आकाशातील चित्तरकथा – सप्तर्षी

stargazing near Pune

ज्याप्रमाणे कृत्तिका या नक्षत्राचा उपयोग दृष्टीदोष तपासण्यासाठी केला जायचा तसाच उपयोग सप्तर्षीं चा देखील केला जायचा. या तारकापुंजामध्ये जर आठ तारे दिसतील तर कसल्याही प्रकारचा दृष्टीदोष नाही, असा काहीसा हा प्रकार आहे.

 उत्तर दिशेला हे नक्षत्र उगवते. हे ओळखणे अगदी सोपे आहे. पुण्यातुन पाहील्यावर उत्तर आणि पुर्व दिशेच्या मध्ये, एक उलटं ठेवलेलं वरगळं (भाजी वाढायची मोठी पळी), की ज्याचा दांडा पुर्व दिशेला तीन ता-यांचा तर वरगळ्याच्या उलटा खोलगट भाग म्हणजे एक साधारण चौकोन दिसतो. हा चौकोन व त्याला लागुनच पुर्वेकडील तीन तारे, मिळुन सप्तर्षी तारामंडळ मानले आहे.


 आकाशदर्शनाचे आगामी  कार्यक्रम
[print_vertical_news_scroll s_type=”modern” maxitem=”5″ padding=”10″ add_link_to_title=”1″ show_content=”1″ modern_scroller_delay=”5000″ modern_speed=”1700″ height=”200″ width=”100%” direction=”up” ]


नुसतच दृष्टीदोष शोधणे केवळ हाच ह्या सप्तर्षीचा उपयोग होता किंवा आहे असे नाही. प्राचीन भारतीय कालगणनेसाठी वापरलेल्या गेलेल्या नक्षत्रांमध्ये जरी सप्तर्षीचा समावेश नसला तरी अगदी पुर्वापार दिशाज्ञानासाठी सप्तर्षीचा उपयोग जगभरातील अनेक सभ्यतांनी केलेला आहे. सप्तर्षी मधील पहीले दोन तारे एकमेकांना जोडले व ती रेष तशीच पुढे वाढवली तर, त्या दोन ता-यांच्या मध्ये जेवढे अंतर आहे त्या अंतराच्या सहा पट अंतरावर, त्या रेषेवर ध्रुव (Pole star, North Star) तारा सापडतो. व ध्रुव तारा म्हणजे अढळ असा मानला गेलेला विश्वाचा ध्रुवच आहे असा विश्वास भारतीयांमध्ये हजारो वर्षांपासुन आहे. म्हणुनच याला नाव देखील ध्रुव-तारा असेच दिले गेले आहे. ध्रुव शब्दाचा अर्थ आहे अक्ष!  ध्रुव तारा हा एकमेव तारा असा आहे की जो आपले स्थान सोडत नाही हे आपल्याला उघड्या डोळ्यांना देखील स्पष्ट दिसते. व आकाशीतील बाकी सर्व तारे ध्रुव ता-याभोवतीच पुर्वेकडुन पश्चिमेकडे वर्तुळाकार भ्रमण करताना आपण पाहु शकतो. व ह्या भ्रमण करणा-या ता-यांमध्ये ध्रुवाच्या अगदी जवळ असलेला सप्तर्षी हा तारकापुंज, भ्रमण करताना अक्षरशः जाणवतो. मावळताना सप्तर्षी देखील इतर नक्षत्रांप्रमाणे उलटा झालेला दिसतो.

खालील चित्रांमध्ये पहा सप्तर्षी

stargazing near Pune

पुण्यातुन पाहताना , उगवताना सप्तर्षी असा दिसतो.

Stargazing near Pune

सप्तर्षी, ध्रुव तारा.
रोमन कथे मधील छोटे व मोठे अशी दोन्ही अस्वले .

stargazing near Pune

अशा प्रकारे सर्व तारे ध्रुव पा-याभोवती फिरतात.

पुण्यातुन पाहिले की सप्तर्षी उगवताना व मावळतानादेखील दिसतो. हेच आपण जर आणखी उत्तरेकडे जाऊन जर सप्तर्षीची उगवणे आणि मावळणे पाहण्याचा प्रयत्न केला तर, अगदी उत्तर ध्रुवावर सप्तर्षीचे उगवणे आणि मावळणे नसणार आहे. सप्तर्षी धुर्व ता-याभोवती फिरताना दिसेल. आपणास ध्रुव तारा, क्षितिजाच्या अगदी थोडासाच म्हणजे साधारण हातभर वर दिसतो. पण जसे जसे उत्तरेकडे आपण जाऊ तसतसे ध्रुव आकाशामध्ये उंच उंच गेल्याचे जाणवेल.

 

सप्तर्षीस आधुनिक खगोलशास्त्र अर्सा मेजर (Ursa Major) या नावाने ओळखते. मेजर आणि मायनर असे दोन अर्सा म्हणजे अस्वलं दोन तारामंडलांच्या रुपाने पाहीली जातात. सप्तर्षी म्हणजे अर्सा मेजर व त्याच्या बरोबर विरुध्द दिशेला ध्रुव ता-याच्या पलीकडे (ध्रुव ता-यासहित) अर्सा मायनर आहे.

आता पाहुयात सप्तर्षीची चित्तरकथा.

विविध संस्कृतींमध्ये सप्तर्षीस विविध नावांनी ओळखले जाते. आकाशातील ता-यांना कल्पनाशक्तीच्या आधारावर रेषांनी जोडुन मानवाने विविध चित्रे आकाशामध्ये चितारली आहेत. कुणाला या सात ता-यांमध्ये मध्ये ऋषी मुनी दिसतात, कुणाला अस्वल तर कुणाला तिर्डी दिसते.

भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासुन सप्तर्षींचा उल्लेख वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आलेला दिसतो. विष्णुपुराणामध्ये त्या सातही ऋषिंचे नावे येतात ज्यांनी वेदांच्या निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. ते सप्तर्षी पुढील प्रमाणे आहेत. वशिष्ठ, कश्यप, अत्रि, जमदग्नि, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज. भारतीय दर्शनांमध्ये अगदी वैदीक काळापासुन ते रामायण महाभारत तसेच विविध पुराणांमध्ये तत्वचिंतनासोबतच तत्वदर्शनामध्ये अतिशय महत्वपुर्ण योगदान दिलेले हे सात महर्षी, तारामंडळाच्या रुपाने अजरामर झाले आहेत. शतपथ ब्राम्हण,कृष्ण यजुर्वेद,महाभारत, बृहत संहिता आणि जैन साहित्य आदींमध्ये सप्तर्षींचा उल्लेख आहे.

प्राचीन भारतीय साहित्यामध्ये सप्तर्षींचा उल्लेख

प्राचीन भारतीय साहित्यामध्ये सप्तर्षींचा उल्लेख

निसर्गशाळेच्या कॅम्पसाईटवर एकदा एक निवृत्त न्यायाधीश निसर्गपर्यटनासाठी आले होते. माझा आकाशदर्शनाचा कार्यक्रम सुरु असताना मी, सप्तर्षी विषयी माहीती सांगत असताना, मला मध्येच थांबवत त्यांनी त्यांच्या बालपणी ऐकलेली माहिती सांगितली.  सप्तर्षीला ग्रामीण भागात बुढीच खाटलं (खाट) म्हंटल जायच. चौकोनातील चार तारे म्हणजे ती म्हातारीची खाट आणि मागचे तीन तारे (वरगळ्याचा दांडा) तीन चोर. ते तीन चोर म्हातारीच्या बिछान्याखालील सोन चोरण्यासाठी आलेले आहेत , अशी काहीशी ती कथा आहे.  अशा कथा थोड्याअधिक फरकाने भारतात सर्वत्र प्रचलित आहेत.

सप्तर्षीमध्ये वर उल्लेख केलेला आठवा तारा, म्हणजे अरुंधती आहे. अरुंधती – वसिष्ट (mizar and alcor) अशी ही जुळ्या ता-यांची रचना देखील आपल्या पुर्वजांना हजारो वर्षापुर्वीपासुन माहित असुन, ते दोन्ही तारे एकमेकांभोवती फिरत असतात, हे देखील आपल्या पुर्वजांना माहित होते. हजारो वर्षापुर्वी ह्या जुळ्या ता-यांच्या भ्रमणाविषयी माहित असणे म्हणजे देखील एक आश्चर्यच आहे. नवविवाहित दांपत्यास अरुंधती आणि वसिष्ट दाखवले जातात. व ही प्रथा आजदेखील काही ठिकाणी प्रचलित आहे.

अरुंधती वसिष्ट- Mizar and Alcor

अरुंधती वसिष्ट- Mizar and Alcor

भारताप्रमाणे रोमन संस्कृतीमध्ये देखील या सात ता-यांची कथा आहे. कॅलिस्टा नावाची एक सुंदर स्त्री, जंगलामध्ये शिकारीसाठी जाते. थकल्यानंतर ती थोडी विश्रातीसाठी पाठ टेकवते. ज्युपिटर नावाचा एक देव, तिच्या सौंर्द्यावर भाळतो. ज्युपिटर ची बायको मात्र कॅलिस्टा च्या सुंदरतेवर जळते. काही काळाने, कॅलिस्टा एका मुलास जन्म देते. त्याचे नाव अर्कास असे असते. ज्युपिटरची बायको, ज्युनो, मात्र आता जास्तच चिंतीत होते. व रागाच्या भरात, ती कॅलिस्टाला अस्वल करुन टाकते जेणेकरुन ती सुंदर दिसणार नाही. अस्वल बनल्यावर ती जंगलामध्ये फिरत राहते. अर्कास मात्र जंगलामध्येच शिकारी म्हणुन वाढतो. एक दिवस कॅलिस्टा अचानक अर्कास ला पाहते, व ती स्वतः एक अस्वल आहे हे विसरुन अर्कास ला मिठी मारण्यासाठी त्याच्याकडे झेप घेते. अर्कास तिच्यावर एक बाण सोडतो कारण त्याला वाटते की अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला आहे. ज्युपिटर देव त्वरीत तो बाण मध्येच थांबवुन, अर्कास ला देखील एक छोटे अस्वल करतो,  व दोघांना एकमेकांच्या शेपटास बांधुन स्वर्गामध्ये भिरकावुन देतो. तेव्हा पासुन ही दोन्ही अस्वले, आकाशामध्ये आनंदाने राहत आहेत. मोठे अस्वल आणि छोटे अस्वल.

 

मुळ अमेरिकन संस्कृतीमध्ये (Micmac Indians) देखील या सात ता-यांची एक कथा येते. या कथेमध्ये तीन शिकारी (वरगळ्याचा दांडा) एका अस्वलाची (चौकोन म्हणजे वरगळ्याच मुख्य भांडं) शिकार करण्याची कथा येते.

अरबी लोकांना या सात ता-यांमध्ये एक प्रेतयात्रा दिसली. चौकोनातील चार तारे म्हणजे प्रेत आणि दांड्याचे तीन तारे म्हणजे प्रेत यात्रेमध्ये मागे चालणारे व दुःखी होऊन रडणारे लोक, अशी रचना अरबी लोकांना दिसते. अल-नाश नावाच्या एका माणसाची ही प्रेत यात्रा आहे. अल-नाश चा खुण अल-जादी या माणसाने (ध्रुव तारा) याने केला आहे.

अर्वाचिन युरोपमध्ये या तारकामंडलास नांगर म्हंटले जायचे तर चीन मध्ये यास राजाचा रथ म्हणुन ओळखले जायचे. जर्मनीमध्ये या नक्षत्रास, ओडीन देवाची गाडी म्हंटले जायचे.

आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाने, सप्तर्षीच्या दिशेला आकाशगंगा शोधल्या आहेत. M81, M82, Pinwheel Galaxy (M101) अशी नावे ह्या आकाशगंगांना दिली आहेत. पृथ्वीपासुन ८० प्रकाशवर्षे दुर असणा-या या नक्षत्रामध्ये सर्वात मोठा तारा आपल्या सुर्यापेक्षा आकाराने चौपट आहे, तर तापमान सुर्याच्या तापमानापेक्षा दुप्पट आहे.

ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पुण्यातुन सप्तर्षी पाहण्यासाठी, पहाटे उत्तर पुर्वेला पाहावे लागेल. तर एप्रिल मे मध्ये संध्याकाळी अंधार पडल्याबरोबर लगेचच सप्तर्षी उगवलेला दिसेल. पण लक्षात ठेवा सप्तर्षी किंवा अन्य कोणतेही तारे पाहण्यासाठी शक्यतो शहरापासुन दुर, धुळ आणि प्रकाशप्रदुषण नसेल अशा ठिकाणी तुम्हाला जावे लागेल.

आपल्या डोक्यावरील आकाश आणि त्यातील अब्जावधी तारे, हजारो वर्षापासुन मनुष्यास खुणावत आहेत. प्राचीन मनुष्य आणि आधुनिक मनुष्य दोघेही समान कुतुहलाने अंतरीक्षाकडे पाहत आले आहेत.

Facebook Comments

Share this if you like it..