जग विविध समस्यांनी ग्रासले आहे. ग्लोबल वार्मिंग, भयंकर साथीचे रोग, अनारोग्य, मनुष्याची कमी होत चाललेली रोग प्रतिकारक शक्ति, विषमिश्रीत अन्न, कमी होत जाणारी जंगले, नष्ट होत जाणा-या पशु पक्ष्यांच्या प्रजाती, सॄष्टीचा बिघडत चाललेला समतोल, वाढती लोकसंख्या अशा या समस्यांची यादी न संपणारी आहे. अनेक प्रगत देशांनी त्यांच्या त्यांच्या भुभागात या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. व त्या प्रगत देशांना लागणा-या सर्व वस्तुं, धन-धान्य, भाज्या, मांस यासाठी अधिक करुन अप्रगत अथवा प्रगतीशील देशांवर अवलंबुन रहावे लागत आहे. भारत हा तसाच प्रगतीशील देश. पण आपण प्रगतीचे मापदंड जे पाश्चात्य चष्म्यातुन पाहतो आहोत काय ते योग्य आहे? प्रगती म्हणजे नक्की काय?
मला काही वर्षांपुर्वी हा गोपाळ भोर च्या अतिदुर्गम, मावळ भागात एका डोंगरावर दिसला. याचे नाव गोपाळ नव्हते. तर हा गाई म्हणजे गो-धन पाळतो म्हणुन गोपाळ. आपल्या कडे पुर्वी असे गोपाळ गावोगाव असायचे. या गोपाळाकडे पाहुन जर तुम्हाला असे वाटते का की हा गोपाळ अप्रगत आहे? बीसेक गाई, पाच सहा बैलं अस गोधन असलेला हा व्यक्ति आनंदी नाहीये दिसत नाहीये का? आनंदासोबतच संगीत या कलेचा तो साधक देखील आहे. पोट व्यवस्थित भरले असेल तर आणि तरच मनुष्याला छंद वगैरे सुचतात. आणि गम्मत पहा या व्यक्तिला दिवसाचा सगळाच वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवण्यास मिळतो. आणि आरोग्य देखील तुम्ही पाहु शकताच. याचे वय तेव्हा साधारण पंचेचाळीस च्या आसपास असावे. ज्या डोंगरावर आम्हाला तो भेटला तो रायरेश्वराच्या पश्चिमेकडे जाण-या डोंगररांगेतील रायरेश्वरनंतर सर्वात उंच डोंगर होता. आम्हाला भेटला त्याच्या काही वेळच आधी गोपाळ त्या ऊंच डोंगरावरुनच खाली आला होता. पण त्याच्या चेह-यावर थकवा तर नव्हताच उलट तो खुपच चपळ व उत्साही दिसत होता. तो सुखी दिसत ही होता आणि तो खरच सुखी होता सुध्दा. अजुनही सुखीच असेल अशी खात्री आहे कारण त्याची जीवनशैली निसर्गाला अनुसरुन आहे.तुमच्याकडे चैनीची किती साधने, तुमच्याकडे किती पैसा शिल्लक आहे, तुमचे घर किती मोठे आहे, भौतिक सुविधा देणारी व श्रम कमी करणारी साधने तुमच्या असणे तुमच्यासाठी कमी महत्वाचे असुम अशी साधने जे बनवितात त्यांच्यासाठी ते जास्त महत्वाचे आहे. अशा साधनांमुळे आपण आपल्यातील आनंदी राहण्याची मुलभूत क्षमता गमावुन बसलो आहोत.प्रगतीशील हा टप्पा पार करण्याच्या नादात आपण , आपल्यापाशी हे काही होते तेच गमावुन बसलो आहोत. हल्ली असे गावाकडे राहणे व गाई-गुरे सांभाळणे म्हणजे मागास असल्यासारखे गावागावातील तरुणांना वाटु लागले आहे.प्रगतीकडे जाणारा आजकालच मार्ग जर विषारी अन्न देणार असेल, गावागावांच्या बाहेर येणा-या रस्त्याच्या कडेला प्लास्टिक कच-याचे ढिग तयार करणार असेल, अनारोग्य देणार असेल, जंगले कमी करणार असेल, निसर्गाचा समतोल बिघडवणार असेल तर काय आपणास अशी प्रगती खरच गरजेची आहे का? प्रगतीची व्याख्या भारतासाठी नव्याने करण्याची गरज आहे, आनंदाची, सुखाची व्याख्या नव्याने करण्याची गरज आहे; असे आपणा प्रत्येकास वाटु नये का?खरतर आधुनिक मनुष्य म्हणुन आपण उत्तरोत्तर अधिक प्रगल्भ होत गेले पाहिजे होते. काही अंशी ही प्रगल्भता दिसते आहे देखील. कधी नव्हे इतकी सुरक्षितता आज आपण अनुभवतो आहोत. युध्दे लढाया लुटमारीचे दिवस गेले आहेत. स्वतःचे पोट भरण्यासाठी उघडउघड कुणी दुस-याला लुबाडणे होत नाहीये. कायदे नियम, लोकशाही तत्वांच्या आधारावर मनुष्याचे जिवीत, मुलभूत अधिकार अधिकाधिक सुरक्षित कसे करता येईल यावर अख्ख्या जगातील विचारवंताचे एकमत होऊ लागले आहे. असे होत असताना आपण अजुन एक पाऊल पुढे जात जगाला एक मंगल विकासाची दिशा देऊ शकतो. एकट्या मनुष्याचे जीवन सुरक्षित केल्याने काहीच होणार नाही, उलट मनुष्य नावाची प्रजातीच , संपुर्ण निसर्गासहीत अधिक जास्त गर्तेत जात आहे हे आपण जगाला दाखवुन दिले पाहिजे. आणि आपणच हे करु शकतो व केले पाहिजे कारण आपण गोपाळांच्या संस्कृतीचे वारस आहोत. चराचराच्या मंगलकामनेशिवाय आपली प्रार्थना पुर्ण होत नसायची, आजही होत नाही! म्हणुन आपणच आहोत की जे सा-या जगाला हे सांगु शकेल की मनुष्याचे जीवन निसर्गाशिवाय, निसर्गातील प्रत्येक घटकाशिवाय अपुर्ण आणि अंधकारमय आहे.कालानुरुप बदल करीत, नव्या युगाला साजेसे तरीही सनातन व सदा सत्य अशा जीवनमुल्यांवर आधारीत आपली जीवनशैली आपण बनविली पाहिजे. भलेही आज प्रत्येकाला गोपाळ होता नाही येणार, २४ तास निसर्गाच्या सान्निध्यात नाही घालवता येणार. पण आपल्या अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी देखील वसुंधरेच्या व मानवजातीच्या हितासाठी खुप महत्वाच्या व परिणामकरक सिध्द होऊ शकतात. भारतातील एक प्राध्यापक श्री सोनम वांगचुक यांनी सुरु केलेल #livesimply हे आंदोलन! तुमची प्रत्येक चैनीची वस्तु निसर्गाला हानी पोहोचवण्याच काम करतेय. त्यामुळे साधेपणा अंगी आणने , गरजा कमी करणे हा एक परिणामकारक उपाय यावर होऊ शकतो. गरजा कमी करणे याचा अर्थ असा नाहीये की पायताणं परिधान करणेच सोडुन द्यायच. तर आपले पायताणं जास्तीत जास्त वर्षे आपण वापरले पाहिजे. विशेषतः आपल्या देशात तर अशा आंदोलनाची व असे ‘गरजा कमी करणारांची’ नितांत आवश्यकता आहे , कारण आपल्या कडे जुन्या पायताणांचा पुनर्वापर, रिसायकलींग अद्याप ही होत नाहीये. एकदा माझ्या एका मित्राने गप्पांमध्ये बोलता बोलता माझ्या विषयी एक कमेंट पास केली. तो म्हणाला की हेमंत अरे आपण तीन वर्षांपुर्वी भेटलो होतो तेव्हापासुन मी तुझ्या अंगात प्रत्येक ट्रिपला हाच टी-शर्ट पाहतोय. कपड्यांवर खर्च कर थोडा! अनावधानाने का होईना पण माझ्याकडून ‘गरजा कमी करण्याचा’ प्रयत्न सुरु झाला होता. मग मी जाणतेपणी हे सुरु केले. माझ्याकडील एक धावण्याच्या बुटांचा जोड मी गेली दहा वर्षे वापरीत आहे. अनेकदा चांभाराकरवी त्याची दुरुस्ती करुन घेतली आहे. मागील वर्षी तो खुपच खस्ता झाला. तेव्हा मी नवीन जोड विकत घेतला, पण तो जुना अजुनही आहे तसा मी ठेवला आहे. चांभार पुन्हा आला की एकदा प्रयत्न करुन पहायचा नीट होतोय का ते! हे असे छोटेछोटे प्रयत्न आपल्या दैनंदिन गरजांच्या बाबतीत आपण नेहमीच केले पाहिजे. आपल्या कामाने किंवा उपभोगाने या निसर्गाची कमीतकमी अथवा काहीही हानी होणार नाही यासाठी सजग होण्याची वेळ आली आहे. अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करु शकतो. उदा – प्लास्टीकचा मर्यादीत वापर ; हळुहळू प्लास्टीक वर्ज्य करणे. वीजेचा वापर गरजेपुरताच करणे, म्हणजे चैनीसाठी वीजेचा वापर करण्याचे टाळणे. खरतर अशा अनेक छोट्या छोट्या दैनंदिन जीवनातील गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण खुप मोठे काम करु शकतो. तुम्ही अवश्य थोडा विचार करा व अशा कोणकोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण अगदी सहज आचरणात आणु शकतो, त्या आवर्जुन मला सांगा.भारताने म्हणजेच आपण सर्वांनीच, तुम्ही, मी , आपण प्रत्येकानेच; आपापल्या परीने प्रगती व आनंदाची नवीन व्याख्या, आपल्या प्राचीन चिरंतन सनातन तत्वांच्या आधारे बनविली पाहिजे. या गोपाळाचे जीवन असामान्य नाहीये. असे जीवन आपल्याकडे अगदी सामान्य गोष्ट होती. असे जीवन जगण्यासाठी साधु-संत अथवा पीएचडी घेतलेला विचारवंत व्हायची गरज नाहीये. फक्त एकच तत्व समजुन घेतले पाहिजे की आपल्या कोणत्याही कामाने निसर्गास कमीतकमी अथवा काहीही नुकसान होणार नाही. निसर्गाच्या -हासाशिवाय प्रगती शक्य आहे.गोपाळ गोपाळ असे मी ज्याच्या विषयी बोलतोय तो नक्की कोण, कसा दिसतो , कुठे आहे असे प्रश्न एव्हाना तुम्हाला पडले असतीलच. खालील लिंकवर क्लिककरुन हा गोपाळ अवश्य पहा व ऐका त्याचा सुमधुर पावा देखील! याच लेखात तुम्हाला हा गोपाळ देखील दिसेल. अवश्य पहा व ऐका या गोपाळाला !
http://www.nisargshala.in/sahyadri-western-ghats-camping-near-pune/
Nice