इवल्याशा मुंग्यांचे अफाट विश्व – भाग १

Ants article in marathi detailed

संस्कृत्यांचा उत्क्रांतीवाद

भारतीय दर्शन शास्त्रांमध्ये आलेल्या काही संकल्पनांना घेऊन मी काही वर्षांपुर्वी, मनुष्य जीवनाच्या विकासाच्या पाय-या काय असाव्यात या विषयी लिहिले होते. अर्थात मी लिहिले म्हणजे त्यात माझे फार काही नव्हते, जे काही लिहिले ते कधीतरी कुठे तरी वाचलेले अथवा वाचलेल्यातुन आपोआप घडलेल्या चिंतनातुन निर्माण झालेले. मनुष्याचा विकास एकट्याच्या विकासाने कधीच होणार नाही तर सहकारी-सोबती यांच्यासह कक्षा उत्तरोत्तर विस्तारत जाऊन’च’ मनुष्य विकसीत होऊ शकतो. या विकसन क्रमातील पहिली पायरी आहे व्यष्टी म्हणजे स्वतंत्र, एकाकी अस्तित्व. एक मनुष्यास जसे, मी ‘आहे’ याचे भान होताना, हे शरीर, हे हात, ही बोटे, हे डोळे, नाक, कान हे सारे म्हणजे मी अशी प्रचीती वारंवार येते तेव्हा ते खरे व्यष्टी म्हणजे ‘मी’चे अस्तित्व. आपसुकच आपणास ही स्थिती प्राप्त झालेली असते. त्यापुढील टप्पा मात्र प्रत्येकाने गाठावा तरच त्यास विकसनाच्या पुढच्या पायरीवर जाता येईल. हा पुढचा टप्पा ज्या ज्या मनुष्यांनी, व्यक्तिंनी गाठला आज आपण त्यांना महामानव, लोकोत्तर स्त्री-पुरुष असे म्हणतो. अश्या स्त्री-पुरुषांच्या अस्तित्वाच्या जाणिवा केवळ त्यांच्या स्वतःच्या शरीरापुरत्या मर्यादीत नसतात तर त्या समस्त समाजासाठी, मानवतेसाठी विस्तारलेल्या असतात. त्यांच्या वेदना किंवा आनंदाचा अनुभव केवळ त्यांच्या एकट्याच्याच शरीर-मनामुळे नसतात तर समस्त समाजाला होत असलेल्या सुख-दुःखाचा अनुभव ते स्वतः घेतात. यांचे अस्तित्व व्यष्टीच्या पातळीवर राहिलेले नसते ते समष्टी जीवन जगत, अनुभवत असतात. याच्या पुढे मी आणखी दोन पाय-या, पातळ्या मांडल्या त्या म्हणजे सृष्टी व परमेष्टी. सृष्टी व परमेष्टी हा आजचा विषय नाही. आज आपण जाणुन घेणार आहोत समष्टी पातळी जीवन जगणा-या , मनुष्याच्या लेखी अगदी तुच्छ अश्या, शरीराने, आकाराने , वस्तुमानाने अगदी किरकोळ असणा-या किटकाविषयी. तो किटक म्हणजे मुंगी.

मुंगी, मुंगा - मनुजाची परिभाषा

हा शब्ददेखील गम्मतशीरच आहे पहा. मराठी मध्ये मुंगी म्हंटले तर स्वाभाविक स्त्रीलिंगी सजीव असाच भाव उत्पन्न होतो. आपण कधीही ‘मुंगा’ असे म्हणत नाही. मराठी भाषाकारांनी मुंगा हा शब्द कधीच वापरला नाही याचे कारण त्यांचे त्यांनाच ठाऊक, परंतु जेव्हा मी मुंग्यांच्या विस्मयकारी विश्वाबद्दल निरीक्षणे करीत गेलो, अभ्यास करीत गेलो तेव्हा मला समजले की खरोखरी ‘मुंगा’ म्हणता येईल असे पुःलिंगी, तुच्छ समजल्या जाणा-या मुंग्यांच्या, तुच्छश्या विश्वात अगदी अगदी तुच्छच आहे. म्हणजे असे की ‘मुंगा’ म्हणुन जे काही मुंग्यांच्या विश्वात असते ते एका विशिष्ट हेतु साठीच असते व तो हेतु साध्य झाला की त्या ‘मुंग्याला’ मुंग्यांच्या विश्वात अजिबात स्थान नसते. तुच्छ, तुच्छ हा शब्द मी अनेकदा वापरला याचे कारण असे की खरोखरी मनुष्य मुंग्यांना, त्यांच्या विश्वाला तुच्छच समजतो. आपल्या नजरेआड असलेले मुंग्यांचे विश्व किती अफाट आहे याची पुसटशीदेखील कल्पना आपणास नसते. मुळ मुद्द्याकडे येऊ पुन्हा –  मुंग्यांच्या विश्वात नर-मुंग्यांना जागा नसते ही अक्षरशः स्तिमित करणारी माहिती आहे, बरोबर ना? म्हणजे असे की मुंग्यांचे वारुळ म्हणजे वसाहतीमध्ये नर-मुंग्यांना जागा नसते अथवा नर-मुंगे नसतातच. मुंग्यांचे विश्व स्त्रीप्रधान आहे, स्त्रीसत्ताक आहे, मातृसत्ताक आहे. ते कसे आहे हे आपण पुढे पाहुच.

तर मनुष्यांमध्ये महामानव बनणारे अगदी मोजकेच असतात, हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच कदाचित आपापल्या परिचयातील लोक. पण मुंग्यांच्या बाबतीत मात्र थोडे वेगळे आहे, थोडे नाही तर अगदी खुपच जास्त आगळे वेगळे आहे सारे. मुंग्यांच्या विश्वातील प्रत्येक मुंगी ‘महामुंगी’ असते. नवीनच शब्द दिसला ना तुम्हाला हा! हो नवीनच आहे पण शब्द शतप्रतिशत प्रत्यक्ष प्रमाणाला धरुनच आहे त्यामुळे हसण्यावारी नेण्याची गरज नाहीये. महामानव असु शकतो, महासेना असु शकते, महादेव असु शकतो, महाराक्षस असु शकतो तर महामुंगी असा शब्द का असु नये आणि विशेषतः ‘महा’ हे विशेषण लावण्याचे अगदी सगळ्याच निकषांवर मुंगी १०० टक्के खरी ठरते त्यामुळे ‘महामुंगी’ हा शब्द देखील तितकाच खरा आहे.

महा हे विशेषण लावावे हे याच साठी की मुंग्याच्या विश्वातील प्रत्येक मुंगीला स्वतःचे अस्तित्व टिकवणे हे कधीही महत्वाचे वाटत नाही, तिच्यासाठी महत्वाचे असते समुहाचे अस्तित्व टिकवण्यासाठी वाट्टेल ते करणे. तसही एकटी मुंगी जीवन जगत असलेली आपण कधीही पाहिलेली नाहीये. मुंग्या नेहमीच कळपांतच दिसतात, असतात. हो एकेका मुंगीला समुहातील कामांच्या जबाबदारीच्या वाटणीने कधीतरी एकेकटीच फिरावे लागते, अन्नाचा शोध घ्यावा लागतो पण तो अन्नाचा शोध मुंगी स्वतःसाठी, एकटीसाठी कधीही घेत नाही. तिला शोध घ्यायचा असतो तो सर्व समुहासाठी. अन्न शोधताना जर अन्न सापडलेच तर ती एकटी मुंगी तातडीने अन्य मुंग्यांना सापडलेल्या अन्नाची माहिती विशिष्ट पध्दतीने देते, निरोप झपाट्याने संपुर्ण वारुळात पोहोचतो, अगदी सर्वांप्रत पोहोचतो आणि मग मुंग्यांची महासेना निघते एकाच रांगेत अन्न वारुळात आणण्यासाठी. मुंग्या एका सरळ रेषेतच का चालतात, कश्या चालतात, त्यांना कसे समजते की अन्न कुठे आहे व किती आहे व कुठे न्यायचे आहे, व दिशा ज्ञान त्यांना कसे होते आदी प्रश्नांची उकल करताना मुंग्यांच्या अफाट विश्वातील समष्टी-बुध्दीमत्ता देखील किती अफाट आहे याचा प्रत्यय येतो. समष्टी बुध्दीमत्तेला इंग्रजीत Swarm Intelligence असे म्हणता येईल. मुंग्यांमध्ये जशी समष्टी बुध्दीमत्ता जशी आहे तशीच समष्टी सहवेदना, सहचेतना देखील आहे. एकेका मुंगीचे अस्तित्व ते केवढे? अगदी क्षुल्लक , अश्या अगदी मर्यादीत क्षमता असलेल्या शेकडो, हजारो, लाखो, करोडो मुंग्या जेव्हा समष्टी बुध्दीमत्तेने काम करतात तेव्हा त्यातुन जे काही साकार होते ते अतर्क्य असते, अफाट असते.

जाती-पातीत विभागलेल्या तरीही संघटीत - मुंग्या

आपण आजवर हेच मानीत आलोय की केवळ मनुष्यांमध्येच जाती-पाती, उच्चनीच, काळा-गोरा असे भेदभाव आहेत. पण वस्तुतः हे खरे नाहीये. मुंग्यांची ही विस्मयकारी दुनिया जाती-भेदाने, उच्च-नीचते ने अगदी तुडूंब भरलेली आहे. हे भेद मुंग्यांमध्ये जन्मावरुन, जीन्स वरुनच आलेले असतात. मनुष्यांमध्ये असे भेद आहेत व ते देखील अनेकदा जन्मावरुनच घेतले जातात म्हणजे असे की ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला की ब्राह्मणच , क्षत्रियाकडे जन्म घेतला की क्षत्रियच इत्यादी इत्यादी.. म्हणजे जन्माला येणारा कुणाच्या पोटी जन्म घेतोय त्यावरुन त्याची जाती-वर्ण ठरतो मनुष्यामध्ये. अर्थात भारतातील या जातीभेदाला भारतातील दर्शनांनी अजिबात थारा दिलेला नाही. हे जे भेदभाव आहेत ते मानव निर्मितच आहेत यात शंका नाहीये. अगदी आधुनिक काळात आपण पाहिले तर कर्मचारी, अधिकारी, मालक, कॉर्पोरेट्स, सफाई कर्मचारी असे भेद देखील आहेतच. कधी कधी यांकडे पाहताना असेही वाटते की मालक नावाची जी जमात आहे ती कर्मचा-यांचे शोषण करते आहे, कर्मचारी शोषित आहेत व कुणीतरी शोषक आहे. हे कशावरुन ठरते? तर कोण कसे जीवन जगतो त्यावरुन ठरते. अर्थातच हल्ली कर्मचा-याचा मुलगा कर्मचारीच होईल असे काही राहिलेले नाही आणि कोळ्याचा मुलगा कोळीच व्हायचा असेही पुर्वी नव्हते, म्हणुनच एका कोळीणीच्या मुलाने महाभारत, पुराणे आदी भारतातील अपार गौरविलेले महाग्रंथ लिहिले व तो कोळ्याचा मुलगा देखील ब्राह्मण म्हणुन वंदिला गेला.

असो, पुन्हा एकदा मुंग्यांच्या विश्वात जाऊयात आपण चला. तर वेगवेगळ्या मातेच्या उदरी जन्म होतो म्हणुन मुंग्यांमध्ये वेगवेगळ्या जाती-जमाती नाहियेत. मुंग्यांच्या एखाद्या वसाहतीमध्ये किमान पाच ते सहा प्रकारच्या जातीच्या मुंग्या असतात व यातील गम्मत म्हणजे या सा-याच्या सा-या जातीच्या मुंग्यांची आई मात्र एकच असते. म्हणजे जाती-पाती मुंग्यांच्या वसाहतीमध्ये जन्मावरुन नाहीतर वसाहतीच्या संतुलनासाठी, वसाहतीच्या गरजेपोटी, वसाहतीच्या भरभराटी साठी तयार झालेल्या असतात. आपल्या पुर्वसुरींनी जेव्हा कधी वर्णाश्रम व्यवस्था मांडली असेल तेव्हा देखील हाच विचार त्याच्या मुळाशी असण्याची शक्यता आहे आणि आधुनिक काळात देखील हाच विचार एकुण अर्थव्यवस्थेच्या (सहजीवनाच्या) मुळाशी आहे असे आपण म्हणु शकतो. जाती-पातीची रचना समष्टीच्या हितासाठीच केलेली आहे हे मुंग्यांच्या विश्वात आपण स्पष्ट पाहु शकतो

सह्याद्रीतील गड-मुंगी

आपल्या सह्याद्रीत, गडकिल्ले फिरताना अनेकांनी खालील व्हिडीयो मध्ये दिसते तसे मातीचे जमिनीवरील घरटे पाहिले असेलच. या प्रजातीला आपण गडमुंगी म्हणतो. या गडमुंगी विषयी आणि तिच्या गडाच्या रचने विषयी मी सविस्तर माहिती आधीच एका लेखात लिहिली आहे, ती आपण इथे क्लिक करुन वाचु शकता.

मुंग्या अनेक पण 'एक' समष्टी जीवन

एखाद्या वसाहतीमधील सर्वच्या सर्व मुंग्यांना मिळुन , हल्लीचे निसर्गाभ्यासक एक इंग्रजी शब्द वापरतात, तो म्हणजे ‘सुपर ऑरगॅनिझम’. सा-याच्या सा-या मुंग्या मिळुन ‘एक’ समष्टी जीवन तयार झालेले असते. ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे वेगळे अस्तित्व असुन देखील तो तो प्रत्येक अवयव शरीराशी एकाकार झालेला असतो अगदी त्याचप्रमाणे या ‘सुपर ऑरगॅनिझम’ मधील प्रत्येक मुंगी ‘सुपर ऑरगॅनिझम’ शी एकाकार झालेली असते. प्रत्येक मुंगीसाठी तिचे स्वतःचे अस्तित्व टिकवणे ही दुय्यम ध्येय असते तर समुहाचे , समष्टीचे अस्तित्व टिकविण्यासाठी सातत्याने खटाटोप करणे हेच तिचे परम कर्तव्य असते व हे कर्तव्य प्रत्येक मुंगींच्या जीन्स मध्ये, डीएनए मध्येच छापलेले असते. त्यामुळे मुंग्यांच्या जीवनात शोषक विरुध्द शोषित असे युध्द अथवा संघर्ष कदापि दिसत नाही.

मुंग्या खातात काय? मुंग्या जगतात किती वर्षे? मुंग्याचे पुनरुत्पादन कसे होते? मुंग्यांचे वजन किती असते? मुंग्यांना वास येतो का? मुंग्यांमध्ये अन्नासाठी कधी संघर्ष होतो का? मुंग्यांना डोळे असतात का? पाय किती असतात कसे असतात? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला गुगल करुन सहज मिळतील, त्यामुळे या प्रश्नांमध्ये अधिक वेळ मी घालवीत नाही.  पण मुंग्यांच्या या आश्चर्यचकीत करणा-या विश्वातील काही रंजक तथ्ये मी थोडक्यात इथे मांडण्याचा प्रयत्न करतो

  • जगभरात मुंग्यांच्या ज्ञात असलेल्या प्रजाती १३८०० तर एकुण २२००० प्रजाती असण्याची शक्यता आहे. पैकी भारतात सातशेच्या आसपास प्रजाती आढळल्या असुन, सह्याद्रीत चारशे ऐंशी इतक्या प्रजाती आहेत. प्रजाती म्हणजे वर उल्लेख केलेल्या जाती नाही हे लक्षात असु द्या.
  • मुंग्यांच्या वारुळात अथवा वसाहतीमध्ये नर-मुंग्यांना स्थान नसते, याविषयी आपण वर सविस्तर वाचले आहेच. अमेझॉनच्या जंगलात तर एक प्रजाती अशीही आहे की जिला पुनरुत्पादनासाठी नर-मुंग्यांची गरजच नसते. राणी मुंगी चक्क क्लोनिंग द्वारे मादी मुंग्यांनाच केवळ जन्म देते. शरीर संबंधांशिवाय संतती जन्मास घालणे हे कौशल्य मुंग्यांकडे लाखो वर्षांपासुन आहे.
  • मुंग्या पृथ्वीवर सर्वत्र आहेत, अपवाद अंटार्क्टिका. आणि मुंग्या अनादी काळापासुन असाव्यात, अगदी डायनासोरच्याही आधीपासुन. डायनासोर संपले पण मुंग्या अजुनही आहेत.
  • मुंग्याचे जीवनमान काही आठवडे ते अगदी एकदोन दशके इतक्या वर्षांचे असु शकते. त्या त्या मुंगीच्या जातीवरुन जीवनकाळ ठरतो. अर्थात एका वसाहतीमध्ये अनेक जातीच्या मुंग्या असतातच असतात. कामांच्या विभागणीवरुन व जन्मावरुन जाती ठरतात.
  • एखाद्या वारुळात किंवा मुंग्यांच्या घरात किंवा वसाहतीमध्ये कमीतकमी दहा लाख इतक्या ते अगदी करोडो मुंग्या देखील असु शकतात.
  • मुंग्यांचे वारुळ जमिनीवर जितके दिसते त्यापेक्षा किमान तिप्पट चौपट जमिनीच्या आत बनविलेले असते
  • मुंग्यांच्या वारुळ म्हणजे एखाद्या शहरासारखीच त्याची रचना असते. महामार्ग असतात, धान्य कोठारे असतात, छोट्या छोट्या आराम खोल्या असतात, शेती करण्यासाठीची राखीव जागा देखील काही मुंग्यांच्या वसाहतींमध्ये असते, मुख्य म्हणजे वारुळाच्या खाली खोलवर कुठेतरी मुंग्यांना पाण्याचा एखादा जिवंत स्त्रोत सापडलेला असतो. म्हणजे जिवंत पाणी असेल तरच मुंग्या त्या ठिकाणी वसाहत बनवितात. जेव्हा पाणी संपते तेव्हा मुंग्या ते घर, वारुळ सोडुन जातात व नवीन वारुळ बनवितात.
  • मनुष्य ज्याप्रमाणे गाई-गुरे पाळतो अगदी त्याच प्रमाणे मुंग्यांच्या काही प्रजाती अन्य किटकांना चक्क पाळतात. खरतर गाई-गुरे ‘पाळणे’ हा आपल्या भाषेतील शब्द सर्वथा योग्य नाहीये. खरा शब्द इथे वापरला पाहिजे ति म्हणजे सहजीवन. मुंग्याचे व त्या विशिष्ट किटकाचे सहजीवन तयार होते व त्यातुन दोन्ही समुहांना लाभ होतो. या सहजीवनात मुंग्या ‘त्या’ किटकांचे इतर भक्षकांपासुन रक्षण करतात व त्यांना नेहमी वृक्षांच्या, झाडांच्या विशिष्ट भागांकडेच ‘हाकतात’ जिथे जास्त ‘रस’ मिळेल. या रसातुन ‘त्या’ किटकांचे पोषण होते तर नंतर मुंग्यांना मध ‘त्या’ किटकांपासुन मिळतो.  भारतात, सह्याद्रीतील सदाहरीत जंगलामध्ये, तसेच दक्षिणेकडील घाटामध्ये अश्या मेंढपाळ मुंग्यांच्या प्रजाती आहेत.
  • या मेंढपाळ मुंग्यांचे व अन्य प्रजातींमध्येही आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की या मुंग्या मिळालेल्या मधाला साठवुन ठेवण्याची कला अनादी काळापासुन अवगत आहे. मध साठवण्यासाठी या मुंग्यांमधीलच काही मुंग्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. या मध साठवणुकीसाठी प्रशिक्षित मुंग्या वारुळात, अथवा घरट्यात छता स्वतः टांगुन घेतात, त्यांचे पोट (पोटाचे दोन्ही कप्पे) मग मधाने भरले जातात. कसे भरतात आपोआप? तर नाही. अन्य कामगार मुंग्या मध शोधुन आणतात व या मध-पोट असणा-या मुंगीला भरवितात.
  • अंदाजे दोन हजार वर्षांपुर्वी जर मनुष्याला मुंग्याचे वजन करण्याची व त्यावरुन गणिते मांडता आली असती व तशी गणिते मांडली असती तर तेव्हा आपणास समजले असते की पृथ्वीतलावरील झाडुन सगळ्या माणसांचे वजन केले तर त्यापेक्षा जास्त वजन त्याकाळातील झाडुन सा-या मुंग्यांचे असते. आकाराने तुच्छ जरी असली एकेक मुंगी तरी संख्येने त्या कमी नाहीयेत. काही अभ्यासकांच्या मते आजदेखील मनुष्य आणि मुंग्या यांचे एकुण वजन एकमेकांच्या आसपासच असेल. पृथ्वीवरील सर्वच सजीव सृष्टीच्या एकुण वजनाच्या २० ते २५ टक्के वजन मुंग्याचे आहे.
  • वर आपण शोषक आणि शोषित असा विषय घेतला व मी लिहिले की मुंग्यांमध्ये शोषक आणि शोषित असे काही नसते. हे अर्धसत्य आहे. एकाच वसाहतीमधील मुंग्यांमध्ये तुम्हाला हा भेद दिसणार नाही. पण काही विशिष्ट प्रजातीच्या मुंग्यांमध्ये दोन वसाहतींमध्ये तुम्हाला शोषक आणि शोषित असे भेद दिसतील. एका वसाहतीतील काही मुंग्यांना अश्या पध्दतीने प्रशिक्षण दिले जाते की त्या मुंग्या दुस-या वसाहतीमध्ये बेमालुमपणे दाखल होऊन, तेथील नवजात अंड्यांतील पिलांना (डिंभ) चोरुन आणुन, आपल्या वसाहतीमध्ये ठेवतात. चोरुन आणलेल्या पिलांना मुळ वसाहतीचा विसर पडावा म्हणुन विशेष काळजी घेतली जाते. यथावकाश जेव्हा ही पिले बाहेर येतात तेव्हा त्यांना असेच वाटते की आपण जिथे आहोत तेच आपले घरटे आहे व आपला जन्म याच वसाहतीसाठी झालेला आहे. मग काय, झटुन या गुलाम मुंग्या कामाला लागतात. हे अगदी खरे आहे, यात कसलीही अतिशयोक्ती नाहीये
  • जीवो जीवस्य जीवनम नुसार या सृष्टीतील सर्वच जीव कुठे ना कुठे अन्य जीवांसाठीचा आहार असतातच. यातुनच निसर्गाची अन्नसाखळी तयार होते. कधीकाळी मनुष्य देखील या अन्न साखळीचा एक भाग होता , आजदेखील आहे , फरक एवढाच की आज मनुष्य अन्न साखळीतील सर्वात उच्च स्थानी आहे ज्याचा अन्य कुणीही भक्षक नाहीये. मुंग्या देखील अन्न साखळीमध्ये खुप महत्वाची भुमिका बजावतात. पर्यावरणात निर्माण होणा-या बहुतांश जैविक कच-याचे विघटन करण्याचे काम, स्वच्छता करण्याचे काम निसर्गामध्ये मुंग्याच सर्वात जास्त करतात. मुंग्या मृत किटक तर खातातच सोबत अनेक सुक्ष्म किटक त्यांच्या आहाराचा भाग असतो. मनुष्याने नेमके मुंग्यांच्या आहाराबाबतीत हे हेरले आणि पेस्ट कंट्रोल साठी मुंग्यांचा वापर शिताफीने सुरु केला ! आहे ना गम्मत मोठी, इकडे आपण मुंग्यांनाच पेस्ट कंट्रोल करुन हाकलुन लावण्यासाठी पैसे मोजतो.
  • माझे शाळेतील शिक्षकांनी मला एकदा असे सांगितले की मुंग्या कधीही शांत होत नाहीत, त्या सतत काहीना काही करीतच असतात. मुंगी शांत झालेली एका जागी निवांत बसलेली दिसली की समजा काहीतरी आकरीत घडणार. तेव्हा पासुन मुंग्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलुन गेला. मुंग्या कधीही आराम करीत नाहीत. बहुधा सारेच सजीव चाराठ तासाची झोप घेतात. पण मुंगी एकमेव प्राणी आहे की जी अशी झोप घेतच नाही. मग कशी झोप घेते मुंगी? तर मुंग्या सलग झोपत नाहीत. एकेक मिनिटांच्या डुलक्या घेतात. या डुलक्या देखील आळीपाळीने घेतल्या जातात जेणेकरुन समुहाच्या ध्येय धोरणांवर आरामाचा कमीतकमी परिणाम व्हावा.
  • एखाद्या वारुळात राणी मुंगी अंडी देते व पिलांचा जन्म होताना राणी मुंगी ठरवते की कोणत्या प्रकारच्या मुंग्याची जास्त गरज आहे. म्हणजे स्वतः राणी मुंगीची ही पहिलीच वेळ असेल अंडी देण्याची तर ती सर्वात आधी जन्म दिलेल्या पिलांना स्वतःच वाढवते, ही वाढ करताना ती हे निश्चित करते की वसाहत वाढवायची असेल तर आता गरज आहे ती कामगार मुंग्यांची. मग उपजलेल्या अंड्यांतुन जन्माला आलेल्या मुंग्यांमध्ये पंख व गर्भाशय याम्ची वाढ खुंटते व आकारदेखील छोटाच राहतो. तर जेव्हा वसाहतीमध्ये पुरेश्या कामगार मुंग्या असतील, सैनिक मुंग्या असतील तेव्हा राणी मुंगी , अन्य राणी मुंग्यांना जन्म देण्याचा निर्णय करुन त्यांना जन्म देते, सोबत काही नर मुंग्यांना देखील जन्म देते. या नव्याने जन्माला येणा-या राणी मुंग्या अथवा नर मुंग्यांना वातावरणात विशिष्ट ऊब हवी असते, उड्डाण घेण्यासाठी, यांना पंख देखील असतात. त्यामुळे या मुंग्यांचा जन्म म्हणजे प्रौढावस्था साधारण पावसाळ्याच्या सुरुवातीस होते. केवळ एकाच वारुळात असे घडत नाही तर सर्वत्रच हे घडते. मुंग्यांमध्ये समागमाच्या बाबतीत एक प्रगल्भ निर्णय दिसतो. कोणतीही नव्याने पम्ख फुटलेली राणी मुंगी त्याच वारुळातील नर मुंग्याशी समागम करीत नाही. त्याच प्रजातीच्या अन्य वसाहतीतील / दुस-या वारुळातील नर मुंग्याशी’च’ केवळ समागम होते.
  • मुंग्यांचे समागम हा देखील अजुन एक अनोखा विषय आहे आपल्यासाठी. पावसाळ्याच्या सुरुवातीस आपण पंखांसहीत उडणा-या खुप मुंग्या पाहिल्या असतील, आठवुण पहा. या खुप ऊम्च उंडत नाहीत हवेत. सर्व वारुळातुन या उडणा-या मुंग्या, नर व मादी अश्या दोन्ही, उडत उडत एक मध्यवर्ती जागा निवडुन त्याच ठिकाणी हवेतच , उड्डाण करीत करीतच समागमासाठी जोडीदाराची निवड करतात व मग जमिनीवर, झुडूपात, गवतावर सुरक्षित जागा शोधुन समागम करीतात.
  • बहुत करुन मुंग्यांच्या प्रजाती मध्ये राणी मुंगीच्या आयुष्यात समागम एकदाच घडते व पुढील सर्व आयुष्य ती राणी मुंगी त्याच एका समागमाच्या आधारावर जीवन जगते व स्वतःची वसाहत बनविते. समागमाच्या वेळी ही राणी मुंगी नर मुंग्याचे शुक्राणु तिच्या पोटातील एका कप्प्यात साठवुन घेते व गरज असेल तेव्हा त्याम्चा उपयोग करुन अंडी देते. राणी मुंगीचे आयुष्य दहा वर्षांपासुन ते अगदी तीस वर्षापर्यंत असु शकते. तर एवढा अधिक काळ शुक्राणुंची साठवणुक करण्याची तिच्यात क्षमता असते. प्रकृती म्हणजे निसर्ग अगाध आहे व यातील मुंगीसारखा एखादा आपण समजतो तसा तुच्छ जीव देखील इतका प्रगत असु शकतो यावर आपला विश्वास बसणार नाही. यांची ही प्रगती म्हणजे कदाचित अब्जाबधी वर्षांच्या, पिढ्या मागुन आलेल्या पिढ्यांचे अनुभवांच्या संकलनातुन मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर विकसीत केलेले निसर्गाशी अनुकूलन होय. परिस्थीतीला समजुन घेऊन, अभ्यासुन त्यातुन जीवन जगण्याची, परिस्थितीशी मिळतेजुळते घेत, समस्यांची उकल करीत जाणे म्हणजे अनुकूलन होय. नाहीतर कसल्याही कोल्ड स्टोरेज अथवा हायड्रोजन स्टोरेज (यात सीमेन म्हणजे शुक्राणु साठवुन ठेवता येतात मनुष्याला) नसताना गेली लाखो, करोडो वर्षे मुंग्या हे सारे करीत आहेत. कमाल आहे ना?
  • कोणतीही मुंगी तिच्या प्रौढावस्थेला येईस्तोवर एकुण चार अवस्थांमधुन जाते. पहिली अंडे, दुसरे, डिंभ, तिसरे कोष व चौथे प्रौढ अवस्था. प्रौढावस्थेमध्ये आलेली मुंगी कामगार असेल तर ती लागलीच कामाला सुरुवात करते, राणी असेल तर ती नवीन वसाहत बनविण्यासाठी, जोडीदार शोधण्यासाठी दुर उडुन जाते, तर नर मुंगी असेल तर तो देखील उडुन जातो.
  • राणी मुंग्यांनी अंडी घातल्यानंतर वातावरणातील तापमानानुसार १५–४५ दिवसांत अंड्यांतून पांढऱ्या रंगाचे डिंभ बाहेर येतात. या डिंभांना पाय नसतात. कामगार मुंग्या त्यांना अन्न भरवितात. डिंभावस्था १–४ महिने असते. नंतर कोषावस्था १–४ महिने असून ४ महिन्यांनंतर मुंग्या बाहेर येतात व काही दिवसांनी प्रौढ होतात. कामकरी मुंग्या काही डिंभांना पौष्टिक अन्न (ज्याला राजान्न म्हणतात) खायला देतात व त्यांची जास्त काळजी घेतात. या डिंभांपैकी काहींचे प्रजननक्षम अशी राणी मुंगी किंवा नर मुंगी यांमध्ये रूपांतर होते.
  • समागम झाल्यानंतर नर मुंग्याचे काय होते? पुढील काही काळ हा नर जिवंत राहतो, एकाकी राहतो, कारण याला कोणत्याच वसाहतीमध्ये स्थान नसते. याला स्थान नसण्याचे कारण हे की हा नर वसाहतीसाठी केवळ एक ओझे होऊन जातो. वसाहतीसाठी याची गरज संपलेली असते व वसाहतीच्या भल्यासाठी याला वसाह्तीमध्ये पुन्हा सामावुन घेतले जात नाही. त्यामुळे एकतर अन्न न मिळाल्याने भुकेने व्याकुळ होऊन तरी नर मरतो अथवा अन्य परभक्षी किटक वा पक्ष्याचे खाद्य होऊन तरी मरतो.
  • गेली दोन अडीच वर्षे मानवजात एका कोविड१९ नावाच्या एका विषाणुचा सामना करीत आहोत. अद्ययावत औषधोपचार, लसींचा शोध, सोशल डिस्टंसिंग, मास्क असे सगळे वापरुन देखील अद्याप कोविड आटोक्यात येतोयसे दिसत नाही. याला पॅंडेमिक म्हणतो आपण. म्हणजे एकट्याचा आजार साथीचा होतो आणि जगभर पसरतो. प्रश्न असा पडतो मग मुंग्यांच्या बाबतीत की काय मुंग्या आजारी पडतात का? आणि कशामुळे? प्रत्येक सजीवाचा जसा भक्षक असतो की जो त्या सजीवाला खातो व जीवन जगतो तसेच प्रत्येक सजीवामध्ये परावलंबी जिवाणु, विषाणु, बुरशी देखील असते की त्या सजीवास आतुन पोखरते. प्रत्यक्षात हे आतुन पोखरणारे सुक्ष्म जिवाणु, विषाणु स्वतःच्या वाढीसाठीच पोखरण्याचे काम करीतात, म्हणजे ते देखील एक प्रकारे भक्षकच असतात, जसा सध्या कोरोना विषाणु आहे. मुंग्यांमध्येदेखील जिवाणु, विषाणु असतातच व त्यामुळे मुंग्या आजारी देखील पडतात. मुंग्यांची स्ट्रॅटेजी देखील काहीशी माणसांसारखीच आहे.. माणसांसारखीच असे म्हणने चुकीचे होईल कारण मनुष्यच्या आधी कितीतरी करोडो वर्षे मुंग्या ही निती वापरीत आहेत. त्यामुळे मुंग्यांची स्ट्रॅटेजी आधीपासुनचीच आहे व ती खुपच प्रभावी देखील ठरली आहे. खरतर मुंग्या एक्मेकांच्या इतक्या जास्त जवळ व लाखोंच्या संख्येने असतात तर एखाद्या परजीवी विषाणु, बुरशीला मुंग्यांचे घरटे म्हणजे पार्टीच, नाही का? पण असे होत नाही याचे कारण मुंग्यांच्या स्वच्छतेच्या सवयी. एखाद्या मुंगीला जर काही बाधा झालीच तर तातडीने अन्य मुंग्या तिला स्वच्छ करण्याचे काम करतात व धोका कमी करतात. यातुन ती मुंगी बरी होते. पण जर झालीच नाही तर ती मुंगी स्वतःच घरटे सोडुन देते व कायमची विलगीकरणात जाते. समष्टी जीवन महत्वाचे आहे, व्यष्टी जीवन हे समष्टीसाठीच असते याचा प्रत्यय मुंग्यांच्या या वर्तनातुनदेखील दिसतो. जर इंफेक्शन एखाद्या नव्याने प्रौढ झालेल्या मुंगीस झाले व ती बरी होत नाही असे दिसले तर तिला मात्र जबरदस्तीने वारुळातुन निष्कासित केले जाते. कदाचित यामुळेच मुंग्यांमध्ये पॅनडेमिकच काय पण एपिडेमिक आजार देखील दिसत नाहीत. 

 

हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..