भोरगिरी ते गुप्त भीमाशंकर टप्पा

सहभागी सदस्य - अरविंद, अनिकेत, अनिल, शशांक, शहाजी आणि हेमंत
खरतर हा एक जम्बो ट्रेक आहे किमान चार दिवस लागतील. पण हल्ली झालेल्या दळणवळणाच्या सुविधामुळे आम्ही दोन दिवसात करु शकलो. घरून निघतानाच आजार सोबत घेऊन निघालो होतो. वाटेत एका औषध दुकानातून प्रतिजैविक सोबत घेतली आणि न चुकता तीन दिवस सकाळ संध्याकाळ त्यांचं सेवन देखील मी केलं. अर्थात हा आगाऊ पणा आहे, आजारी असताना असे फाजील प्रकार करू नयेत. पण माझ्यामुळेच आधीच एक दोनदा भ्रमंती पुढे ढकलली गेली असल्याने, मला इतरांना नाराज करायच नव्हतं.
प्रवास स्वतःच्या गाडीने भोरगिरी गावपर्यंत केला. पुण्यातुन ४ वाजता निघालो आम्ही आणि सायं ७ वाजता भोरगिरी गावात पोहीचलो. गाडी तिथे पार्क करून खरतरं गडावर मुक्कामाचे नियोजन होते पण स्थानिकांकडून बिबट्या विषयी समजले. काही दिवसांपूर्वी एका मनुष्यास बिबट्याने ठार केलेलं. त्यामुळे गडावर जाऊ नये असा अनेकांचा सल्ला आला. ठरलेल्या नियोजनाला पहिला खो बसला. गावात प्रवेश केला की लागलीच डावीकडे कोटेश्वराचे मंदिर लक्ष वेधून घेते. दुसरं कुठं शक्य नसेल तर या मंदिरात मुक्काम शक्य आहे. आम्ही गावातच एका घरी मुक्काम केला. पहाटे लौकर उठून गडावर गेलो.
भोरगिरी किंवा यांस भोरगड असेही म्हणतात. अतिशय छोटा किल्ला आहे. इतिहासात नोंदी अजिबात नाहीत. गडावर भोरगिरी बाबा म्हणजे महादेवाचे एका गुहेत देवालय आहे. तर आनखी एका गुहेत महालक्ष्मी देवीचं ठाण आहे. गडावर पाणी मुबलक आहे. बालेकिल्ल्यावर देखील अनेक टाकी आहेत. शिबंदीची घरांची जोती, पडझड होऊन बांधकामांच्या दगडांचे अनेक ढिगारे दिसतात. ईशान्यला एक शरभशिल्प आहे. एक बलरामाची मुर्ती देखील आहे जिच्या एका हातात नांगर व दुसऱ्या हातात गदा दिसते. त्याच्याच पुढे पडझड झालेला एक बुरुज आहे थोडं खाली, कड्याला लागून एक खोदीव टाके आहे. याच टाक्यात एक वीरगळ देखील आहे. सुदैवाने ही गळ सुस्थितीत आहे कारण ऊन पाऊस वाऱ्या पासुन ही, टाक्यात असल्याने सुरक्षित आहे.

बालेकिल्ला अतिशय छोटा आहे. पूर्ण गडाचा पठार की ज्यास अधित्यका असे म्हणणात तो फिरण्यास वीसेक मिनिटे पुरेशी आहेत. पश्चिमेला देखील ढासळलेल्या तटबंदीचे / बुरुजचे अवशेष दिसतात. त्यावर उभे राहून समोर पश्चिमेला दुरवर भीमाशंकर अभयारण्य दिसते, अर्थात भोरगिरी किल्ला देखील याच अभयारण्याचा भाग आहे. चार ही बाजूला सरळ सोट कातळ कड्यानी नैसर्गिक तटबंदी मिळालेली आहे. हा डोंगर गड वा किल्ला म्हणुन वापर करण्याच्या अगोदर पासुन कदाचित या डोंगरावर विरक्त साधकांचा वास असावा. शैव संप्रदायचं हे देखील एखाद मोठं पीठ असू शकेल. गिरीकंदरात आत्मलीन होण्यासाठी, विश्वाच्या कोड्याची उकळ करण्यासाठी याहून श्रेष्ठ आवास असुचं शकत नाही. अर्थात तो काळ हजारो वर्षांपूर्वीचा असेल हे देखील तितकेच खरे. आता हा डोंगर वन खात्याच्या ताब्यात आहे. गडवाटेवर एक आणि अधित्यकेवर दुसरे अशी दोन निवारा स्थाने ( पॅगोडा ) शुद्ध सिमेंट मध्ये बनवले आहेत. गड माथ्यावर वर आम्हाला एक ससा दिसला. गड वास्तुची वाताहत झालेली आहे. शिवकाळाशी नातं सांगणारे धागे दोरे नाहीत.. पण नाते असलेच पाहिजे असे वाटते कारण कोकनातुन देशावर जाणाऱ्या अनेक वाटापैकी एका वाटेवर या किल्ल्यावरून लक्ष ठेवणं सहज साध्य आहे.
आम्ही महालक्ष्मी मंदिराच्या गुहेत नाश्ता करून, गड उतरलो.
पुन्हा गाडीकडे जाऊन, सर्व पिशव्या पाठीवर लादुन, गुप्तभीमाशंकर कडे प्रस्थान केलं. सुमारे दहाच्या आसपास चालण्यास सुरुवात केली. जस जसे आपण भीमाशंकरच्या जवळ जातो तसतसे जंगल दाट होत जाते. सुरुवातीला झाड झुडुप वेली दिसतात तर नंतर महावृक्ष, महावेली दिसु लागतात. भीमाशंकर हे अनंत औषधी वनस्पतीचे भांडार आहे. इथल्या वनस्पतीच्या अभ्यासाला जन्म अपुरा पडेल एखाद्यास एवढी समृद्धी अजूनही आहे.
वन खाते एक नवीन गाडीवाट भोरगिरी गावापासुन भीमाशंकर पतुर करीत आहे. काम बऱयापैकी झालेले आहे. खरतर अश्या रस्त्याची गरज नाहीये. हे टाळले पाहीजे. नवी होत असलेली गाडीवाट जिथे संपते तिथे खुप कचरा दिसला. कचरा म्हणजे बाटली बंद पाणीच्या मोकळ्या बाटल्यांचा अक्षरशः खच होता.
वीरभद्र अथवा बलराम - उजव्या हातात नांगर आहे डाव्या हातात गदा दिसते आहे. महिषासुर मर्दिनी देवीची मुर्ती आहे असाही एक कयास आहे जो अधिक रास्त वाटतो.

या वाटेने जाताना हनुमान लंगुर, माकडं, ससे हे वन्य प्राणी सहज दिसतात. रानडुक्कर, साळींदरं यांचे उकीर दिसतात. जंगली माकडांचे आलार्म कॉल ऐकु येतात तर असंख्य प्रकारच्या पक्ष्यांचे सुमधुर गाणं देखील सतत सोबत करते. थोडं सावकाशीन जंगल पाहत पाहत गेल तर निसर्गाची असंख्य रहस्ये इथे दिसतील. त्यातीलच एक भाग म्हणजे रात्री चमकणारी बुरशी. ही बुरशी कुठे आहे याचा प्राथमिक अंदाज आला आहे. पावसाळ्यात इकडे फकस्त ती बुरशी पाहण्यासाठी यावंच लागतंय. जंगलात प्रामुख्याने अंजनी, अहीन, अर्जुन, भुत्या, आंबा, शिडम, हिरडा, बेहडा, बेल, तेंदू, देशी बदाम, खैर असे वृक्ष आहेत. तर कारवी देखील खुप मोठ्या प्रमाणात आहे. कारवी ची पाने या भागातील थोडी कमी रुंद व कमी लांब आहेत. कारवी खाली गांडूळानी नांगरलेली जमीन दिसत जाते . माकडलिंबू ची झाडे देखील खुप आहेत. कडीपत्ता तर आहेच. ट्रेकर लोकांच्या परिचयाची दातपडी मुबलक आहे. सध्या ती फुलोऱ्यावर आहे. अंजनीचा फुलोरा लक्ष वेधुन घेतो. प्रसंगी दुरवरून अख्खे झाडच जांभळ्या रंगाचं दिसू लागत. इथला पळस अद्याप फुलला नाही. करवंदाच्या जाळ्या बहरू लागल्या आहेत तर हेंकळ ने फळ धारणा केली आहे. मध्येच पिसा ची रक्तवर्णी फुल कधी झाडावर तर कधी पायवाटेवर पडलेली दिसतात.

भीमा नदीचा अगदी झुळूझुळू वाहणारा, सहज उडी मारून ओलांडता येईल अश्या प्रवाहाप्रत आपण पोहोचतो. तिथेच एक स्मृतीशिळा देखील आहे, प्रवाहाच्या पल्याड. मळलेली वाट थोडी उजवीकडे गेल्यासारखी वाटते खरी पण तीच वाट धरावी. आता पर्यत साथ देणारे सर्वच वन्य जीव खाणाखुणा, त्यांचं अस्तित्व येथुन पुढे खूपच जास्त होत जातं. सपाटी सोडून चढाई सुरु केल्यावर जंगल अजूनच जास्त घनदाट होत जातं. आणि याच दांडाच्या गर्द झाडीमध्ये, झाडाच्या एका शेंड्यावरून, फांदीवरून दुसऱ्या फांदीवर झेपावणारी भीमाशंकरी खारुताई चं पहिलं दर्शन आम्हला झाल. हा प्राणी महाराष्ट्राचा ‘राज्यप्राणी’ आहे. शेकरू चे दर्शन होणं म्हणजे भटकंती सार्थकी लागण होय.

शेकरू म्हणजे भीमाशंकरी खारुताई तुम्ही पाहिलीये का कधी? तर सर्वात शेवटच्या विडिओ मध्ये पहा शेकरू..
अजुन साधारणपणे अर्ध्यातासात आम्ही गुप्तभीमाशंकर पाशी पोहोचु.
भीमाशंकर येथील जंगल
टिप – भोरगिरी ते भीमाशंकर ही एक रम्य भटकंती आहे. आम्हाला दोन तास लागले. यापेक्षाही हळुवार चाललं पाहिजे. चार लागले तरी उत्तम. खुप अवघड आहे असे नाही. ज्यांना चालण्याची सवय आहे असे कुणीही करू शकतात. एकट्या दुकट्याने करू नये. तुमचा नेहमीचा सदस्य परिवार असला पाहिजे सोबत. हल्ली माणिकडोह येथुन भीमाशंकर अभयारण्यात बिबटे सोडले असल्याचे खात्रीपूर्वक समजले. त्यातीलच एक नरभक्षक झाला आहे. पण बिबट्या आहे म्हणुन उगाच आरडाओरडा करीत जाऊ नये. ज्यांना भीती असेल त्यांनी जाऊच नये इतक्यात, थोडं थांबावं, बातम्या पाहाव्यात, बिबट्या पुन्हा पकडला गेला असे समजले की मग नियोजन करावे.
(गुप्त भीमाशंकर ते भीमाशंकर टप्पा
भीमाशंकर या भागात सर्व प्रथम मी आलो होतो तो अगदी लहान असताना बाबूजींसोबत एका मेटॅडोर नावाच्या प्रवासी वाहतुक करणाऱ्या गाडीत. सात आठ वर्षांचा असेल तेव्हा मी. श्रावणी सोमवार निमित्त बाबूजी आणि त्यांचे ऑफिस मधील मित्र यांची सहल होती. तेव्हा त्या मोठ्या माणसांच्या गप्पामधील भीमाशंकर ला वाघ असतात हे त्यावेळी चांगलेच मनात बसले. त्याचं प्रवासात मी त्या गाडीच्या खिडकीतून डोंगरांकडे पाहायचो. डोंगरकडयांना कपारी दिसल्या की मला वाटायचं त्या सर्वच्या सर्व वाघाच्या गुहा आहेत. त्यावेळी पाहिलेले ते डोंगरांचे आणि भीमाशंकर येथील अंगाला भिडणाऱ्या तुषार युक्त ढगांचे, शेवाळलेल्या झाडांच्या खोडांचे चित्र आजही मन:पटलावर धुसर धुकट जरी असले तरी ताजेतवाने आहे. गाडीतील मोठ्यांच्या गप्पातुन एवढे समजलं होत की घोडेगाव मार्गे आम्ही भीमाशंकर ला गेलो होतो.
 
त्यानंतर भीमाशंकर केलं ते डोंगरयात्रा सुरु केल्यानंतर म्हणजे अंदाजे 1999 च्या आसपास. कोकणातुन गणपती घाटाने एकदोन किल्ले करून, पदरगडाच्या पायाथ्याला जंगलात उघड्यावर मुक्काम करून, भीमाशंकर अशी ती भटकंती होती.
 
त्यानंतर साधारण पणे २०११ च्या सुमारास हिरेमठ काका आणि दिलीप निंबाळकर या दिग्गजनांसोबत लोणावळा भीमाशंकर ट्रेक केला चार दिवसाचा. यात नाखिंद्या वरून भीमाशंकर असा डोंगर मार्ग होता. तेव्हा देखील जंगलात वाट चुकल्याने उघड्यावर मुक्काम करावा लागला होता. तेव्हा सांभरं, भेकरू, शेकरू अगदी जवळून पाहिले.
 
त्यानंतर हल्ली म्हणजे अगदी तिनेक वर्षांपूर्वी आता जे सदस्य आहेत त्यांच्यासोबतच खांडस मार्गे शिडीच्या वाटेने कोकणातुन आरोहन केलं.
आणि आता भोरगिरी मार्गे भीमाशंकाराच्या महा वलयामध्ये प्रवेशत आहोत. याचा अर्थ चार ही दिशानी भीमाशंकर ला प्रवेश करण्याची संधी मला आजपतुर मिळाली आहे. कितीदा जरी आल इकडे तरी हे जंगल नित्य नुतन भासते. या चारच नाही तर अजूनही अनेक वाटा, घाट वाटा, नाळी भीमाशंकर ला जाण्यायेण्यासाठी वापरात आहेत. अजुन ट्रेक रूट्स आहेत. शक्य होईल तसे भविष्यात करणार आहेच.
गुप्तभीमाशंकर कडे जाण्यासाठी भोरगिरी कडुन येताना, सपाटी सोडल्यानंतर अर्धा तास चाललं की मुळं मळलेल्या वाटेला एक डावीकडे फाटा फुटतो. तिथुन अवघ्या पाच मिनिटांवर गुप्तभीमाशंकर हे स्थान आहे. इथे एक शिवलिंग एका छोट्या धबधबयाच्या खाली थोडे बाजुला आहे. पाण्याचा प्रत्यक्ष प्रपात जरी या पिंडीवर पडत नसला तरी उन्हाळ्याचं दोनेक महिने सोडले तर ही पिंड पाण्यातच असते. महादेवाचं हे प्रतीक इथं पाण्यात गुप्त होऊन जाते म्हणुन यांस गुप्त भीमाशंकर म्हणतात. हा जो पाण्याचा प्रवाह आहे हीच भीमा नदी होय.
तस पाहता हा परिसर अतिशय पवित्र आहे मनुष्यासाठी. पण इथे मनुष्याने बकाल पणा आणला आहे. पाण्याचा प्रवाह तर आहे पण त्याकडे पाहवत नाही इतका तो गलिच्छ झालेला आहे. नाना प्रकारचे प्लास्टिक wrappers, पाण्याच्या बाटल्या, साबणाची वेष्टने, बियर च्या मोकळ्या बाटल्या, असा मनुष्य निर्मित कचरा त्या प्रवाहात मोप दिसतोय. जिथे पिंड आहे तिथं अगदी समोरच अस्वच्छता इतकी आहे की ती पाहुन मला तिकडे जावेसे देखील वाटले नाही. महादेव अश्या गलिच्छ ठाणी वास करणारे नाहीत. गिरीकंदर का आवडतात त्यांना कारण त्यात स्वच्छता असते, शांतता असते, पावित्र्य असते. यावेळी मला गुप्त भीमाशंकर ला जाऊन, हे सर्व पाहुन अत्यंत वाईट वाटले. कोण आहेत हे कचरा करणारे लोकं? कोण जबाबदार आहे यासाठी?
याला जबाबदार आपण सारेच आहोत. ज्या ज्या व्यक्तीने कचरा केला ती कुणाचा ना कुणाचा मुलगा मुलगी असेल त्या पालकांचा दोष, ती व्यक्ती ज्यांचा मित्र असेल त्या मित्राचा दोष आहे, त्या व्यक्तीने ज्या संप्रदायच्या गुरु महाराजाचं कीर्तन प्रवचन ऐकलं असेल कधी त्या महाराजाचा दोष आहे आणि सर्वात मोठा अपराधी कोन आहे तर शिक्षक.. हो. आपले शिक्षक अद्याप वरील पैकी कुणालादेखील हे शिकवु शकले नाहीत की कचरा निसर्गात टाकु नये. जिथे त्या
कचऱ्याची नीट विल्हेवाट लागेल अश्या ठिकाणी तो गेला पाहिजे. जेव्हा जेव्हा मला कचरा दिसला तेव्हा तेव्हा मी व्यथित होऊन त्या त्या शिक्षकाना आठवले, नाईलाज, अगतिकता, उद्विगणता, क्रोध, किव असे अनेक भाव एकाच वेळी मनात येतात आणि हे नेहमी होत असते डोंगरयात्रा करताना आणि इतर वेळी देखील.
आम्हाला दिसलेल शेकरु, गुप्तभीमाशंकर येथुन तीर्थ भीमाशंकर ला जाताना वाटेत.
मी लहान असताना ज्या माणसांसोबत डोंगरयात्रा केल्या त्यांनी सांगितलेला विचार आजही आठवतो आणि ‘त्या दोषी’ माणसांच्या यादीत मी नाहीये हे उमजून आनंद होतो. मी देखील शिक्षक आहे, पालक आहे, मित्र आहे माझ्यापरीने मी माझ्या अवती भोवती जमेल तसे जमेल तेवढे तर्कबुद्धीला पटेल असे या विषयावर सांगत असतोच मनापासून.
निसर्गात किंवा आपण राहतो तिकडे देखील प्लास्टिक कचरा आपण विल्हेवाट लागणार नाही, विद्रुपीकरण होईल, दुर्गंधी तयार होईल अश्या पद्धतीने टाकला तर हे खुप मोठं पापकर्म आहे. कर्म कोणतेही असो त्यासोबत त्या कर्माच फळ देखील मागोमाग मिळतचं. जो जो मनुष्य हे पाप कर्म करील त्याला त्याला स्वतःच्या जीवनात कचऱ्यासारखी वागणुक, अपमान, दुःख, यातना भोगावायचं लागतात. अशी कर्मफळं भोगणारी माणसं मी पाहतोय. त्याना मातर हे ठाऊक नसतं की त्यांच्या वाट्याला असे भोग का आलेत.
असो. गुप्तभीमाशंकर जवळ थोडा वेळ घालवुन आम्ही तीर्थ भीमाशंकर कडे निघालो. ही हलकी चढण आहे. गर्द हिरवाईतुन चलताना थकवा येत नाही. तुम्ही जितके शांत, आवाज ण करता चालाल तितकी निसर्गाच्या अद्भुत सृजनाकडे तुमचे लक्ष जाईल. या वाटेवर असताना आम्ही पुन्हा शेकरू पाहिले. एक नव्हे दोन पाहिली ती देखील अवघ्या दोनच मिनिटांत. मोबाईल मध्ये फोटो देखील काढले आम्ही.
भीमाशंकर मंदिरात सर्वानी आत जाऊन दर्शन घेतले, मी बॅगांवर लक्ष ठेवत बाहेरच थांबलो. पुढे हाटेलात दुपारचं जेवणं केलं आणि कोंढवळ या गावाला जाण्यासाठी आम्ही तयार झालो.
भीमाशंकर देवस्थान
भीमाशंकर देवस्थान
तीर्थ भीमाशंकर - गायदरा - सिद्धगड पायथा टप्पा
दुपारचं जेवणं हाटेलात करून, आम्हाला सिद्धगड कडे निघायचं होत. सिद्धगड भीमाशंकर अभयारण्याचाच भाग आहे. भीमाशंकर मुख्य मंदिरापासून उत्तरेला, भीमाशंकर डोंगर रांगेपासुन थोडा तुटक असा हा किल्ला कोंढवळ गावापासुन गायदरा या घाटाने उतरून करायचा आहे. पण भीमाशंकर ते कोंढवळ हे अंतर देखील खुपच जास्त आहे. म्हणजे किमान 8 किमी चे हे अंतर चालत जाऊन, कोंढवळ ला पोहोचणे, आणि तेथून पुढे सिद्धगड घाट म्हणजेच गायदरा घाटाने खाली उतरून, सिद्धगड गाठणे ते ही अंधार पडण्यापूर्वी अशक्य होते. म्हणुन आम्ही कोंढवळ पतुर गाडी प्रवास करायच ठरवलं. एक स्थानिक वडाप जीप मिळाली. त्या चालकाने आम्हाला कोंढवळ गावाच्याही पुढे असलेल्या गवांदेवाडीच्या पुढे काही अंतरावर सोडले.
इथे वाटाड्या शोधायला ड्रायवर गेला आणि सोबत दोन जणांना घेऊन आला. यातील एक जण वाटाड्या म्हणुन येणार असे ठरले तर दुसरा बिनकामाचाच सोबत येणार म्हणु लागला. हा दुसरा गडी जो होता तो हिले डुले महानआत्मा फुले होता. नको नको म्हणताना वडाव ला मागे जाऊन चिकटला आणि उतरायचं नांवचं घेईना. अनेक विनंत्या करून देखील गडी पायुतार होईना. शेवटी अस्सल ग्रामीण बाजात त्याला दम भरावा लागला आणि महानआत्मा खाली उतरला. उतरताना मला दम भरला पठ्ठ्याने. म्हणाला, ” मला उतरवता काय, मी हितला हाये ” त्यावर मी म्हणालो, ” व्हयं व्हयं आम्ही काय आभाळातून नाय पडलो आम्हीबीं हितलेच हाये”. नंतर वाटाड्या कडुन समजले की तो भीमाशंकर ला जाऊन मद्यपान करून आला होता. भीमाशंकर ला जाण्याच्या प्रेरणा कुणाच्या काय तर कुणाच्या काय? असो.
सगळेच्या सगळे डोंगर घनदाट वृक्षराजिने गच्च भरले आहेत. खुप उंच झाड, पशु पक्ष्यांचे आवाज, माकडं, वाणरांचे आवाज आपली साथ देतात. कापशी घार, तुरेबाज गरुड, नेहमीचे छोटे पक्षी दिसलं. एवढंच काय तर चक्क गोमेट म्हणजेच मिनीव्हेट हा अतिसुंदर पक्षी देखील दिसला. शिंजीर, बुलबुल, ग्रीन लीफ बर्ड देखील दिसतात. एक फुरसं पाय वाटेवर पहुडल होत, ते अनिल ला सर्वप्रथम दिसलें.
या वाटेने एक मैलाचा दगड गाठायचा असतो तो म्हणजे चुना भट्टी. चुना भट्टी ही एक भग्न,झालेली, पडझड झालेली वास्तु आहे. साधारण १५ बाय ३० फुट असे दगडी बांधकाम आहे. भिंती पडलेल्या आहेत त्यामुळे तिथे वास्तु असावी असे वाटतं नाही, ढिगारा दिसतोय. नीट पाहिल्यावर समजते की बांधकाम आहे.
जपके मामानी सांगितल्याप्रमाणे ही इंग्रजानीं बांधलेलं आहे. आता चुना भट्टी हेच नाव रूढ आहे. खाली फोटो पाहु शकता. इथून पुढच्या जंगल भागाला भट्टी असे संबोधलं जातं स्थानिकांकडून. इथून पुढे एक हलका चढ लागतो. जंगल देखील चांगल आहे. अनेक झाडांना दगडांचे ओटे केल्याचे दिसतात. ही अतिशय स्पष्ट खुण आहे, ही झाडे, ओटे दिसलें की समजावे आपण बरोबर वाटेवर आहोत. साधारण अर्धा एक तास चालून आपण गाय दऱ्याच्या तोंडाशी पोहोचतो. इथून खाली घाटवाट उतरते. घाटवाटेच्या उजवीकडे आहुपे डोंगररांग दिसते. ही डोंगर रांग पश्चिमेला सरळ एका कातळ कड्याचे रूप घेते. किमान हजार फुटाची उडी भयंकर दरी, मध्ये गायदरा आणि लगेच डावीकडे सुरु होतो दमदमा डोंगर. इथे उभे राहून दिसणारा सह्याद्री राकट तर दिसतोच पण त्याहून तो सुंदर अधिक भासतो. कारण त्या राकट पणाला गर्द हिरवाईने सौंदर्याची किनार लाभलेली आहे इथे. हवेत गारवा, खोल निळं आकाश, एकदम हळुवार पाण्याची छोटीशी धार, समोर अगदी ७० अंशाच्या कोनात उतरणारा गायदरा घाट, त्याच्याही पुढे खाली दिसणारे कोकण. सगळा नजारा अद्भुत आहे. आम्ही सात जण सोडलो तर मानवी जीवनाच्या खाणाखुणा आज्याबत दिसत न्हाईत इकडं.
जपके मामानी पुढची वाट नीट समजावून सांगितली. त्यांचा अनुभव दाडगा. आणि आम्हाला देखील त्यांनी चांगलंच ओळखलं होत. आमची चालण्याची क्षमता लक्षात घेऊन त्यांनी पुढच्या कोणत्या टप्प्यावर पोहोचायला किती वेळ लागेल हे सांगितले. खाणाखुणा नीट सांगितल्या. मामांना निरोप दिला आणि आम्ही उतरणीला लागलों.
कोंढवळ गाव
ही उतरण, हा घाट अजबच आहे. म्हणजे असे की एखाद्या इमारतीच्या जिन्या असतात ना, झीग झॅग तसाच अख्खा घाट. म्हणजे दहाएक फुट डाव्या बाजुला की लगेच उजवीकडे, पुन्हा डावीकडे, पुन्हा उजवीकडे. ही डावी उजवी संपायचं नाव काही घेत नाही. त्यात आणखी गम्मत अशी की पायऱ्या न्हाईत आज्याबात. नुसत्या निसटत्या छोट्या मोठ्या दगडी. जगभरात दगडांचे असतील नसतील तेवढे आकार, आकृत्या इथे पाहायला मिळतात. हे दगड काही वेळाने इतके असह्य होतात की माझ्यासारख्या, प्रमाणापेक्षा जास्त वजन असलेल्या माणसाला एकेक पाऊल उतरणे औघड होऊन जावे. या दगडांतून चालण्याची एक पद्धत असते. ती अशी की तुम्ही एका दगडावर फार वेळ पाय ठेवून थांबु नये. जितका वेळ तुम्ही पुढचे पाऊल टाकायला लावाल तितके तुम्ही अधिक वैतागणार. ज्यांचे वजन वाढलेले आहे अश्याचे पाय पिंडऱ्याना थरथर कंप सुटू शकतो. ही झीग झ्याग म्हणजे नागमोडी निसटत्या दगदांची वाट चक्क ७० अंशात खाली उतरते. एखादी नाळ उतरावी अगदी तसाच अनुभव, नाळीत असतात त्यापेक्षा दगड मात्र छोटे आणि मोकळे. पाय ठेवला की दगड हललाचं. त्या दगडानां समजून घ्यायला दहाबारा मिनिटे लागतात. हळू हळु तुम्हाला स्वतःची हा घाट उतरायची पद्धत सापडते. सायंकाळची वेळ, सावळीतून वाट, चढ आज्याबात नाही तरीही इथे घामाघूम व्हायला होत.. कारण ही दगड धोंड्यांची ‘वाट लावणारी’ वाट.
अर्धा तास उतरून आलो की मग दगड धोंडे कमी होत जातात, आणि मातीचा घसारा असलेली नागमोडी वाट लागते. ही पण वाट निसर्डी घसर्डी आहे.
चुना भट्टी - इंग्रजींनी बांधलेली वास्तु आहेअसे स्थानिक सांगतात. आता पडझड झाली आहे.
साधारण पाऊण तासाने मला एक प्लास्टिकचं रॅपर दिसलं.
घाटमाथ्यावरून उतरायला सुरुवात केल्यानंतर त्याही खुप आधी पासून मानवी जीवनाच्या खाणाखुणा दिसल्या नव्हत्या. कचरा दिसला नव्हता. कचरा नसण, नं दिसणं म्हणजे भारिच पण आता दिसलेला तो प्लास्टिकचा तुकडा, कदाचित च्यूइंमगचं रॅपर असेल ते, ते पाहुन हायस वाटलं. काहीतरी खूण दिसली आणि आम्ही जवळ आहोत मानवी वस्ती च्या असं वाटलं. अजूनही उतरण सुरूच होत. साधारण अजुन एक दहा मिनिटे चालल्यांनतर पायवाटेच्या डाव्या बाजुला एक मोठा वृक्ष दिसतो ज्यावर कोयत्या कुऱ्हाडीने डावीकडे बाण काढून खूण केलेली आहे. ही खूण फार जुनी नाही. इथूनच डावीकडे उतरायला सुरुवात करायची. उतरणं अजूनही सुरूच होत. पुढे पुढे मळलेल्या वाटेने उतरत राहिलो तर अजुन एक वाट उजवीकडे जाते, तिकडे गेलो आपण तरी १०० टक्के चुकणार. आम्हाला खाणाखुणा समजल्या असल्याने, आम्ही काळजी घेत चालत राहिलो. माघारी येताना चुकू नये म्हणुन आम्ही देखील खाणाखुणा करीत करीत पुढे गेलो. एका ठिकाणी पोहोचल्यावर असे जाणवते की आता उतार संपला आहे. तिथेच नाळीतुन तुटून आलेले मोठाले दगड आहेत. आम्ही तिथं cairn उभं केलं आणि पुढे गेलो. आता पुढची वाट सुसह्य होती. सपाट पाय वाटेने चालायचं सुख काय मोप असत याचा प्रत्यय आला. चढ उतार पाहिल्याशिवाय अनुभवल्याशिवाय आहे तो सरळ धोपट मार्ग किती सुखाचा आहे की समजतं नाही.

आता आम्ही बरोब्बर दमदमा डोंगर आणि आहुपे डोंगररांग यांचा मधोमध होतो. डाविकडे दमदमा डोंगर महाकाय तर उजवीकडे आहुप्याच्या सह्य कड्यांचे रौद्र रूप. दमदमा डोंगर खरतर किती मोठा आहे हे दिसतच नव्हते. पण आता तोच डोंगर डाविकडे ठेवत मावळतीकडे आडवं चालयच होत. दमदमा डोंगरांच्या तीन दांडाना वळसा घालत घालत आम्ही चालत राहिलो. एक ठिकाणी आम्हांला वाटेत एक स्मृती शिळा दिसली. आता अजुन हायस वाटलं. अजुन थोडं पुढे गेलो आणि पायवाटेच्या थोडं खाली एक पाण्याचं डबकं दिसलं. त्यातील पाणी स्वच्छ होतं. तिकडेच थोडं दुरवर पाण्याची एक मोकळी प्लास्टिक बाटली देखील दिसली पडलेली. आजचे आमचे गन्तव्य जे होते ते आता अगदी थोड्याच अंतरावर आहे याची खात्री झाली. आणि पुढे पाचंच मिनिटात आम्ही सिद्धगड किल्ल्याच्या कमान दरवाज्यात उभे होतो. अंधार असल्याने नीट पाहता आला नाही दरवाजा, सकाळी पाहु असे म्हणुन पुढे चालत राहिलो. अजुन थोडं पुढे गेल्यावर वाटेत वीरगळी दिसतात. त्या गळींच्या वरच मंदिर आहे. याच मंदिरात आम्हाला मुक्काम करायचा आहे. हे आहे नारमाता देवीचं देऊळ. मंदिर नक्की कसं आहे हे आता अंधारात ठिकसे दिसत नाही पण बांधणी चांगली व नवीन दिसली.

नारमाता देवी मंदीर –हजार वर्षांपूर्वीचा बंदूकधारी वीर - सिद्धगड टप्पा
नारमाता देवीचा तांदळा, सिध्दगड
नारमाता देवीचा तांदळा, सिध्दगड

वीरगळींपाशी मी सर्वात शेवटी पोहोचलो, कारण होते माझं आजारपण. इतका वेळ कसातरी दम धरीत, संथ श्वासोच्छवास करीत मी चालत होतो. माझी गती अजिबत कमी नव्हती झाली. पण शेवट जसा नजरेच्या टप्प्यात आला तस माझ्या शरीराने साथ सोडली. मला खोकल्याचा तीव्र झटका आला. दहा पंधरा मिनिट मी खोखो करीत होतो. उलटी होत आहेसे देखील वाटले पण उलटी होत नव्हती. खोकला मात्र थांबायच नाव घेईना. बाकी सर्व सदस्य नारमाता देवीच्या अंगणात पोहोचले देखील. त्यांच्या मंदीर छान आहे, बांधकाम चांगले आहे, झोप चांगली येईल आज अशा गप्पा पुसट पुसट ऐकु येत होत्या. कुणीतरी वरुन आवाज देखील देत होत अरे हेमंत काय झालं, येऊ का मदतीला वगेरे वगेरे. ते पंधरा मिनिट कसे गेले समजलच नाही. शहाजी मंदीरातुन खाली उतरुन पुन्हा माझ्याजवळ आला. माझी पाठीवरची सॅक त्त्याने घेतली आणि एका हाताने मला आधार देत वर नेण्यासाठी मदत केली. एकेक पाऊल टाकायला मला एकेक मिनिट लागल असेल कदाचित. खुप ह्ळु सावकाश मी मंदीराच्या अंगणाप्रत पोहोचलो. पुर्वाभिमुख असणारे हे मंदीर एका मोठ्या चौथ-यावर बांधले आहे. चौथरा चांगलाच उंच आहे म्हणजे किमान दहा फुट तरी उंच आहेच. मी मुख्य पाय-यांनी मंदीराच्या मुख्य ओसरीत न जाता, थोड डावीकडुन, तोफ ठेवलीये तिकडुन वर गेलो आणि मंदीराच्या शेणाने सारवलेल्या ओसरीत गेलो आणि बसलो. शरीर इतके दमले होते की आता बसुन राहण्याइतकी देखील ऊर्जा शिल्लक नव्हती. पण जर लागलीच आडवा पडलो असतो जमीनीवर तर चक्कर येण्याची भीती होती त्यामुळे बसुन राहिलो. एक दोन मिनिटांनी श्वास थोडा स्थिर झाल्यावर पाणी पिलो ह्ळुह्ळु. खोकला ठसका अजुनही सुरुच होते. बाकीचे सदस्य तोपर्यंत पाण्याचा शोध घेण्यासाठी फिरत होते. अनिल ने रात्रीच्या जेवणासाठी खिचडी भाताची तयारी केली, भाज्या कापा चिरा, लसुण सोलणे, इत्यादी सर्व करण्यात तो व्यस्त होता तर आमचा आणखी सदस्य देखील माझ्या इतका नाही पण तोही पडुनच होता.

मी थोडा सामान्य व्हायला लागलो. डोळ्यांतुन गरम वाफा बाहेर याव्यात इतके डोळे जळजळ करीत होते. शरीर कोरडे पडले होते. पुढचा टप्पा माझ्या आजारपणाचा मला गाठणारच तो म्हणजे फणफणुन ताप येणार हे मला स्पष्ट जाणवत होते. मन-बुध्दी मात्र स्थिर झाले होते. आता पडुन राहिले तर आजार बळावेल मे समजुन मी ऊठलो आणि मंदीर परीसरात लाकुडफाटा गोळा करण्यासाठी बाहेर पडलो. चुल पेटवणं अजुनही बाकी होतंच, ते काम करायला कुणीही नव्हतं. लाकड गोळा करण्यासाठी खुप फिराव लागल नाही. संपुर्ण मंदीराला एक दोन फे-या मारल्या आणि बख्खळ सरपण मिळालं.

हे करता करता सहज एकदा नजर आकाशात गेली. गर्द , उंच झाडांच्या भाऊ गर्दीतुन एक छोटासा आकाशाचा तुकडा दिसत होता, जणु झाडांची खिडकीच तयार झालेली तिथे. त्या खिडकीतुन वर आकाशात चार नक्षत्रे स्पष्ट दिसत होती. यातील पहिले दिसले आणि लक्ष वेधुन घेतले ते कृत्तिका नक्षत्र होय. हा अतिशय लहान सहा सात ता-यांचा पुंजका अगदी स्पष्ट दिसला. इतका की त्यातील मुख्य सहा तारे ठळक दिसले. बाजुलाच एक लोखंडी बाकडा (बेंच) होता. मी त्यावर बसलो, आणि हळुच आडवा होऊन पाठ टेकवली. माझी नजर मी कृत्तिका नक्षत्रात स्थिर करण्याचा प्रयत्न करु लागलो. आपल्या डोळ्यांमध्ये लेन्स असतात. त्या लेन्स अंधाराला सरावण्यासाठी थोडा वेळ लागत असतो. मी जेव्हा निसर्गशाळा येथे आकाशदर्शन कार्यक्रम घेतो तेव्हा सर्वांना जमीनीवर झोपण्यास सांगतो. पुर्वेकडे पाय आणि मावळतीला डोकं अस पाठ टेकवुन झोपायच. असे झोपुन आकाश पाहण्यासाठी निसर्गशाळा येथे आपण एक खास चौथरा बनविला आहे. तर असे लोकं पाठ टेकवुन जमीनीवर आडवे झाले की मी त्यांना आकाशात नजर स्थिर करण्यास सांगतो. पाचेक मिनिटांत नजर स्थिर होते आणि मग हळुहळु एकेक कोडं सुटाव, एकेक गुपित उघडं व्हाव तस आकाश आपल्यापुढे मोकळं होत जातं. इतर वेळी न दिसणारे , खुपच फिकट तारे, तारकापुंज देखील दिसु लागतात. आणि त्याही पुढे जाऊन, ती एकतानता टिकवता आली तर ता-यांचे रंग देखील जाणवु लागतात. आता मी आकाशात ज्या नक्षत्राकडे पाहात होतो त्या नक्षत्राची आभा निळ्या रंगाची आहे असे फोटोंतुन दिसते पण मला ती निळी आभा उघड्या डोळ्यांना जाणवल्यासारखे मला वाटले. याच कारण आहे इथलं आकाश. हे आकाश आणि आपण शहरातुन पाहतो ते आकाश काही वेगळ नाहीये, पण फरक आहे तो म्हणजे प्रकाशप्रदुषणाचा. इकडे शुण्य प्रकाश प्रदुषण आहे.हवेत देखील प्रदुषणा नाही त्यामुळे देखील आकाश दिसण्यावर परिणाम होत असतो. भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग नक्षत्रातील काही तारे अशी साडे तीन नक्षत्रेच काय ती दिसत होती पण ती इतकी स्पष्ट मी पहिल्यांदाच पाहिली.
दुर दुर्गम भागांमध्ये आजही असे अंधारलेल आकाश पहायला मिळतं , पण हे दुर्गम भाग खुपच दुर्गम झाले आहेत आता. शहरापासुन जसे आपण दुर जायचो तसे लगेच असे आकाश दिसायचं.,. अगदी तालुक्याच्या गावाला देखील अस आकाश असायचं. पण आता जिथे म्हणुन रस्ता झालाय, विकास झालाअय तिथे तिथे मोठ मोठ्याला प्रकाशझोतांचा प्रकाश अक्षरशः डोळे दिपुन टाकतो, इतके की आकाशात एखाद दुसरी चांदणी फक्त दिसावी. मला आठवतय आम्ही एकदा एक ट्रेक करुन रात्री अकरा वाजता पुण्यात आलो. वर्ष अंदाजे १९९७ असेल. अकरा वाजता शिवाजीनगर ला आल्यावर पुण्यातील जे सदस्य होते ते आपापल्या घरी गेले बस रिक्शा करुन.. पण मला सोबत देवीदास होता , आम्हाला घरी म्हणजे भरे गावी जाण्यास बस मिळणे शक्यच नव्हते इतक्या उशिरा. रिक्षाने आम्ही कोथरुड डेपो पर्यंत आलो, रिक्षा वाला डेपो च्या पुढे रिक्षा घेऊन यायला तयार होईना. डेपो च्या पुढे एक दोनच इमातरी डाव्या आणि उजव्या बाजुला असाव्यात आणि एक लिंबाचे मोठ्ठे झाड. अगदी निर्मनुष्य, वस्ती नसलेला हा भाग. मी आणि देवीदास आम्ही डेपोच्या पुढे असेच चालायला सुरुवात केली. कडुलिंबाच्या झाडाच्या थोडे पुढे आल्यावर , एक छोटासा घाट वजा चढ लागायचा. त्या चढाला जसे आम्ही लागलो तसे आकाशात अनेक तारे-तारका दिसु लागल्याचे मला चांगलच आठवतय. अर्थात त्यावेळी अश्या तारांगणाच महत्व मला ठाउक नव्हतच पण सांगायचा मुद्दा असा की अगदी पुण्यातुन देखील तारांगण दिसायच. आता तुम्ही अगदी पिरंगुट ओलाम्डुन, मुळशी ओलांडुन, धरण भागात जरी गेलात तरी तुम्हाला तारे दिसणार नाही कारण आपण आता प्रगती केली आहे.असो. ता-यांनी गच्च भरलेलं आकाश पहायला मिळणं म्हणजे खुप मोठ सुख आहे याची मला जाणिव झालेली आहे, या सुखाचा उपभोग मी मनसोक्त घेतला नारमाता देवी मंदीराच्या परिसरात.

चुल पेटवुन मी पुन्हा आराम करण्यासाठी मंदीरात गेलो आणि मॅट अंथरुन पडलो. मंदीरात शेणाने सारवलेली स्वच्छ भुई होती. खरतर या भुई वर काहीही न अंथरताच पहुडले पाहिजे पण थंडी आणि माझं आजारपण यामुळे मी मॅट टाकले. डोळे बंद करुन पडलो. पाणी शोधण्यासाठी गेलेली मंडळी बाहेर आल्याचे आवाज आले. त्यातच त्यांना वाटेत, अगदी मंदीराच्या समोरच, मुख्य पाय-यांच्या खालीच एक हिरवा साप दिसला, असा आहे, तसा आहे, विषारी आहे , नाही, तीन फुट लांब आहे असे त्यांचे संभाषण ऐकु येत होते. पाहायची इच्छा झाली पण शरीर आराम कर म्हणत होते, म्हणून तसाच पडून राहिलो. काही वेळाने, चुलीवर मस्त मसाला भात तयार झाला. त्याचा घमघमाट अगदी मंदीराच्या आत यत होता. त्यातल्यात्यात तुपाची वरुन दिलेल्या धारेचा दरवळ तर सर्वत्र पसरला होता. जेवण मंदीरात आलं, नारमातेला नैवेद्य दाखवला गेला आणि आम्ही सर्वांनी रात्रीचे जेवण केलं. एक किलो तांदुळ, थोडी डाळ, मटर, कांदे बटाटे, , गाजर, इत्यादींनी गर्निश झालेला तो मसाला भात सहा जणांनी फस्त करुन टाकला. जेवण सुरु असतानाच मंदीरात नको असलेला एक, इथलाच कायम, मुळनिवासी देखील असल्याचे समजले. तो होता एक मोठा उंदीर. उंदीर आहे आणि तो सहज पणे आत मंदीरात देखील येऊ शकतोय हे समजल्यावर सर्वांनी मंदीरातच टेंट लावण्याचे ठरविले. मी मात्र तसाच भुईवर टेंट शिवाय झोपलो.

जेव्हा अशा ट्रेकला मी जातो तेव्हा माझा अनुभव असा आहे की सकाळी खुप लौकर जाग येते. काल रात्री आम्ही झोपलो देखेल लौकरच होतो. म्हणुन लौकर जाग येणं अपेक्षित होत खरं पण झाल अस की मला जाग सर्वात आधी आणि मी घड्याळात पाहिले तर सकाळचे चक्क आठ वाजलेले होते. आदल्या दिवशीच मोप चालण्याने सर्वचजण गाढ झोपले. मी तर ॲंटीबायोटिक आणि पेनकिलर चा डोस घेऊन झोपलो होतो त्यामुळे मी देखील उशिरापर्यंत झोपलो. उठल्यावर मला रात्रीपेक्षा अधिक बरे वाटले.

सर्वांना पटापट झोपेतुन जागे करुन, कामाला लावले. चहापान करुन अरविंद, शहाजी, अनिकेत आणि मी असे आम्ही चार जण गड-आरोहनासाठी निघालो. तर अनिल आणि शशांक मागेच थांबले मंदीरात. पाणी आणुन ठेवणे आणि नाश्ता बनवुन ठेवणे असे त्यांना काम होते. आम्ही आधी सिधगड वाडीत गेलो. जाताना वाटेत दगडी गोळे पाहता आले. तसेच अनेक ठिकाणी घरांची जोती देखील दिसली. भीमाशंकर अभयारण्याचा भाग असल्याने महाकाय वृक्ष, वेली इथेही साथ देतात. तिकडे जयवंत कोकाटे नावाचे स्थनिक इसम भेटले. त्यांच्याकडुन किल्ल्यावर जाणा-या मार्गाची माहिती घेतली. इतरही माहिती घेतली जसे आसपासच्या डोंगर द-याची नावे, ओळखं, वन्यप्राणी संपदा इत्यादी. इथुन मागे म्हणजे नारमाता देवी मंदीराच्या दिशेकडे पाहिले तर आपणास उजव्याहाताला सरळ गगनाला भिडणारा सिध्दगड दिसतो. त्यानंतर थोडं पुढे डावीकडे एक छोटी लिंगी दिसते. लिंगी म्हणजे छोटा डोंगरच पण तो सुळक्यासारखा पण थोडा कमी टोकदार असतो. ही लिंगीच सिध्दगड आणि मुख्य सह्याद्रीच्या रांगेला वेगळ करते. या लिंगीचा एक फोटो आहे पहा खाली. या लिंगीच्या पलीकडे जो महाकाय अवाढव्य डोंगर दिसतो तो म्हणजे दमदमा डोंगर. अठराव्या शतकात जेव्हा इंग्रजांनी मराठ्यांचे किल्ले जिंकण्याची, ताब्यात घेण्याची मोहीम हाती घेतली तेव्हा सिध्दगड काही मान टाकत नव्हता. मुळातच अवघड किल्ला, चखोट सरळ कातळकडे हीच सिध्दगडाची तटबंदी होय. किल्ला जिंकता येत नाही असे दिसल्यावर इंग्रजांनी समोरच्या दमदमा डोंगरावरुन तोफा डागल्या आणि सिद्धगडाचे मुख्य वाट तसेच पुर्वेकडी तटबंदी पाडली. त्यानंतर काही काळाने किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्याची नोंद आहे.

सिध्दगड वाडी
सिध्दगड वाडी
सिधगड वाडीतुन पुन्हा थोडे माघारीचालुन, एक पायवाट किल्ल्यावर चढते. इथे किल्ल्यावर जाण्यासाठीचे दिशानिर्देशक बाण ठिकठिकाणी लावलेले आहेत, त्यामुळे वाट चुकण्याची भीती अजिबात नाहीये. साधारणपणे अर्धा तास चालले म्हणजे चढले की आपण कोरिव गुहेपाशी (खरतर लेणं म्हंटल पाहिले) पोहोचतो. मुख्य पायवाटेपासुन ही गुहा थोडी दुर, डावीकडे कड्यात कोरलेली आहे. गुहेच्या द्वाराशी पोहोचण्यासाठी थोडे अजुन चढावे लागते. आत गेल्यावर त्या गुहेमध्ये निवास करावा असा मोह झाल्याशिवाय राहात नाही. आम्ही तिथे गेलो तेव्हा त्या गुहेत भरपुर फाटी जमा करुन ठेवलेली दिसली. लेण्याच्या द्वारातुन समोर गोरखगड , आणि त्यावरील मंदीर स्पष्ट दिसते. इथुन सह्याद्रीचे जे दर्शन होते ना ते अक्षरशः वेड लावते. नकळतच गोरखगड सर करण्याची इच्छा बळ धरण्यास सुरुवात करते. सह्याद्रीचे कातळकडे ताशीव आहेत, रेखीव आहेत, सरळसोट आहेत, करोडो वर्षांपासुन त्यांनी ऊन, पाऊस , वारा सगळ सगळ अंगावर झेललय. पाऊस तरी कसा असावा इथला…अगदी एखाद्या धबधब्यातुन जलप्रपात खाली आदळावा तसाच पर्जन्यधारांचा प्रपात इथे होत असतो. मैदानी भागांत नदीच्या खोर्यांतुन जी वाळु उपसली जाते त्यातील प्रत्येक वाळुचा खडा याच सह्याद्रीच्या कातळांपासुन करोडो वर्षांच्या तुटण्याने, झिजण्याने तयार झाला असावा. पण तो इवलासा वाळुचा कण युगांपुर्वी याच अभेद्य अशा महाकाय कातळकड्यांचा भाग असावा ना!
हा किल्ला समुद्रसपाटी पासुन 992 मीटर इतका उंच आहे. पायाथ्याच्या गावापासून साधारण दीडशे मीटर उंची आहे गड माथ्याची.. कोकणातून बोरवाडी गावातून देखील एक वाट वर येते, ती आधी सिद्धगड वाडीत येते आणि लगेच किल्ला वर चढते. तर दुसरी वाट नारिवली गावातून वर चढते, ही वाट घेतली तर आधी आपण कमान असलेल्या दवारातून येऊन नारमाता मंदिराशी पोहोचतो. आणि तिसरी वाट आम्ही ज्या वाटेने आलो ती वाट. किल्ला दोन भागात विभागता येईल, अधित्यका म्हणजे बालेकिल्ला आणि उपत्यका म्हणजे नारमाता मंदिर, सिद्धगड वाडी असा गर्द रान असलेला प्रदेश. अधित्यका आणि उपत्यका दोहोंना सरळसोट कातळ कडे आहेत.
लिंगी , त्यामागे दमदमा आणि उजवीकडे ज्यावरुन फोटो काढला आहे तो सिध्दगड होय.
लिंगी , त्यामागे दमदमा आणि उजवीकडे ज्यावरुन फोटो काढला आहे तो सिध्दगड होय.
सिध्दगडाचा नकाशा, श्री आनंद पाळंदे यांनी बनवलेला
सिध्दगडाचा नकाशा, श्री आनंद पाळंदे यांनी बनवलेला
सन1693 मध्ये औरंगजेबने मातबरखानास सिद्धगड घेण्यास सांगितले. म्हणजे संभाजी राज्यांच्या हत्येंनंतर चार वर्षे लागली औरंगाजेबास इथे पोहोचायला. ही लढाई निकराची झाली. मातबरखानाच्या सैन्याने दोर लावून गडावर चढाई केली.
1699 मध्ये मराठ्यांनी पुन्हा गड जिंकून घेतला. सन 1737 मध्ये पेश्व्यांनी गड मजबूत करण्यासाठी डागडुजी केली. 1818 मध्ये इंग्रजानी दमदमा डोंगरावरून तोफा डागल्या. यातच अधित्यकेवर जाणारी मुळं पायरी वाट तुटली, जी नारमाता मंदिरापासुन वर चढते.
सन 1943 मध्ये भाई कोतवाल आणि पाटील अश्या दोन क्रांतिकारकांना बोरवाडीच्या जंगलात हौतात्म्य आल. मेजर हाल नांवच्या इंग्रज अधिकाऱ्याने हल्ला केला, चकमक झाली आणि हे दोन वीर पडले. यांची स्मारक बोरवाडीत आहेत.
नार माता मंदिर परिसरात अनेक वीरगळी आहेत. एक तोफ देखील आहे. या वीरगळीचे एक वैशिष्ट्य आहे. एका गळीवर चक्क ठासनी ची बंदूक धारी वीर दिसतोय. वीर गळी साधारण अकराव्या शतकातील असाव्यात, इंग्रज येण्याच्या खुप पूर्वीच्या. बंदूक भारतात इंग्रजानी आणली नाही तर आपणास ती आधीच माहिती होती व वापरत होती. तुम्हाला फोटोमध्ये स्पष्ट दिसेल बंदूकधारी वीर.
मंदिर अतिशय छान आहे. देवीचा तांदळा मोठा आहे. लेपनाने गोलाकार दिसतोय आता. भीमाशंकर परिसरात कमळजाई, नारमाता आणखीही अश्या देवता आहेत ज्या बहिणी आहेत असे सांगितले जाते स्थानिकडून.
गुहेतुन समोर दिसणारा गोरखगड
गुहेतुन समोर दिसणारा गोरखगड
उपत्यकेवरील जंगलात असलेले दगडी गोळे. नारमता देवी आणि सिध्दगड वाडी या वाटेवर , थोडस वरच्या बाजुला जंगलात आहेत
उपत्यकेवरील जंगलात असलेले दगडी गोळे. नारमता देवी आणि सिध्दगड वाडी या वाटेवर , थोडस वरच्या बाजुला जंगलात आहेत
अधित्यकेवर असणारा मुख्य दरवाजा, की जो आता वापरात नाही. पाय-यांची वाट आता अस्तित्वात नाही. पुर्वी हीच मुख्य वाट होती बालेकिल्ल्यवर जाण्यासाठी
उपत्यकेवरील जंगलात असलेले दगडी गोळे. नारमता देवी आणि सिध्दगड वाडी या वाटेवर , थोडस वरच्या बाजुला जंगलात आहेत
कांदे पोह्यांची तयारी
कांदेपोह्याची तयारी
गडावर आलेल्या अन्य भटक्यांसोबत आम्ही
गडावर आलेल्या अन्य भटक्यांसोबत आम्ही
गुहेपासुन पुन्हा चालायला चढाईला सुरुवात केली, मला दमल्यासारखे, थकल्यासारखे वाटु लागले. खोकला पुन्हा सुरु झाला. गडमाथा माझ्यासाठी अजुन अर्धाएक तास तरी होता. आणि सगळी सरळ चढाईच होती. परतीच गायदरा घाट चढणं, नंतर भट्टी जंगल ओलांडणं अस सगळ ध्यानात घेऊन मी इथुन पुढे न चढण्याचा निर्णय घेऊन , थोडे उतरुन लेण्यांशी येऊन थांबलो. अरविंद , अनिकेत आणि शहाजी गडावर गेले. त्यांनी चहुकडुन गड पाहिला. फोटो काढले, विडीयो तयार केले. आणि खाली आले.
 
नारमाता मंदीरात आम्ही येईपर्यंत नाश्त्यासाठी पोहे तयारच होते. आम्ही पोटभरुन पोहे खाल्ले. साधारणपणे बारा साडे वाजता , मंदीरासमोर झेंडावंदन करुन आम्ही गायदरा घाटाकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.
हेमंत ववले
निसर्गशाळा

#bhimashankar #bhorgiri #trekking #jungletrek #nature #siddhagad #सिध्दगडट्रेक #सिध्दगड ट्रेक #गायदरा #कोंढवळ #भट्टी #चुनाभट्टी #गोरखगड #गुप्तभीमाशंकर #डोंगरयात्रा #आनंदपाळंदे #किल्ल्यांचाइतिहास #किल्ले #गडकिल्ले #महाराष्ट्रातील_गडकिल्ले

Facebook Comments

Share this if you like it..

Categories:

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
 • In Astronomy, STar gazing
  निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
 • In Environment
  महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
 • In Environment
  म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
 • In Environment
  पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
 • In Music, Tourism
  मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]