वेल्हे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित कसे करता येऊ शकते?

star gazing near pune

पुणे शहरापासुन अगदी हाकेच्या अंतरावर असणारा आपला तालुका निसर्गदत्त अनंत देणग्यांची खाण आहे. पावसाळी मोसमात देशात सर्वात जास्त पाऊस पडणा-या स्थळांमध्ये मुळशी-वेल्हा दरवर्षी पहिल्या एक दोन स्थानांवरच असतो, मागील वर्षी तर मुळशीतील ताम्हिणी अभयारण्य परिसरात चेरापुंजी पेक्षाही जास्त पावसाची नोंद आहे. मुळशीत मोजमापाची सोय , दुर्दैवाने आपल्याकडे नाहिये. या सोबतच आपला भाग जगातील सर्वात जुन्या अशा पश्चिम घाटाच्या माथ्यावर वसलेला असल्याने, जगातील अत्यंत दुर्मिळ होत चाललेल्या अशा जैवविविधतेचे देखील घर आहे.

राजगड, तोरणा, लिंगाणा, मढेघाट, उफांड्या घाट तसेच असंख्य घाटवाटांनी समृध्द असलेला आपला परिसर आत्ताच्या घडीला देखील छोट्या प्रमाणात का होईना पण स्थानिकांना पर्यटन व्यवसायाची संधी देत आहेच. पण अजुनही वेल्हे तालुक्याकडे केवळ डोंगर-किल्ले भटक्यांची पंढरी म्हणुनच पाहिले जाते. त्या व्यतिरिक्त मढेघाटावर पावसाळ्यामुळे येणारे पर्यटक का एक रोजगाराचा विषय आहे. पण हा रोजगार शाश्वत नाही. हल्ली काही रीसॉर्ट्स झाले आहेत खरे पण हे सारेच्या सारे रीसॉर्ट्स स्थानिकांच्या किती फायदेचे आहेत हे देखील पाहिले पाहिजे. कित्येक रीसॉर्ट्सतर चक्क दारु पाटर्यांचे अड्डे झाले आहेत. कचरा निर्माण करुन तो तसाच रस्त्याच्या कडेला टाकण्यात या रीसॉर्ट्स चा खुप मोठा वाटा आहे हे विसरुन चालणार नाही.

येणा-या पर्यटकांपैकी बहुतकरुन एका दिवसासाठीच येतात, म्हणजे सकाळी शहरातुन निघायचे व संध्याकाळी रात्रीपर्यंत घरी पोहोचायचे. या एका दिवसाच्या पर्यटनात देखील स्थानिकांना व्यवसाय करण्याची व रोजगार कमाविण्याची संधी मिळते. मका विकणारे, चहा, वडापाव असे रस्त्याच्या कडेला दुकाने, टप-या लावुन व्यवसाय करणारे शेकडोंच्या संख्येत पावसाळ्यात दिसुन येतात. एकुण पर्यटनातुन जो काही व्यवसाय होत असावा त्यामध्ये त्याच्यातील केवळ पाच ते दहा टक्क्यांइतकाच स्थानिक स्थानिकांच्या वाट्यास येतो आहे. आणि तो देखील केवळ पावसाळ्यातील तीन महिनेच. बाकीचे वर्ष पर्यटन व्यवसाय सुरु असतोच पण स्थानिक मात्र यापासुन वंचित राहतो. इथे स्थानिक व बाहेरचा व्यावसायिक असा भेद करणे या लेखाचा हेतु नसुन, ग्रामीण युवकांना नवनवीन रोजगार संधी पर्यटनाच्या माध्यमातुन कशा निर्माण करता येतील या विषयी सविस्तर मांडणी करणे हा आहे, हे लक्षात असु द्यावे.

तर वर्षभर पर्यटन व्यवसाय चालेल यासाठी पुरक वातावरण कसे आहे ते आपण आधी पाहुयात.

शहरापासुन अंतर – सर्वात जवळचे मेट्रोपॉलिटन शहर म्हणजे पुणे. पुणे शहराची लोकसंख्या कित्येक कोटींच्या घरात पोहोचली आहे. पुणे शहरातील मेट्रो पॉलिटन म्हणजे बहुभाषिक, बहुदेशीक, बहुसांस्कृतिक रहिवाशी शहरात नोकरी व्यापार उदीम करतात. सोबतच पुण्याचा असा एक चोखंदळ खर्च करणारा वर्ग आहेच की जो हौशी आहे. या सर्वांना काय केवळ पावसाळ्यातच ‘ब्रेक’ हवा असतो?

बरं, काय फक्त पुणे शहरतीलच लोकांनाच अशा ‘ब्रेक’ ची गरज असते? तर नाही अगदी सगळ्याच शहरातील लोकांना याची गरज असते. त्यातही आपणास मुंबई देखील त्यामानाने खुपच जवळचे व इथे पोहोचण्यासाठी सोयीचे शहर आहे. केवळ मुंबईच नाही तर भारतातील अन्य शहरे देखील आपल्याला आता तशी फारशी दुर राहिलेली नाहियेत. विमान मार्गाने हे भारत, जग खुपच जवळ आले आहे. प्रवासासाठी लागणारा वेळ खुपच कमी झालेला आहे.

आमचे स्वतःचे उदाहरण देतो. आमच्या निसर्गशाळा या निसर्गपर्यटन व्यवसायात आम्हाला असे अनुभव देखील आले आहेत की लोक हैद्राबाद, सोलापुर, मुंबई, दिल्ली, बॅंगलोर, गुजरात, राजस्थान, इतक्या लांबुन देखील खास आमच्या मार्फत दिला जाणारा अनुभव घेण्यासाठी येतात. एकदा तर एक कुटूंब हैद्राबादेतुन चक्क चारचाकी गाडी चालवत आमच्याइथे , केवळ आमच्या पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी आले. अशी अनेक उदाहरणे आहेत.

त्यामुळे शहरापासुनच चे अंतर व लागणारा वेळ या संदर्भात विचार केला तर आपला तालुका अशा पर्यटनासाठी अगदी अनुकूल आहे यात शंका कुणाच्याही मनात नसावी.

पर्यटन गावागावांत पोहोचण्यासाठी काय करावे लागेल?

निसर्ग, कृषि, ग्रामीण संस्कृती, परंपरागत ज्ञान, जैवविविधता, औषधी वनस्पती, रानफुले, रानभाज्या, गावाकडील अस्सल खाद्य संस्कृती, खगोल पर्यटन, साहसी पर्यटन, निसर्गपर्यटन, ग्रामपर्यटन, अशा अनेक प्रकारे आपण पर्यटन विकासाकडे पाहु शकतो.

ता-यांचे गाव!

एक उदाहरण घेऊयात. समजा वेल्ह्यातील एखादे गाव अशा पध्दतीने वसले आहे की त्या गावाला चहुबाजुंनी डोंगरांनी वेढलेले आहे. त्या गावात लोकवस्ती कमीच असुन, रात्रीचा कृत्रिम दिव्यांचा प्रकाश देखील खुपच कमी आहे. अशा गावातील तरुणांनी आकाशातील नक्षत्रांचे जुजबी ज्ञान दिले गेले तर शहरांतुन आवर्जुन पर्यटन पावसाळ्याव्यतिरिक्त देखील केवळ ता-यांनी गच्च भरलेले आकाश पाहण्यासाठी इथे येऊ शकतात. शहरांतील लोकांना, मुलांना उघड्या डोळ्यांनी तारे पहावयास मिळतातच कुठे आजकाल. शहरच काय पण आपल्या गावांकडे ही रात्रीच्या दिव्यांचा झगमगाट इतका जास्त झालेला आहे की वेल्हे सारख्या गावातुन, शिवारांतुन देखील तारे अजिबात दिसत नाहीत. या मध्ये केवळ तारे दाखवणे ही एकच संधी नसुन, मुक्कामाची सोय, जेवण-खाण ची सोय यातुन देखील व्यवसाय संधी उपलब्ध होऊ शकते. ठरवुन काही गावे अशा पध्दतीने विकसित करता येऊ शकतात की ज्या गावांतुन असंख्य तारे दिसु शकतात. जाणिवपुर्वक, वीजेचे दिवे अशा पध्दतीने लावणे की त्यांचा प्रकाश केवळ खाली जमिनीच्या दिशेनेच पडेल व प्रकाश देखील पांढरा नसेल. यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन, सामंजस्याने असे काही निर्णय करावे लागतील. कित्येकदा, फार्म हाऊस बांधणारे लोक, रीसॉर्ट्स बांधणारे व्यावसायिकच त्यांच्या त्यांच्या प्रॉपर्टीच्या परिसरात व बाहेर राखणदारी सोपी व्हावी म्हणुन मोठ मोठे प्रकाशझोत लावतात व तेच अधिकच्या प्रकाश प्रदुषणास कारणीभुत असतात. एकेकाळी पुण्याजवळील चांदणी चौकातुन खुप सारे तारे दिसायचे, चांदण्या दिसायच्या, व त्यामुळेच या चौकास चांदणी चौक असे नाव पडले. पण आता अगदी मुळशीतील ताम्हिणी पर्यंत जरी गेले तरी तुम्हाला मोठ मोठे प्रकाशझोत दिसतील पण तारे मात्र दिसणार नाहीत. स्थानिक तरुण, गावातील नेतेमंडळी, ग्रामपंचायती, प्रशासन, तालुक्यातील शीर्ष नेतृत्व अशा सर्वांनी एकत्र येऊन यासाठी जाणिवपुर्वक काम केले तर आणि तरच हे होऊ शकेल. आणि यात अवघड असे ही काही नाही. ज्यांनी ज्यांनी अधिकचे प्रकाशझोत लावले आहेत त्यांना त्यांना विनंती करुन ते बदलण्यास लावणे. असे केल्याने तारे सर्वांनाच दिसणार आहेत. फार्म हाऊस वाल्यांना देखील आणि रीसॉर्ट मधील पर्यटकांना देखील. तारे दिसणे, पाहणे म्हणजे निसर्गाचे, या अफाट विश्वाचे कोडे सोडवण्याकडील पहिले पाऊल होय. मनुष्य निसर्गापेक्षा वेगळा नाही, तो निसर्गाचाच एक भाग आहे ,  या महान व विस्तीर्ण आकाशगंगांच्या पसा-यात आपले अस्तित्व एका क्षुद्र धुळीच्या कणा पेक्षाही कमी, क्षुल्लक आहे तर मग मारे स्वार्थ करण्यात, लांड्या लबाड्या करण्यात, भ्रष्टाचार करण्यात, हेवेदावे करण्यात, जीवघेणी स्पर्धा करण्यात हाशिल ते काय? असा स्वाभाविक प्रश्न आकाशदर्शनातुन, खगोल पर्यटनातुन मनुष्यास पडतोच पडतो.

असे ता-यांचे गाव करण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे अनेकाम्च्या प्रयत्नांची गरज आहे. सोबतच असे उत्साही , नवनवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक तरुणांची गरज आहे की जे आकाशदर्शन, खगोल शिकतील. पण यांना शिकविणार कोण बरे? तर आम्ही म्हणजे निसर्गशाळा ही जबाबदारी घेण्यास उत्सुक आहोतच.

जसे ता-यांचे गाव होऊ शकते, तसेच पर्यटनातील अन्य अनेक आयाम खुले आहेत. ते काय काय असु शकतात हे मी वर लिहिले आहेच. व प्रत्येक आयामामध्ये होतकरु तरुणांना प्रशिक्षण आम्ही देण्यास तयार आहोत.

यासोबतच आपण एक गोष्ट आवर्जुन केली पाहिजे , ती म्हणजे पर्यटनाच्या नावाखाली दारु पाटर्यां करणा-या हुल्लडबाजांपासुन आपला पर्यटन व्यवसाय वाचवणे. अनेक ठिकाणी पर्यटनाचे व्यवसाय काही स्थानिकांनी सुरु केले आहेतच पण त्यांच्या कडे येणारे ग्राहक हे पर्यटक नसुन, अस्सल दारुबाजच असतात. त्यामुळे असे ग्राहक शाश्वत पर्यटन विकासासाठी अडथळे आहेत हे आपण समजुन घेतले पाहिजे.

तालुक्यातील सर्व सुज्ञ लोकांनी, नेत्यांनी, तरुणांनी, प्रशासकिय अधिका-यांनी असा वेगळा विचार केला तर काही वर्षांतच वेल्हे तालुक्याला आपण एक वेगळी ओळख देऊ शकतो.

हेमंत ववले

निसर्गशाळा

www.nisargshala.in

Facebook Comments

Share this if you like it..