आमच्या उनाडक्या, मद्यधुंद ठाकर, त्रासदायक किडे व समुद्रकिना-यावरील स्वच्छंदी रात्र

रम्य त्या आठवणी

आमचाच नव्हे तर आपणा प्रत्येकाच्याच भुतकाळातील काही भाग आपणास, प्रत्येकास रम्य वाटतो. आपणास आपला तो तो भुतकाळ पुनःपुन्हा जगावासा वाटतो, हवाहवासा वाटतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही वर्षे असतात जेव्हा आपण ख-या अर्थाने जगलेलो असतो, असे आपणास आत्ता वाटते. त्या काळातील आपले ते जगणे, आपल्या वर्तमान काळात देखील आपणास जगण्याची आणि ख-या अर्थाने जगण्याची प्रेरणा नक्कीच देत राहते.

आणि जेव्हा त्या आठवणी फोटो व डायरीच्या माध्यमातुन पुन्हा समोर येतात तेव्हा तर आपण टाईम ट्रॅव्हलच करतोय की काय असे वाटल्या शिवाय राहत नाही. आमच्या सुदैवाने आमच्या आयुष्यातील ‘तो’ रम्य काळ, तो सुवर्णकाळ थोड्याबहुत का होईना पण डायरीत लिहिलेला, फोटोंमध्ये चित्रीत केलेला आहे. ईष्टापत्ती यावी तसा कोरोना आलेला आहे. या आपत्तीतुन आपण आपापले कोर्स करेक्शन करावे. आपापले ध्येय पुनर्निश्चित करावे. आपापले सखे-सोयरे पुन्हा नव्याने ओळखावेत, आपले आयुष्य आपण नक्की कसे जगले पाहिजे याचे चिंतन करावे. कदाचित आपोआपच यशदिपकडुन जुने बाड धुंडाळणे सुरु झाले असावे. एकेक खजिना सापडावा तसे एकेका ट्रेकचे फोटो, लिखित वृत्त सापडत आहे. मलाही माझे काही जुने लेख, ट्रेक-वृत्तांत, फोटो सापडले. आपल्यापैकी अनेकांना काहीनाकाही सापडले आहेच.

आमच्या साठी आमचा ट्रेकिंगचा तो काळ म्हणजे सुवर्णकाळ होता. नुकतीच बारावी होऊन मी संगणक शास्त्र या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. कॉलेज सांगवीला असल्याने जाणे-येणे अवघड होते. एकही बसमार्ग नव्हता. टु व्हीलर (माझ्या वडीलांची एम-८०) घरी असुनही व चालवता देखील येत असुन तिने प्रवास करण्यासाठी परवानगी नव्हती वडीलांची. मग सपकाळ सर व जगदीश गोडबोले यांच्या माहितीतुन विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहाविषयी माहिती मिळाली व तिथे प्रवेश घेतला. गावाकडुन शहरात रहायला गेलेला मी न्युनगंडाने ग्रासलेलो होतो. वर्गातील एक दोन मित्र मंडळी सोडली तर माझे फारसे कुणाशी कधीही जमले नव्हते. माझे मन रमायचे ते डोंगरद-यांमध्ये. असे होण्याचे आणखी एक कारण होते, ते म्हणजे माझी ट्रेकिंगचे सवंगडी. सवंगड्यांतील काही चेहरे बदलत राहिले. पण तीन जण मात्र कायम होते. ते म्हणजे यशदीप, देवीदास व मी. त्याकाळात आम्ही तिघांनी अनेक ट्रेक एकत्र केले. आमच्या सोबत कधी माझे मित्र असत तर कधी यशदिपचे मित्र असत.

असाच आमचा आणखी एक ट्रेक म्हणजे सांकशी-माणिकगड-कर्नाळा-अलिबाग!

यशदिप ने तेव्हा लिहुन ठेवलेल्या डायरीत या ट्रेकचे वृत्त देखील सविस्तर आहे. यशदिप इतक्या बारक्याने सगळ्या गोष्टी लिहित असे हे मला माहित असले तरी नंतरच्या काळात मी ते विसरुन गेलो होतो. पण लॉकडाऊन च्या काळात त्याने हा खजिना पुन्हा शोधुन त्याच्या या विशिष्ट गुणावर साचलेले मळभच जणु दुर केले आहे. मला देखील लिहायची आवड होती, आहे. पण इतक्या बारकाव्याने लिहिणे मला कधीही जमले नाही. कुठे, किती वाजता, कोण-कोण, स्थानिकांच्या नावासहीत त्याने हे जे काही लिहिले आहे ते कायमस्वरुपी संग्रही ठेवावे असेच आहे.

आमचा हा ट्रेक झाला तो एकुण पाच दिवसांचा. काय ते दिवस मित्रांनो. हल्ली पाच दिवसांचा ट्रेक करणे निव्वळ दिवास्वप्न होईल. अशी इतक्या जास्त दिवसांच्या ट्रेकची कल्पना देखील हल्ली करवत नाही. कॉलेजांना दिवाळीच्या सुट्या लागल्या होत्या. देवीदासचा नेहमीचा फॉर्मुला होता नोकरीमध्ये ड्युट्यांचे जुगाड करण्याचा. मला देखील वसतिग्रुहात जाऊन एक वर्ष झाले होते. त्यामुळे होस्टेलचा एक मित्र प्रकाश जाधव हा देखील सहभागी झाला होता. सोबतचा त्याचा चुलत भाऊ अतुल होता. असे आम्ही पाच जण. माझ्या साठी अतुल नवीन होता तर यश व देवा साठी प्रकाश व अतुल अनोळखी होते. पण ट्रेक संपताना आम्ही सारेच घट्ट मित्र होऊन गेलो होतो. ट्रेकिंगची हीच खासियत असते.

२६ ऑक्टो ते ३० ऑक्टो १९९८ असे पाच दिवस आम्ही भटकत होतो.

पहिल्या दिवशी मला विशेषत्वाने आठवते आहे ती दर्गा. आम्हाला जायचे होते सांकशी गडावर. हा एक साधारण गड होता. गावापासुन साधारण दोन तास चालुन आम्ही जेव्हा गडाच्या पायथ्याशी आलो तेव्हा अचानक ही दर्गा समोर दिसु लागली. त्याकाळी मला प्रश्न पडला की अशी दर्गा, इतक्या दुर, दुर्गम भागात कशी काय असु शकते व ती देखील सर्व सोईसुविधांनी युक्त अशी. दर्ग्यापासुन किल्ला अजुनही थोडा ऊंच होता. रात्री तिथे मुक्काम करुन आम्ही दुस-या दिवशी पहाटे गडमाथा गाठला. यशदिप ने या गड-भटकंती विषयी लिहिलेले वाचण्यासारखे आहे. यशदिपची बारकावे पाहण्याची व नोंद करण्याची क्षमता यातुन दिसते. दर्ग्यापासुन गडमाथा गाठण्यासाठी एक सरळ चढाई करावी लागते. गडावर पाहण्यासाठी काय काय आहे हे देखील यशदिप ने लिहिले आहे.

karnala trek

या गडमाथ्यावरील यशदिपने काढलेला आमचा एक फोटो

सांकशी गड पाहुन आम्ही मोर्चा वळवला माणिकगडाकडे. सांकशी पासुन माणिकगडापर्यंतच्या पायपीतीमध्ये एक सुंदर नदी लागली. त्या नदीच्या काठावर, तरीही थोडे दुर आम्ही दुपारच्या जेवणासाठी चुल मांडुन भात रांधला होता . भात शिजेपर्यंत नदीमध्ये मनसोक्त डुंबण्याचा आनंद देखील आम्ही घेतला. मित्रांनो लक्षात ठेवा असे अनोळखी प्रदेशात नदीमध्ये उतरणे धोक्याचे असते. त्यामुळे असे करणे चुकीचे आहे याची जाणिव आम्हाला नंतर झाली. त्यामुळे तुम्ही असे करणे टाळा.

आज जेव्हा मी यशदिपचे हे लिखाण वाचले तेव्हा मला समजले की आम्ही त्याकाळी किती बिनधास्त जीवन जगत होतो. आम्ही दुस-या रात्री माणिकगडावर पोहोचलोच नाही मुक्कामी. किल्ल्याच्या पायथ्यालाच , खुपच जास्त अंधार पडल्याने आम्ही चक्क जंगलातच, एका भात खाचरातच मुक्काम केला. बिनधास्त असलो तरीही आम्ही आळीपाळीने जागरण करण्याचे कामही केले. त्यातच यशदिपची झोप एकदम सावध. जर्रा कुठे खुड्ड झाल की यशदिप उठुन बसतो. आणि मी त्याच्या एकदम विपरीत. अंथरुन असो वा नसो, कुठेही पाठ टेकली रे टेकली की लगेचच मी गाढ झोपी गेलेलो असतो. मला खाड-खुड अशा कशानेच जाग येत नाही. त्यामुळे जागरणाची माझी पाळी असताना देखील यशदिपच जागा होता, हे त्याच्या कडून मला प्रत्येक ट्रेकच्या अशा बिनधास्त मुक्कामानंतरच्या सकाळी समजायचे. असे बिनधास्त तरीही सावध मुक्काम आम्ही खुप केले आहेत. भिमाशंकरच्या घनदाट अरण्यातील मुक्काम, कोकणातुन वर चढुन आल्यावर भिमाशंकरच्या पायथ्याशी असलेल्या जंगलातील मुक्काम, सवाष्णी घाटातील जंगलातील मुक्काम, कैलास गडावरील मुक्काम, प्रचित गड जंगलातील मुक्काम, मोरघळीचा मुक्काम असे अनेक मुक्काम मनःपटलावर अंकित झालेले आहेत.

माणिकगडाच्या वाटेविषयी यशदिप ने आवर्जुन लिहिले आहे की हेमंतने वाट चुकवली. वाटा शोधण्यासाठी वाटा चुकाव्या लागतात, त्यामुळे अनेकदा यशदिपच्या लिखाणात हेमंत ने वाट चुकवली असे लिहिलेले आढळते. याचे कारण असे की वाट शोधण्याचे काम पहिले करायला मीच पुढे सरसावुन जायचो. अनेकदा चुकायचे, वाट सापडायची नाही. आणि कधी कधी सापडायची देखील. पण उत्साह मात्र कधीही कमी व्हायचा नाही. वाट शोधण्यात मी अनेकदा चुकलो असलो तरी माझ्या सवंगड्यांनी कधीही माझ्या अविश्वास दाखवुन मला पुढे जाण्यापासुन रोखले देखील नाही. एकमेकांवर विश्वास ठेवणे, ते ही कठीण प्रसंगी खुप महत्वाचे असते. व असे धडे शिकण्याचे आमचे विद्यापीठ होते निसर्गातील अशी ही भटकंती.

माणिकगड

या ट्रेकच्या दरम्यान क्रिकेट वर्ल्ड-कप च्या मॅचेस सुरु होत्या. त्या दिवशी भारताची एक मॅच होती. देवाचा निम्मा जीव ट्रेक मध्ये तर निम्मा मॅच मध्ये होता. टॉस कुणी जिंकला असेल, बॅटींग कुणी केली, किती रन केले असतील, असे झाले असेल तसे झाले असेल अशा नाना कॉमेंट-या ट्रेकदरम्यान आम्ही ऐकत होतो. माणिकगडची चढाई, गड पाहणी, तेथील स्वयंपाक व देवाची (देवीदास ववले) क्रिकेट साठीची तगमग हे सगळे आगळे वेगळे मिश्रण होते. माणिकगडावरील ‘ते’ किडे तर विचारुच नका. ‘ते’ किडे काय होते, कसे होते, त्यांनी आम्हाला कसे पीडले हे सगळे यशदिपने छान लिहुन ठेवले आहे. सोबतच गड उतरुन आल्यावर देवाने चौकशी करुन मिळविलेली अनमोल माहिती म्हणजे सचिन तेंडुलकरचे त्या दिवशीचे रन. अफलातुन! क्रिकेट विषयी समाचार मिळाल्यावर देवाच्या जीवात जीव आला. सचिन ने त्या मॅच मध्ये किती रन केले बरे? यशदिपच्या ह्स्ताक्षरात खाली वाचा.

माणिकगडावरील किडे व क्रिकेट समाचार पुढे वाचा..

आम्ही त्या काळी, ट्रेक करताना सुई दोरा न चुकता न्यायचो. व हा सुई दोरा खुप महत्वाचा असल्याचा प्रत्यय आम्हाला याच ट्रेक मध्ये आला.

आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं, असे गाणे तुम्ही ही ऐकले व पाहिले असेल  चित्रपटामध्ये. पण आमचे सुदैव पहा , आम्हाला ठाकुर लोकांचा पारंपारिक नाच व गाण्याचा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले, कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या ठाकुरवाडीत. आमचे सुदैव सावकाश दुर्दैवात बदलणार होते, राडा होणार होता, हा किस्सा आणि भेदरलेले तरीही आमचे भय लपवण्यात यशस्वी झालेले आम्ही, त्या आदीवासी लोकांना पुरुन उरणार होतो का?, ते कसे हे यशदिपच्या शब्दांमध्येच, मुळातुनच हे वाचण्यास योग्य आहे. त्यातच दारु पिऊन टुण्ण झालेली वाडीतील पुरुष मंडळी…हस्तलिखित वाचा हा किस्सा.

२८ ऑक्टो ची रात्र आमच्या साठी एक विलक्षण रात्र होती. असा अनुभव आमच्या ट्रेकिंग च्या जीवनात येण्याची ती पहिलीच वेळ.

पुढचा दिवस म्हणजे कर्नाळा किल्ला चढाई. साधारण पणे दोन तासांच्या आतच आम्ही मुक्कामच्या ठिकाणापासुन कर्नाळा किल्ला गाठला.

मी १९८९ मध्ये आयुष्यात प्रथमच समुद्र पाहिला होता आई-बाबुजींसोबत जेव्हा आम्ही कन्याकुमारीला गेलो होता तेव्हा. आणि त्यानंतर कर्नाळ्याहुन दिसलेला समुद्र मला आजही आठवतोय.  कर्नाळा किल्ला माझ्या साठी अविस्मरणीय असण्याचे कारण म्हणजे मी कर्नाळ्यावर केलेली मुक्त चढाई. फ्रि क्ल्बाईंबिंग हा रॉक क्लाईंबिंगचा एक प्रकार यामध्ये कसल्याही सुरक्षा साधनांचा वापर करीत नाही. कर्नाळा सुळका केवढा मोठा आहे हे तुम्हाला खालील फोटोमध्ये पाहुन समजेल. मी हा सुळका पुर्ण चढणारच होतो तेवढ्यात मला यशदिप ने रोखले. व असे करणे धोकादायक होऊ शकते असे सांगुन खाली उतरण्यास सांगितले. प्रचंड उमेद, ताकद, जोश असे सर्वकाही असुन सुध्दा यशदिपचे मी ऐकले व खाली उतरलो.

हाच तो सुळका जो मी ३/४ म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त चढलो होतो. काय ते दिवस. म्हणुनच मी या काळास सुवर्णकाळ म्हणतो. यशदिप ने देखील सुळका चढला.

कर्नाळा उतरुन देवा पुण्याकडे निघुन गेला कारण त्याला चारच दिवसांची सुट्टी होती. आम्ही चौघे पुढे अलिबाग कडे निघालो. अलिबागचा तो मुक्काम देखील आमच्या साठी अविस्मरणीय ठरला. सांयकाळी आम्ही अलिबागला पोहोचलो. आमच्या कडील सर्व शिधा संपला होता. थोडेफार मसाले , तांदुळ व तेल शिल्लक होते. आणि अलिबागच्या मार्केट मधील पापलेट माश्यांनी आमचे लक्ष वेधुन घेतले. त्यामुळे लागलीच आम्ही बाजारातुन मासे खरेदी केले व समुद्र किनारी एका सुरुच्या झाडाखाली आम्ही बस्तान मांडले. आकाशात छोटीशी चंद्रकोर होती. तारे चमचमत होते. दुर दुर पर्यंत माणसांच्या खाणाखुणा नव्हत्या. शांततेचा भंग होत होता ते केवळ लाटांच्या आवाजाने. मला त्या समुद्र किना-यावरुन अनवाणी चालल्याचे अजुनही स्पष्ट आठवते आहे. चालताना सख्खे मित्र सोबत होते. ता-यांच्या चादरीखाली, समुद्रकिना-यावरील त्या सौम्य वाळुंच्या कणांवरुन चालणे कधी संपुच नये असे वाटत होते. केवळ अदभुत असा तो रात्रीचा समुद्र किना-यावरील मुक्काम आम्ही कधीही विसरणार नाही.

हल्लीच्या काळात असा मुक्काम करण्याची कल्पना तरी करता येईल का?

दुस-या दिवशी न चुकता आम्ही केलेला कचरा गोळा करुन सरकारी कचरापेटीत टाकला.

एकंदरीत आमचा हा ट्रेक भन्नाट झाला.

यशदिपचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. वर्तमान काळात जर पुन्हा आम्हाला त्याच भागात ट्रेक करायची संधी मिळाली तर आम्ही आवर्जुन त्या त्या माणसांचा शोध घेण्याचा प्रयत्न करु. हा शोध घेणे यशदिपमुळे सोपे झाले कारण यशदिप ने स्थानिकांची नावे व्यवस्थित लिहुन ठेवली आहेत.

आपले ते आयुष्य ते जीवन ते क्षण पुनःपुन्हा जगावेसे वाटते. ते जीवन भारी होते कारण त्यावेळी आम्ही मुक्त पक्ष्यांप्रमाणे बागडायचो. आम्हाला कसलेही पाश नव्हते. आम्हाला कसल्याही चिंता नव्हत्या. आम्हाला कसलेही बंधन नव्हते. उनाडकीच होती ती , पण ती उनाडकी आम्हाला घडवुन गेली. जबाबदार करुन गेली. निसर्गाशी जवळीक कशी साधायची हे शिकवुन गेली. मित्रांशी कसे वागावे हे शिकवुन गेली. टीम वर्क कसे करावे हे शिकवुन गेली. टीम मध्ये असताना, व्यक्ति महत्वाचा नसुन संपुर्ण टीमच महत्वाची असते व टीमच्या हिताचे जे काही असेल ते केले पाहीजे असे शिकवुन गेली आमची उनाडकी. व्यक्तिगत अहंभाव सामाजिक अंहभावापेक्षा मोठा नसतो हे शिकवले आम्हाला आमच्या उनाडकीने.

माणिकगडावरुन कर्नाळा दाखवताना देवा, यशदिप, प्रकाश व मी..

अलिबाग अर्थात कोलाबा येथील समुद्रात मनसोक्त डुंबताना

असे आयुष्य आपण पुन्हा जगु शकणार नाही का? पुन्हा असे मुक्त पक्ष्यांप्रमाणे आपण रानावनांत भटकु शकणार नाही का? पुन्हा कधी आपण निसर्गाशी इतके एकरुप होऊ शकतो का?

तर माझे उत्तर या प्रश्नांना अगदी स्पष्ट आहे व ते म्हणजे ‘होय!’

Regards

Hemant S Vavale

Author of this article is the owner of nisargshala enterprise and runs this enterprise to offer real, raw nature experiences to city dwellers in a controlled and safe way. People from city can come to campsite with family and friends to get connected with mother nature. With the help of varied activities like camping, rappelling, waterfall rappelling, trekking, hiking, one with nature you can have the bond with mother nature reestablished. The campsite is 70 kms from Pune toward southwest; in Velhe Taluka of Pune district. Please visit homepage for more information.

Facebook Comments

Share this if you like it..