सिकाडा : दिसकिडा / कातकिडा

रात्रीचा काळोखच नाही तर उजेडात सुध्दा, घनदाट जंगलात नाही तर अगदी आपल्या घरात देखील आपल्या कर्कश्श आवाजाने सर्वांना त्रस्त करणारा रातकिडा सर्वांना माहित आहेच. आज आपण माहिती घेऊयात रातकिड्या सारख्याच आणखी एक कर्कश्श आवाज करणा-या किटकाची. या किटकास इंग्रजी मध्ये सिकाडा म्हणतात. अद्यापचे याचे मराठी नाव मला इतरत्र कुठेही सापडले नाही. त्यामुळे याला नाव देण्याची संधी आपल्याकडे आहे अद्याप. याची माहिती वाचा व तुम्ही देखील यासाठी चपखल मराठी सुचवू शकता.

सिकाडा किरकिर करतो पण याची किरकिर रात्रीच होते असे नाही. याची किरकिर दिवसादेखील असते. आपल्या कॅम्पसाईट परिसरात आपण अनेकविध कार्यक्रम घेत असतो पर्यटकांना निसर्गाशी एकरुप होण्यासाठी. यातील एक कार्यक्रम आहे सिकाडाच्या आवाजाचा कानोसा घेत घेत सिकाडा कुठे आहे हे शोधण्याचा. खुप गम्मतशीर खेळ आहे हा. यामध्ये आवाजाची नेमकी दिशा सापडणे खुपच अवघड असते. आणि जरी कुणी या आवाजाच्या अगदी जवळ पोहोचले तरी लागलीच सिकाडा त्याचा आवाज करणे बंद करतो. मग कसा शोधणार बर? तरीही नीट एकाग्र चित्ताने लक्ष देऊन आवाज घेत राहिल तर तुम्हाला आवाज कुठून येतोय हे समजते. पण आवाजाचा उगम जरी सापडला तरी सिकाडा सापडेलच असे काही नाही कारण सिकाड्याचा रंग त्या त्या झाडाच्या अगदी खोडासारखाच असल्याने तो चटकन ओळखता येणे अवघड असते.

सिकाडा हा किटकांच्या साम्राज्यातील राजा आहे असे म्हंटले तरी चालेल कारण याचा आकार. निसर्गाच्या अन्नसाखळीत देखील सिकाडा खुपच महत्वाचा आहे. सरपटणारे प्राणी, पली, सरडे, पक्षी यांचे आवडते खाद्य म्हणजे सिकाडा. ज्या भागात तुम्हाला सिकाडाचा आवाज मोठ्या प्रमाणात येईल तो तो भाग पर्यावरणीय दृष्ट्या समृध्द आहे असे समजावे. आपल्या जैव विविधतेमध्ये अत्यंत मोलाची भुमिका असणा-या या किटकावर भारतात, महाराष्ट्रात मात्र अजुनही म्हणावे असे संशोधन झालेले नाहीये.

उपलब्ध माहितीनुसार असे समजते की जगभरात याच्या ३२०० च्या आसपास प्रजाती आहेत. पैकी भारतात ३०० प्रजाती असाव्यात असा अंदाज आहे. सह्याद्रीच्या सदाहरित जंगलांत तुम्हाला सिकाडा हमखास पहावयास मिळेल. कधी कुठे ट्रेक ला गेलातच तर आवर्जुन आवाजाचा शोध घ्या. सिकाड्याचा शोध घ्या. फोटो काढा व #cicadaofwesternghats या हॅशटॅग ने फेसबुक, इंस्टाग्राम वर पोस्ट करा, वा मला ९०४९००२०५३ या व्हॉटसॲप नं. वर शेयर करा.

मागील वर्षी मी तोरणा किल्ल्यावर असताना मला एका कारवीच्या पानावर एक किटक दिसला. मला वाटले की हा मृत किटक असावा. पण शंका आली की मृत असला तरी केवळ त्याच्या शरीराचे बाह्य आवरणच कसे काय बरे शिल्लक आहे, आतील बाकीचे शरीर कुठाय? घरी आल्यावर माहिती घेतली व मग समजले की हा किटक म्हणजे सिकाडाच; सापाप्रमाणेच आपली जुनी त्वचा टाकतो, कात टाकतो व नवीन चमकदार तेजस्वी त्वचा धारण करतो. आपल्या भागात देखील असे किटक आहे याची माहिती आपणास असली पाहिजे.

सिकाडाच्या प्रजातींमध्ये बहुधा बहुवर्षायु व वर्षायु असे भेद आहेत. कात टाकणारा किडा बहुतेक बहुवर्षायु असावा. जगात अशा बहुवर्षायु किड्यांपैकी जास्तीत जास्त जगणा-या किडा १७ वर्षे जगतो अशी नोंद आहे. मादी सिकाडा एकावेळेस ६०० पर्यत अंडी, झाडाच्या बेचक्यात, भेगांत घालते. अंडी खुपच छोटी असतात व सहसा निरखुन पाहिल्याखेरीज आपणास नजरेस पडत नाहीत. ही अंडी उबल्यावर, पिल्ले जमिनीवर पडुन जमिनीखाली झाडाच्या मुळांना चिकटतात. मुळातुन रस घेऊनच बराच काळ ही जमिनीखालीच राहतात. पुढच्या टप्प्यात हे किटक मोठे झालेले असतात व जमिनीवर येऊन, जवळच्याच झाडावर चढतात. झाडावर चढल्यावर सर्वात प्रथम हे किटक तिथे आपली कात टाकतात व पंखांच्या सहाय्याने उड्डान भरण्यास समर्थ होतात.

याच्या पोटाच्या आतील बाजुस हवा भरुन घेण्यास कप्पे असतात. सिकाडे अशापध्दतीने पोटात हवा भरुन घेऊन विशिष्ट किर्र किर्र असा आवाज काढतात. हे आवाज प्रामुख्याने समागमासाठीचे असतात. कधीकधी भक्षकापासुन इतरांना सावध करण्यासाठी देखील आवाज केले जातात. विविध कारणांसाठी विविध आवाज काढण्याची खुबी यांच्याकडे असते. एखाद दोन असतील तर फार काही वाटत नाही आपणास पण यांची संख्या जसजशी वाढते तसतसे आवाज देखील वाढत जातो. हजारो लाखोंच्या च्या संख्येने जेव्हा सिकाडा आवाज करतात तेव्हा त्यात विशिष्ट लय देखील असते.

कात टाकताना सिकाडा म्हणजेच कातकिडा

काही प्रजाती मुंगळ्यांसोबत गुण्यागोविंदाने नांदतात. मुंगळ्यांना यांचेकडुन मध मिळते व सिकाड्यांस संरक्षण!

यांना इंग्रजी मध्ये ट्रु बग्स असे म्हणतात कारण हे ख-या अर्थाने किडे आहेत असे अभ्यासकांचे मत आहे.

याला अद्याप मराठी नाव लिखित स्वरुपात मला कुठेही आढळले नाही. याचे जी काही वैशिष्ट्ये आहेत यावरुन मला या किटकासाठी दोन नावे सुचवावीशी वाटतात.

  • दिसकिडा – रात किडा जसा आवाज करतो काहीसा तसाच पण दिवसा करतो म्हणुन हा दिसकिडा
  • कातकिडा – सापाप्रमाणेच कात टाकतो व नवीन बाह्यावरण घेऊ शकतो म्हणुन कात-किडा

तुम्हाला देखील काही नाव सुचवायचे असेल तर अवश्य सुचवा.

धन्यवाद

हेमंत सिताराम ववले

निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *