे अशी अनेक कामे करण्यात बरेच दिवस तिकडेच गेले.

गेली अनेक वर्षे मी सोशल मीडीयावर सक्रिय आहे. यात प्रामुख्याने झाडे, झुडपे, वनस्पती आदींविषयी माहिती मिळविणे, स्वतःकडे असलेली माहिती देणे असे मी करीत असतो. सुरुवातीच्या काळात अनेकदा मला वनस्पतींच्या नावांबाबतीत प्रश्न पडायचे. हे प्रश्न मी झाडा-झुडपांचे , पानांचे , फुलांचे फोटो सहीत फेसबुक वरील दुमिळ वनस्पती या ग्रुप वर पोस्ट करायचो. यावर मला अनेक उत्तरे मिळायची. अनेकजण त्यात्या भागात त्या वनस्पतीला काय म्हणतात म्हणजे स्थानिक नावे काय आहेत आदी माहिती द्यायचे. अशी उत्तरे देणा-यांमध्ये एक नाव वारंवार दिसायचे. उत्तरे देताना एका ठराविक साच्यात, पध्दतशीर पणे वनस्पतीची माहिती ते द्यायचे. यात मुख्य म्हणजे वनस्पती शास्त्रीय नाव, स्थानिक नाव व काही गुणविशेष अशी माहिती देण्याची पध्दतीमध्ये सातत्य असणारी पध्दत होती. मला स्वतःला स्थानिक नावानी वनस्पतींची ओळख लवकर लक्षात राहते, किंबहुना वनस्पतीशास्त्रीय नाव मला क्वचितच लक्षात राहते. पण ही व्यक्ति मात्र फक्त माझ्याच प्रश्नावर उत्तर देत नाही तर कुणीही सह्याद्रीतील अगदी कोणत्याही झाडा-झुडपाची माहिती विचारली तरी ही व्यक्ति माहिती द्यायचीच द्यायची. सतत सतत कमेंट मध्ये त्यांचे नाव दिसु लागले. हळु हळु हे नाव इतके परिचयाचे झाल्यासारखे झाले की जोपर्यंत त्यांचे उत्तर येत नाही तो पर्यंत नाव निश्चिती मी करीत नसे. यांनी सांगितले म्हणजे १००% सत्य व अचुकच अशी माझी खात्री झाली. त्यांचे नाव म्हणजे श्री मिलिंद गिरधारी.

हे नाव वाचले की माझ्या समोर जे चित्र उभे राहायचे त्यात श्री मिलिंद गिरधारी म्हणजे कुणी वनस्पती शास्त्रज्ञच असावेत असे होते. या वर्षाचा लेख मिलिंद गिरधारी यांच्या काम व अनुभवावर लिहिण्याचे मी निश्चित केले आणि त्यांना फोन केला. त्यांच्या फोन वर बोलण्यास सुरुवात केल्यावर लागलीच त्यांच्याकडुन हे समजले की ते वनस्पती शास्त्रज्ञ , किंवा वनस्पती शास्त्राचे अध्यापक वा विद्यार्थीदेखील नाहीत. वनस्पतीशास्त्राचा व मिलिंद सरांचा शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणात लांब लांब पर्यंत ही संबंध नाहीये. आणि माझ्या साठी अजुन एक आश्चर्याची बाब अशी समजली की मिलिंद गिरधारी हे पेशाने शिक्षक आहेत. ते ही एका दुर्गम खेडेगावातील सरकारी प्राथमिक दोन शिक्षक असणा-या शाळेत ग्रामीण मुलांना शिकविण्याचे काम करतात.

शिक्षकांविषयी माझी असलेली धारणा मिलिंद सरांसोबत होणा-या पुढील गप्पांमध्ये सपशेल उध्द्वस्त होणार होती. विद्यार्थीकेंद्री शिक्षक आजही आहेत, ज्ञानकेंद्री, जिज्ञासु, स्वतः शिकत राहणारे शिक्षक आजही आहेत, भलेही संख्येने खुपच कमी असतील पण आजही आशेचे हे किरण मला दिसले त्यामुळे मला अतिशय आनंद झाला.

एका शिक्षकाने कसे असावे, कसे शिकवावे, कसे रहावे, कसे वागावे, कसे बोलावे, कसे चालावे हे सर्वच्या सर्व मिलिंद सरांकडुन शिकण्यासारखे आहे. आपल्या शिक्षकांसारखेच आपण देखील व्हावे अशी अंतःप्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये आपोआपच निर्माण होते ती अशा शिक्षकांच्या असण्यानेच. विद्यार्थी शिक्षकांचे अगदी अंधानुकरण करतात त्यामुळे शिक्षकाचे प्रत्येक वर्तन, प्रत्येक शब्द खुपच काळजीपुर्वक व्यक्त व्हायला हवा. मी वर म्हंटल्यांप्रमाणे बहुतांश लोकं पालक व शिक्षक देखील सध्या भौतिक सुखोपभोगालाच सर्वस्व मानुन काम करताना दिसतात व त्याचाच परिणाम नागरिक देखील असेच घडत आहेत. मिलिंद सरांसारखे अपवाद मात्र ‘दिप दिपसे जलाकर’ जीवनाचे, जीवन जगण्याचे आदर्श की जे वर्तमान काळाला सुसंगत आहेत असे घालुन देत आहेत. परिणामी त्यांचे विद्यार्थी देखील अशाच तत्वांवर आधारीत जीवन यापन करण्याकडे कललेले नसतील तरच नवल.

खरतर मिलिंद सर शिक्षक आहेत हे समजल्यावर व त्यांचे संपुर्ण काम समजुन घेतल्यावर मला एक प्रश्न पडला तो असा की यांच्या विषयी लिहिण्यासाठी पर्यावरण दिन हे निमित्त चांगले की शिक्षक दिन हे निमित्त अधिक चांगले? पण पर्यावरण दिनादिवशी अशाच व्यक्तिविषयी लिहिले तर दुधात साखर टाकल्यासारखे होईल हे निश्चित.

यांचे पुर्ण नाव देखील विशेष आहे बर का मित्रांनो. मिलिंद माधवराव गिरधारी. नाव, वडीलांचे नाव व आडनाव ही तीनही नावे कृष्णाचीच नावे आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि निसर्ग यांची जवळीक सर्वच भारतीयांना ठाऊक आहे. श्रीकृष्ण, रुक्मिणी इंद्र व पारिजाताची कथा आपणास माहिती आहेच. तसेच गोवर्धनाच्या आधारे गोकुळवासियांचे रक्षण करुन गोकुळवासीयांना स्थानिक इकोसिस्टीम चे महत्व पटवुन सांगुन, निसर्गपुजक करणा-या कान्होबाचीच तीन ही नावे असल्याने अथवा योगायोगाने म्हणा पण मिलिंद सरांमध्ये अगदी लहाणपणापासुन निसर्गात तसेच रानावनात भटकण्याची आवड निर्माण झाली होती. गावाकडील राहते घर ते शाळा असे चार किमी चे अंतर पायी चालुन जाणा-या छोट्या मिलिंदला शाळेतील शिक्षणापेक्षा रानावनातील निसर्गाची शाळाच जास्त आवडायची. त्यामुळे शाळेकडे जाणारी कधी अनेकदा रानावनांत संपायची. शाळेला बहुतांश दांडी मारुनच रानवाटा तुडवायचा छोटा मिलिंद. अगदी तेव्हा पासुन त्यांना झाडाझुड्पांची , रानफळांची, फुलांची ओळख झाली. निसर्गाशी मैत्री झाली.

वाहेगाव या अतिशय दुर्गम गावातील प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेऊन पुढच्या शिक्षणासाठी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे ते आले. निसर्गाच्या शाळेच्या सततच्या हजेरीमुळे व चार भींतींच्या शाळेतील गैरहजेरीमुळे साहजिकच मिलिंद अभ्यास कच्चा राहिला. त्यातही विशेष गणित व विज्ञान हे विषय त्याला जरा जास्तच जड जात.  दहावीच्या परिक्षेमध्ये तर मिलिंद चक्क नापास झाला. पण जिद्द , चिकाटी व नियती पहा अशी आहे की नोकरीत स्थिर झाल्यानंतर मिलिंद सर माझ्यासारख्या अनेकांस वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक वाटावे इतका त्यांचा वनस्पती शास्त्राचा (विज्ञानातील एक शाखा) अभ्यास झाला. हा सर्व अभ्यास त्यांनी केला तो ही कसल्याही लौकिक अभ्यासक्रम न करताच केला हे देखील कौतुकास्पद आहे.

गणित आदी विषयात गती नसल्याने अकरावीला विज्ञान शाखेला प्रवेश मिळु शकला नाही . कला शाखेत प्रवेश घेऊन दोन वर्षे मन लावुन अभ्यास केला आणि पुढे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. पदवी शिक्षण सुरु असतानाच बारावीच्या आधारवर डी एड अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचा शासन निर्णय झाला. त्यामुळे बी ए मध्यात सोडुन डी एड ला प्रवेश घेतला. डी एड झाल्यानंतर वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षीच मिलिंद सरांना सरकारी नोकरी मिळाली. यथावकाश विवाह झाला. पदोन्नती, पगारवाढ सर्व होत असतानाही सुखात, आरामात जीवन जगण्याचे, म्हणजेच सेटल होऊन उपभोग घेण्याचे दिवस असतानादेखील, की जे आपण सर्रास पाहतो, मिलिंद सरांनी ज्ञानदानासोबतच अर्धवट सोडलेल्या ज्ञानार्जनाला देखील पुनः सुरुवात केली. कला शाखेतील राहिलेली पदवी घेतली. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतले. हैद्राबाद येथील एका संस्थेतुन इंग्लिश या विषयातील देखील उच्च शिक्षण घेतले. एवढे करुनही त्यांचे समाधान होईनासे झाले आणि त्यांनी बी एड हा अभ्यासक्रम देखील पुर्ण केला. कोणताही शिक्षक, शिक्षक तोपर्यंतच असतो जोपर्यंत तो स्वतः शिकत असतो, सतत स्वतःला अद्ययावत करीत असतो. ज्ञानाची भुक त्याची कधीच संपत नाही तो खरा शिक्षक. आणि असेच शिक्षक समाजात सकारात्मक बदल घडवुन आणण्याची क्षमता बाळगतात.

मिलिंद सरांची बालपणातील रानोमाळ भटकंतीची आवड शिक्षणाच्या व नोकरीच्या सुरुवातीच्या काळात अधिक प्रगत झाली. त्यांनी गडकिल्ले भटकायला, अभ्यासायला सुरुवात केली. डोंगर द-या पालथ्या घालणे हा जणु त्यांचा शाळेव्यतिरिक्तचा वेळ घालवण्याचा एक कलमी कार्यक्रमच झाला. पायाला भिंगरी बांधुन ते भट्कु लागले. नंतरच्या काळात या भिंगरीने सायकलचे रुप घेतले. ही भिंगरी अजुनही सरांना शांत बसु देत नाही. सुटीचा दिवस मिळाला की ही भिंगरी फिरु लागते. कधी ५० किमी तर कधी १०० किमी सायकल चालवुन एखादा डोंगर, किल्ला, दरी ला भेट द्यावी व तेथील झाडझुडपांचे, पशु पक्ष्यांचे, किटकिटकांचे फोटो काढावेत. फोटोंचा संग्रह करावा, जेणेकरुन त्याच्या नोंदी होतील व पर्यावरण संरक्षण संवर्धनामध्ये या कामाचा कुठेतरी उपयोग होईल. गेली दहा-पंधरा वर्षे त्यांचे हे भटकणे सुरु आहे. या भटकंतीमध्ये सरांच्या नेहमी सोबत असतात ते म्हणजे डॉ किशोर पाठक व श्री पंकज शक्करवार. हल्ली बहुतांश भटकंती सायकलच होत असते तरी कधीकधी खुपच दुरवर जायचे असेल तर डॉक्टरांची चारचाकी घेऊन ही मंडळी निघतात. आधुनिक मोबाईल की ज्यामध्ये चांगले कॅमेरे असतात ते बाजारात आल्यापासुन व तसा एक विकत घेतल्यापासुन त्यांच्या या छंदाने नवनवीन उच्चांक प्रस्थापित केले.  स्वामीनाथन आयोगाचे श्री स्वामीनाथन यांचे केंब्रिज विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या एका महान पुस्तकात मिलिंद सरांनी मोबाईल द्वारे टिपलेले चक्क २९ दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पतींचे फोटो छापले आहेत. वनविभागा मार्फत देखील संकलित करण्यात आलेल्या एका पुस्तकात मिलिंद सरांचे फोटो वनविभागाने सरांच्या संमतीने छापले. फोटोग्राफीची ही आवड आता एका वेगळ्या उंचीवर गेली आहे. यांच्या या छंदात पक्ष्यांचे किटकांचे, कोळ्यांए, सरपटणा-या प्राण्यांचे फोटो काढणे हे देखील मिलिंदजी निरंतर करीत आले आहेत.  

सुरुवातीच्या काळात मिलिंद सरांना ज्या ज्या वनस्पतींची नावे माहिती नव्हती त्यांची नावे माहिती करुन घेण्यासाठी ते फेसबुक वरील इंडीयन फ्लोरा या ग्रुप वरील तज्ञांची मदत  घेऊ लागले. तज्ञांकडुन मिळालेली माहिती म्हणजे वनस्पतीची ओळख ही वनस्पती शास्त्रीय भाषेत असावयाची. मिलिंद सराना स्थानिक गावाकडीलच नावे काय ती माहिती होती आधी. पण जस जसे फेसबुक वरुन त्यांना नवनवीन वनस्पतींची ओळख होऊ लागली तसे तसे त्यांच्या मध्ये वनस्पतीशास्त्रीय नावे शिकण्याची इच्छा बळ धरु लागली. पण वनस्पतीशास्त्राचा आणि त्यांचा दुरान्वयेही संबंध नसल्याने सुरुवातीस हे काम कठीण वाटु लागले. पण ही शास्त्रीय पध्दतच योग्य आहे व अचुक आहे याची देखील त्यांना खात्री झाली. त्यामुळे कठीण जरी असले तरी त्यांनी फेसबुक ग्रुप वर फोटो पोस्ट करणे व उत्तरे मिळविणे सोडले नाही. तसेच इतर कुणीही जरी काही माहिती पोस्ट केली तरी देखील सर ती माहिती मन लावुन वाचीत असत. काही काळाने त्यांना वनस्पती शास्त्रीय भाषा, परिभाषा समजु लागली, उमजु लागली. या परिभाषेत एकुण सहा वेगवेगळ्या वर्गीकरणाच्या पाय-यांद्वरे वनस्पती ओळख ठरते.

फोटो काढताना अनेकदा कसरत करावी लागते

किंगडम – विभाग
क्लास – वर्ग
ऑर्डर – गण
फॅमिली – कुल
जीनस – प्रजाती
स्पीसीज – जाती

खरतर वनस्पतीशास्त्राशी कसलाही संबंध नसलेल्या नवख्या माणसाला हे सर्व पचने अवघड आहे, अगदी वनस्पती शास्त्राच्या विद्यार्थ्यांना देखील हे काम महा कठीण आहे. बरीच वर्षे अभ्यास करुन देखील नुसते फोटो पाहुन वनस्पतींची ओळख करणे दुरापास्त आहे. मिलिंद सरांनी मात्र हे आव्हान स्वीकारले, व सातत्यपुर्ण अभ्यासाने पेलले देखील. गुगल च्या मदतीने त्यांनी ब-यापैकी ज्ञानार्जन केले. सहा सात महिन्यांमध्ये सरांना वनस्पतींना नावे देण्याची, ओळख करण्याची, वर्गीकरण करण्याची पध्दत समजली. नंतर सरांनी स्वतःच्या फेसबुक अकाऊंट वर स्वतःला आढळुन आलेल्या वनस्पतींच्या माहितीच्या पोस्ट करण्यास सुरुवात केली. यामाहिती मध्ये ते वनस्पती शास्त्रीय नावे तर देत होते सोबतच स्थानिक नावे , प्रचलित पारंपारिक उपयोग, थोडक्यात पानाफुलांबाबत, झाडाचे खोड, मुळे, फुले, फळे याविषयी सविस्तर माहिती देऊ लागले. यामुळे झाले असे की निसर्ग पर्यावरणाची, झाडे, फळबागावाले, गार्डन, नर्सरी चालविणारे, अभ्यासक या सर्वामध्ये मिलिंद सरांची ओळख वनस्पतींचा एनसायक्लोपीडीया अशी निर्माण झाली. मी देखील अनेकदा अनेक अनोळखी वनस्पतींची माहिती त्यांना विचारली आहे. सरांना केवळ फोटो पाठवायचा आणि मिलिंद सर लागलीच सविस्तर माहिती लिहुन पाठवतात. माझ्या सारखेच अनुभव अनेकांना आले आहेत.

श्री मिलिंद गिरधारी यांचे कौतुक केवळ वनस्पतीशास्त्रीय नावे मुखोद्गत आहेत म्हणुनच नाहीये बर का मित्रांनो. तर हे ज्ञान मिळविण्यामागची त्यांची प्रेरणा, हेतु हे उदात्त आहेत हे देखील लक्षात घेतले पाहिजे. प्रत्यक्षात इतके ज्ञान, माहिती जर कुणाकडे असेल तर स्वाभाविक करीयर साठी अजुन एक शिडी कुणीही करुन घेऊन विषयातील लौकिक पदवी ,डॉक्टरेट घेतील. पण सरांच्या मनाला असा विचार शिवला देखील नाही. याचे कारण त्यांच्या शिक्षणामागची त्यांची प्रेरणा निसर्गाप्रती असलेले त्यांचे प्रेम आहे. त्या प्रेमातुनच, आपुलकीतुनच त्यांनी हे सारे ज्ञान अर्जित केले व मुक्त हस्ताने इतरांना देत देखील आहेत. सध्या सोशल मीडीयावर शिकण्यासाठी तसेच अनेकांना शिकविण्यासाठी मिलिंदजींचे दोन ते तीन तास जातात. कधी कधी घरातील मंडळी विशेषतः पत्नी सोशल मीडीयावर जाणा-या सरांच्या वेळा विषयी नाराजीचा सुर काढते पण अंतरी त्यांना देखील ठाउक असतेच की हे काम चांगले आहे.  सरांच्या जीवनातील अजुन एक महत्वाची आणि रंजक बाब अशी मिलिंदजीच्या घरी अद्याप टीव्ही नाहीये. अवती भवतीच्या लाखो घरांमध्ये टिव्ही असताना, घराघरातुन टिव्हीच्या येणा-या आवाजाची घरघर असताना सरांचेच घर मात्र एकटे असे आहे की जिथे टिव्ही नाहीये. वर्तमान पत्र वाचणे, आणि सोशल मीडीयावर निसर्ग प्रेमाचे धडे गिरविणे व इतरांकडुन गिरवुन घेणे हाच तो त्यांचा फावल्या वेळातील कार्यक्रम. मिलिंदजी गमतीने म्हणतात फेसबुक हे एक विद्यापीठच आहे. त्यावर अफाट ज्ञान आहे. तुमच्याकडे ते वाचण्याची क्षमता हवी व संयम हवा. आपणास जे काही मिळवायचे आहे त्यावरुन दृष्टी हलवता कामा नये. सोशल मीडीयावर व्यवधाने, आकर्षणे देखील अनेक आहेत. ही दुधारी तलवार आहे. तुम्हाला जर माहिती असेल ही तलवार चालवायची कशी तर त्यातुन तुम्ही स्वतःचा विकास नक्की करुन घेऊ शकता, असे ही मिलिंदजी अगदी सहज बोलुन गेले.

त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी त्यांचा जिल्हा व परिसरातुन नामशेष होत चाललेल्या वृक्ष, वनस्पतींचे काम हाती घेतले आहे. अनेक दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींची झाडे शोधुन त्यांचा फुला-फळाम्चा हंगाम समजुन घेऊन, वारंवार भेटी देऊन अशा दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पती, वृक्ष, वेलींचे संवर्धनाचे काम सुरु आहे. प्रवीण मोगरे व रोहित ठाकुर हे साथीदार अशा बीज संकलनाच्या कामात नेहमीच सरांसोबत असतात. या मंडळींचा उत्साह काय प्रचंड असतो म्हणुन सांगु.. एखाद्या लहान मुलास रानमेवा सापडल्यावर जसा आनंद व्हावा व त्यने नाचावे अगदी तस्से ही मंडळी दुर्मिळ झाडांच्या बीया सापडल्यावर नाचतात. या कामामध्ये आवर्जुन उल्लेख करावा अशा काही गोष्टी खालील प्रमाणे आहेत.

मोखा व पाडळ या प्रजातींची रोपे पहिल्यांदाचा (अद्याप कुणीही याची बनविली नाहीत) बनविण्यात त्यांच्या टीम ला यश मिळाले.  याप्रमाणेच त्यांनी सोनसावर ची रोपे देखील बनविण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश मिळाले नाही. शेवटी नाशिकहुन त्यांनी २१ रोपे मागविली व शहरातत विविध ठिकाणी लावली व जगविली. कळंब हे देखील असेच या प्रदेशातुन लुप्त होत चालेले झाड त्यांनी संवर्धित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शहरातील त्यांनी लावलेले कळंबाचे झाड म्हणजे अख्ख्या शहरातील केवळ दुसरेच झाड होय, ज्याची उंची आता बारा फुटंपेक्षा जास्त झाली आहे.  वायवर्ण नावाच्या प्रजातीचे झाड देखील असेच या भागातुन संपुष्टात येण्याच्या मार्गावर होते.  केवळ बॉटॅनिकल गार्डन मध्येच यापुर्वीचे एक झाड होते. मिलिंद सर व त्याम्च्या चमु ने वायवर्ण ची पुन्हा एकदा लागवड केली या दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातीच्या संवर्धनातील पहिले यशस्वी पाऊल टाकले. प्रदेशात सोनसावर हे देखील त्यांनी लावलेले व असलेले पहिलेच झाड होय.  संपुर्ण जिल्ह्यात कौशी या प्रजातीची रोपण देखील पहिल्यांदाच केले गेले सरांच्या मार्फत. ही सर्व दुमिळ होत चाललेली झाडे-झुडपे आहेत. सरांकडे तयार झालेली रोपे, बिया अनेक ठिकाणी पोहोचली व अनेक ठिकाणी जगली व वाढली देखील आहेत. साता-यात अनेक दुर्मिळ अजिंक्यतारा किल्ल्यावर असलेल्या , वाढवलेल्या डॉ उमेश कळंबेळकरांच्या देवराईत देखील सरांनी पाठविलेली अनेक रोपे वाढली आहेत. सलाई, अजाणवृक्ष ही त्यांनी तयार केलेली एक रोपे तर चक्क मध्यप्रदेशात दिमाखात वाढत आहेत. ही रोपे तयार करणे जिकिरीचे काम आहे. त्यासाठी आधी झाडे शोधावी लागतात, सापडली नाहीच तर इतर कुणाकडुन तरी बीया मिळावाव्या लागतात. पिशव्या, मोठ्या बादल्यांमध्ये रोपण, त्यांची चांगली वाढ होऊन मग ही रोपे जमिनीत लावण्यास तयार होतात. हे खुप संयमाचे काम आहे.

सरांची टीम देखील खुप उत्साही लोकांची आहे. शिवशंकर चापुळेंनी दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी सीडबॅंक उभारण्यात पुढाकार घेतला आहे. ही सीडबॅंक आता मागेल त्यास स्वखर्चाने बिया पाठवित आहेत. रोहीत ठाकुर व प्रवीण मोगरे यांनी दुर्मिळ वनस्पतींची अव्यावसायिक रोपवाटीका उभारण्यात मोलाचे योगदान दिले आहे. येत्या मोसमात दोन हजार झाडे लावण्यासाठी पिशव्या खत आणि माती भरुन तयार आहेत. सराम्च्या टीम मध्ये किशोर पाठक नावाचे डॉक्टर देखील आहेत. डॉक्टर सृष्टी संवर्धन संस्थेमार्फत वन्य जीवांना जीवनदान देण्याचे काम करीत आहेत. साप, पक्षी यांना नागरीवस्तीमधुन वाचवणे, प्रसंगी उपचार करणे व पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे असा यांचा कार्यक्रम. हे माणसांचे डॉक्टर असले तरी जखमी पशु पक्ष्यांवर ते सराईत पणे उपचार करतात. मिलिंद सर देखील या कामात नेहमीच डॉक्टरांसोबत असतात.

रोहित ठाकूर यांच्या घराजवळील नर्सरी..फोटो मध्ये रोहित ठाकुर व व प्रवीण मोगरे

ज्या शाळेत सर शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत त्या गावात सर्वात पहिल्यांदा जर कुणाच्या हस्ते झाड लागले गेले असेल तर ते म्हणजे श्री मिलिंद गिरधारी.  शाळेच्या परिसरात सरांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने ३५ विविध प्रजातींची झाडे लावली. आता ही सर्वच्या सर्व झाडांनी साधारण १२ ते १४ फुट उंची गाठली आहे. गावातील लोकांमध्ये निसर्ग पर्यावरणाविषयी जागरण करण्याचे काम देखील मिलिंद जी सातत्याने करीत आहेत. या भागात रंग बदलणारा सरडा आढळतो. या सरड्याविषयी ग्रामीण लोकांमध्ये अनेक गैरसमजुती होत्या. जसे हा विषारी आहे, डोळ्यांवर फुंकर मारुन माणसाला मारतो इत्यादी. या गैरसमजांमुळे हा सरडा दिसला की लागलीच लोक त्याला मारुन टाकीत. सरांनी आधी विद्यार्थी व मग ग्रामस्थ अशा सर्वांचे प्रबोधन केले. त्यांचे विद्यार्थी देखील आता या सरड्याचे रक्षणकर्ते झाले आहेत. गावात कुठे असा सरडा दिसला तर विद्यार्थी त्या सरड्यास आता जीवनदान मिळविण्यासाठी ग्रामस्थांना साकडे घालतात. ही मुले-मुली लिलया या सरड्याला हाताळतात अगदी न घाबरता. सरांचे विद्यार्थी देखील निसर्ग, पर्यावरण संरक्षण संवर्धनामध्ये आत्तापासुनच जमेल तसे काम करु लागले आहेत. घर-अंगण- परसबागेत मुले आवडीने झाडे लावतात, जगवितात. बीज संकलनाच्या मोहिमा हाती घेतात व बीज संकलन करुन सरांमार्फत योग्य रोपवाटीकेपर्यंत पोहोचवितात. जाता येता मुलांना एखादे नवीन्च झाड-झुडूप दिसले तर लगेच मुलांना सांगतात . मग सर देखील मुलांइतक्याच उत्साहाने ते झाड पहायला जातात. अशाच एका प्रसंगात मिलिंदजींना राजस्थानचे राज्य फुल चक्क महाराष्ट्रातील फुलंब्री मध्ये आढळले. हा देखील एक शोधच आहे. हे असे सर्व होत असताना आपसुकच साहजिकच ही मुले प्रौढ होतील तेव्हा ती पर्यावरणाबाबत अधिक संवेदनशील , जबाबदार झालेली असतील. एका शिक्षकाच्या कामाची हीच सर्वात मोठी पावती आहे,. बरोबर ना?

शाळेतील मुलांना सरड्याविषयी माहिती देताना

बर सर नुसते निसर्गच शिकवितात असे नाही बरका मुलांना. दोन शिक्षकी शाळेत सरांकडेच मुख्याध्यापक पदाचा देखील कार्यभार आहे. शाळेत रुजू झाल्यावर त्यांनी शाळेत अद्ययावत संगणक संच, फ्लॅट टिव्ही संच असे अनेक साहित्य ग्रामपंचायतीकडुन उपलब्ध करवुन घेतले. गावात कधी वासुदेव आला तर सर आवर्जुन त्या वासुदेवास शाळेच्या प्रांगणात अथवा वर्गखोलीत बोलावतात व गाणे गाण्यास सांगतात. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी सर सदैव झटत आहेत.

मिलिंद सरांचे काम कसल्याही गाजावाजा शिवाय सुरु आहे. त्यांना अजुनही अनेक गोष्टी करावयाच्या आहेत. त्यातील एक जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी , वन अधिकारी, कृषि अधिकारी यांच्या मदतीने सुरु देखील झाले आहे. ते म्हणजे कास पठाराच्या धरतीवर संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील काही माळरानांवर वर्षायु (सह्याद्रीतील प्रदेशनिष्ट) फुलांच्या बियांची लागवड करण्याचा कार्यक्रम. या प्रकल्पामध्ये मिलिंद सर वनस्पतींची व बियांची ओळख करण्याचे काम करीत आहेत. काल म्हणजे चार जुन लाच शेवटची बॅच ओळखण्याचे काम त्यांनी केले. शासकीय यंत्रणेला मिलिंदजींवर व त्यांच्या ज्ञानावर असलेला विश्वास यातुन दिसतो.  

शहरात असलेल्या वृक्ष परिचय केंद्राच्या निर्मितीमध्ये देखील मिलिंद सर सक्रिय आहेत. या वृक्ष परिचय केंद्रातील काही विदेशी झाडे त्यांनी समुळ काढुन टाकली व त्या जागी देशी झाडे लावली आहेत. या कामात सरांना विशेष मदत होते ती न्यायालयीन कर्मचारी श्री विश्व पालखेडकर तहसीलदार श्री प्रवीण पांडे यांची. या परिचय केंद्रात एकेकाळी काही मोजकीच विदेशी झाडे होती, व तीच सर्वत्र फैलावली होती. आता या केंद्रात २०० प्रकारची देशी झाडे आहेत. तसेच  वन खात्यामार्फत पुर्वी लावल्या गेलेल्या ग्लिरीसिडीया या परदेशी झाडांच्या जागी देशी झाडे लावण्याचे काम देखील वन खात्यासोबत लवकरच हाती घेनार आहेत. जलसहयोग संस्थेच्या श्री प्रशांत गिरे यांना मिलिंद सरांच्या कल्पना आवडल्याने त्यांनी संस्थेमार्फत दुर्मिळ वनस्पती, झाडे लावण्याचे काम त्यांच्याच सुचनांप्रमाणे हाती घेतले.

वृक्षपरिचय केंद्रातील Arboretum कौशी, वरून, सोनसावर, गुग्गुळ , सफेद कुडा ,

भविष्यात मिलिंद सरांना काही ठराविक प्रकल्प हाती घ्यायचे आहेत. सर म्हणतात की हे प्रकल्प एक प्रकारे पथदर्शी प्रकल्प असतील की ज्यातुन अनेक जणांना प्रेरणा मिळावी, निसर्गशिक्षण मिळावे. हरीतक्षेत्रातील शासकीय जमिनीवर एक छोटे जंगल बनविण्याचे त्यांचे ध्येय आहे. ज्या शाळेत ते शिकवितात तेथे देखील असेच वृक्ष परिचय केंद्र व जैवविविधता केंद्र सुरु करण्याची त्याम्ची इच्छा आहे. या केंद्रावर शेतक-यांस औषधी वनस्पतींची शेती कशी करावयाची या विषयीचे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. वृक्ष परिचय केंद्रासोबतच वनपुष्पांचे देखील एखादे परिचय केंद्र, अभ्यास केंद्र सुरु व्हावे असे त्यांना वाटते.

अजुनही बरेच काही लिहिता येईल मिलिंद सरांविषयी. मनुष्याने समाधानी राहुन आपल्या हातुन शक्य तितके सत्कर्म करीत रहावे हाच संदेश त्यांच्या एकंदरीत जीवनशैलीतुन आपणास मिळतो. मी त्यांना सहज विचारले की सर तुमचे स्वतःचे घर आहे आता आणखी पुढे स्वतःसाठी काही मिळविण्याची, कमाविण्याची तुमची इच्छा आहे का? तर ते म्हणाले की आता स्वतःसाठी अजुन काही मिळवायचे बाकी नाहीये. जोपर्यंत नोकरी आहे तोपर्यंत इमाने इतबारे काम करायचे व नंतर अधिकाधिक वेळ निसर्ग संरक्षण संवर्धनात द्यायचा.   

सरांना असे वाटते निसर्गसंरक्षण व संवर्धानाच्या या कार्यात आपण अधिकाधिक ‘आपली’ झाडे लावली वाढविली पाहिजेत. आपल्या भाषेचा आपणास अभिमान असतो, संस्कृतीचा असतो तर मग झाडांचा जंगलांचा का असु नये? आपली झाडे म्हणजे देशी झाडे जगविली, वाढविली तर आणि तरच आपल्या येथील पर्यावरणाचा होत असलेला –हास थांबेल.

जनसहयोग संस्थेच्या माध्यमातून केलेल्या वृक्षारोपणा दरम्यान सोनसावर ची 20 झाडे लावण्यात आली
धनंजय मिसाळ यांना सलाई बनात लावण्यासाठी सोनसावरची दोन रोपे सुपूर्द करताना
सह्याद्री सीड बँकेसाठी बिया संकलित करून पोच करताना
विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभाग उद्यानात विभाग प्रमुख यांचे हस्ते सोनसावर लावताना
शेवरा Alysicarpus या वनस्पती वर संशोधन करणारे प्राध्यापक श्री दिलीप पोकळे सर त्यांचे Genus Alysicarpus In India हे पुस्तक सप्रेम भेट देतानाचा क्षण
प्रत्यक्ष लेखकाकडुन सप्रेम भेट स्वरुप मिळालेले पुस्तक आणखी एक पुस्तक
Facebook Comments

Share this if you like it..