भारतातील बांबु – काल, आज आणि…

भारतातील बांबु - काल, आज आणि....

नारळाला आपण कल्पपृक्ष म्हणतो कारण नारळाच्या झाडाचा कोणताही भाग वाया जात नाही. प्रत्येक अवयव मनुष्यास काहीना काही उपयोगितेचा आहे. मनुष्याचा दृष्टीकोण जर आपण बाजुला ठेवला आणी थोडस निसर्गाच्या चष्म्यातुन आपण पाहिले तर निसर्गातील प्रत्येकच वनस्पती, प्रत्येक प्राणी, प्रत्येक किटक , त्याचा प्रत्येक अवयव, घटक हे निसर्गासाठी उपयोगाचेच असते. मनुष्यानेच मात्र केवळ आपल्याच दृष्टीने फायद्याच्या ठरणा-या वनस्पती, प्राण्यांना उपयुक्त ठरवुन आपल्या कोत्या बुध्दीचा दाखला दिला आहे. अर्थात ही कोती बुध्दी जरी असली तरी ती देखील बहुधा निसर्गासाठी पर्यावरणासाठी तारक ठरलेली आपण पाहतोय. उपयुक्त आहे म्हणुन नारळ या वृक्षाचे संरक्षण, संवर्धन झालेले आपण पाहतोय ही जमेची बाब म्हणावी लागेल.

निसर्गशाळा येथील बांबु लागवड

नारळ जसा कल्पवृक्ष आहे तसाच अजुन एक कल्प’वृक्ष’ नाही पण कल्प’तॄण’ आताशा समाजाला समजु लागले आहे. हे तृण म्हणजेच गवत ‘कल्प’ आहे कारण याचा देखील एकही अवयव, घटक वाया जाऊ शकत नाही. हे गवत असे आहे की विशिष्ट काळात याची उंची दिवसाला कमीत कमी ७ सेमी  ते जास्तीत जास्त तीन फुट पर्यंत वाढु शकते. हे फक्त नावाचा गवत आहे बाकी याचे उपयोग अनगणित आहेत. मजबुत लाकडासारखा याचा उपयोग होतो तर अगदी नाजुकशी कानातील कर्णफुले, नथण्या बनविण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. या गवतास सर्रास बांबु असे म्हणतात.

बांबुच्या जगभरात दिडशे च्या आसपास प्रजाती व अंदाजे १४०० जाती आहेत. काही प्रजाती जमिनीपासुन केवळ काही सेंटीमीटर इतक्याच वाढतात तर काही जमिनीच्यावर अगदी दिडशे फुटांपर्यंतदेखील वाढतात. जगातील सर्वात वेगाने वाढणारे गवत म्हणजे बांबु. जगातील सर्वात टिकाऊ गवत म्हणजे बांबु. जगातील सर्वात महागडे गवत म्हणजे बांबु. जगातील सर्वच समाजामध्ये मानाचे स्थान मिळविलेले गवत म्हणजे बांबु. जगातील सर्वच संस्कृत्यांमध्ये उपयोगिले गेलेले गवत म्हणजे बांबु.

समशीतोष्ण ते उष्ण प्रदेशात, प्रदेशातील पर्यावरणीय बदलानुसार बांबु ने स्वतःस घडविले आहे. घडविले आहे असे म्हणताना डार्विनचा सिध्दांताचा प्रत्यय येऊ शकतो. बांबुची एकच प्रजाती दोन वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पध्दतीने वाढते. एवढेच काय पण एकच प्रजाती अगदी एकाच वातावरणात, पण वेगळ्या भौगोलिक रचनेत वेगळ्या पध्दतीने वाढते. याचे उदाहरण आपल्या पुण्याजवळील वेल्ह्यात मुबलक आढळणारी मेस जातीची बांबु प्रजाती. ही प्रजाती जर वा-या वावधनापासुन सुरक्षित ठिकाणी लावली तर याचे फोक खुप उंच व पोकळ वाढतात. याउलट जर हे बांबु मोकळ्या मैदानावर लावले की जिथे वारे खुप मोठ्या प्रमाणात वाहतात तिथे हे बांबु पोकळ न होता भरीव होतात. प्रजाती तीच पण परिस्थीतीनुसार स्वतःमध्ये लवकर बदल करण्याची जनुकीय रचना कदाचित बांबु मध्ये इतर वनस्पतींपेक्षा जास्त असावी.

म्हणुनच बांबु तुम्हाला कुठेही अगदी कुठेही आढळेल. म्हणजे असे की काळ्याशार मातीमध्येदेखील बांबु वाढलेला दिसतो तसेच मुरमाड जमिनीमध्येदेखील बांबु वाढतो. डोंगर उतारावर वाढतो तसाच सपाट मैदानावर देखील वाढतो. काही प्रजाती अगदी तळ्यांमध्ये देखील वाढतात तर निच-याच्या रानात देखील बांबुची वाढ चांगली होते.

जगातील जवळजवळ सर्वच सभ्यतां-संस्कृत्यांमध्ये बांबुच्या खाणाखुणा आढळतात. भारतात तर बांबुचे अनेकविध उपयोग अगदी प्राचीन काळापासुन केले जात आहेत. ग्रामीण तसेच वनवासी जीवनाचा बांबु एका अर्थाने कणा होता. एक काळ असा होता की आपल्याकडे एकही घर असे नसायचे की ज्यामध्ये बांबु पासुन बनविलेली विविध साधने नव्हती. उदाहरणदाखल प्रत्येअक माजघरात बांबुच्या टोपल्या, , पाट्या, सुपल्या, सुपे, कणग्या, इरण्या अशी अनेक दैनंदिन वापराची साधने असायचीच असायची. बर हे काय फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातील अगदी सर्वच प्रांतामध्ये (कश्मीर वगळता) असे चित्र होते. त्याचे कारण असे ही भारतात सर्वत्र बांबुच्या विविध प्रजाती हजारो वर्षांपासुन वाढत , बहरत आल्या आहेत. एवढेच काय पण घराचे वासे देखील बांबुचे आजही गावखेड्यात पहावयास मिळतात.

बांबु ला भारतात अनेक नावे आहेत. वेणु, वेळु , वंशी, वंश, बांस, शेकाटा अशी अनेक सामान्य नावे आहेत. भारतात आढळणा-या विविध प्रजातींना स्थान परत्वे वेगवेगळी नावे देखील पुर्वापार वापरात आहेत. स्थानपरत्वे थोडाफार बदल नावांमध्ये असु शकतो. उदा – उढा जातीची एक प्रजाती वेल्हा-मुळशी मध्ये आढळते. कोकणात याच प्रजातीला चिव्हर/चिवर म्हणतात. ही वेत सदृष्य प्रजाती आहे पण वेत नाही. याचाच अर्थ वेत ही देखील बांबुची एक वेगळी प्रजाती आहे की जि्च्या लवचिकतेचा उपयोग करुन विविध खुर्च्या, टेबले, झोके बनविले जातात. वेतापासुन फर्निचर साधने बनविणे व ती विकणे ही अतिप्राचीन कला / हस्तकला भारतामध्ये आहे. यावर भारतातील एक खुप मोठा वर्ग आर्थिक दृष्ट्या अवलंबुन आहे.

बांबु महाराष्ट्रातील बलुतेदारी व्यवस्थेमध्ये खुप महत्वाचे संसाधन / संपत्ती होती. पुर्वी गावागावात बुरुडकाम करणारी कुटूंबे असत. अगदी नाही तर दोन-तीन गावे मिळुन एखाद दोन कुटूंबे असतच असत. यांचे कामच असायचे दरवर्षी सामान्य शेतक-यास लागणारी बांबुची दैनंदिन वापराची साधने शेतक-याच्या घरपोच देणे. कणग्या, सुप, टोपली, पाट्या असे साहित्य बनवुन घरा-घरात  द्यायचे काम ही बुरुड मंडळी करीत. मोबदल्यात त्यांना सुगीच्या दिवसांत पसा-पसा धान्य मिळे. हे पसा-पसा धान्य देखील एकत्रित केले की ते मणभर-खंडीभर व्हायचे

बांबु पासुन बनविलेली, भारताचा आत्मा असलेल्या गोपाळकृष्णाची बासरी विसरुन कसे बरे चालेल? ही बासरी काय फक्त त्या एकाच गोपाळ कृष्णाने नाही वाजविली बर का मित्रांनो! कदाचित भारतातील प्रत्येक खेड्यापाड्यात असलेल्या प्रत्येक गोपाळाने बासरी वाजविली असेल. हे मी कशावरुन म्हणतोय? याला आधार काय? तर मी स्वतः सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर गायी-गुरांना चारणारा आणि मंजुळ बासरी वाजवणारा गोपाळ पाहिला आहे याची देही याची डोळा.

बांस की बांसुरी

बांबुच्या कोमच्याची / कोंबाची कुरकुरीत भाजी तुम्ही खाल्लीये का कधी? अहो भाजीच नाही तर बांबुचे लोणचे देखील बनविले जाते. एकदा का तुम्हाला खाण्यास योग्य अशा बांबुची ओळख झाली तर त्यावर योग्य ती प्रक्रिया करुन हवी तशी भाजी करु शकता. सुकी भाजी कुरकुरीत लागते तर रस्सा भाजी केली तर ती चक्क मटणासारखीही लागु शकते चवीला.

आपल्या निसर्गशाळेभोवती आधीपासुनच सिमेंट खांब व काटेरी तारांचे कुंपण आहे. हे कुंपण किमान दोन ते तीन वर्षांनी बदलावेच लागते. कारण तारा गंजतात वा खांब हलु लागतात. यावर उपाय म्हणुन आम्ही निसर्गशाळेला आता चक्क बांबुचे जैविक कुंपणच केले आहे. यासाठी आम्ही विशिष्ट प्रजातीचा उपयोग केला आहे.

खाली पहा बांबु पासुन बनविलेला मासे पकडण्यासाठीचा पारंपारीक सापळा, निसर्गशाळा येथे. त्यावर मी रॅम्प वॉक करताना

काही वर्षांपुर्वी मी अलेक्झांडर चा भारतातील पराभव या विषयी अभ्यास करीत होतो. त्या अभ्यासामध्ये मला इंडिका या ग्रीक पुस्तकामध्ये बांबु पासुन बनविलेल्या युध्दशस्त्रांचा उल्लेख आढळला. राजा पुरु आणि अलेक्झांडर यांच्या सैन्यामध्ये झालेल्या युध्दप्रसंगाचे वर्णनात पुरु राजाच्या सैन्याकडे असलेल्या विशिष्ट प्रकारच्या बांबु पासुन बनविलेल्या धनुष्याचे वर्णन येते. या धनुष्यांची उंची कमीत कमी पाच फुट ते अधिकाधिक ८ फुट होती. याला बाण लावुन प्रत्यंचा खेचण्यासाठी धनुष्याचे एक टोक चक्क जमिनीवर ठेवुन, डाव्या पायाने दाबुन धरावे लागत असे. डावा पाय लावला नाही तर धनुष्याला स्थैर्य मिळत नसे. मग साधारण तीन ते चार फुट लांबीचा, मनगट भर जाडीचा बाण , तोही बांबुचाच धनुष्यावर चढवुन शत्रुवर सोडला जायचा. हा बाण इतका भेदक होता की जगातील कसलेही चिलखताला चर-चर भेदुन शत्रुचा कोथळा बाहेर काढायचा. अलेक्झांडरचे सैन्य या बाणास खुपच घाबरले होते. व एक वेळ आली लढण्यास देखील नकार देऊ लागले. त्यानंतर शत्रुने वेगळे तंत्र वापरुन भारतीय सैन्यास दलदल असलेल्या भागात येण्यास भाग पाडले. दलदलीमध्ये धनुष्य स्थिर होऊ शकले नाही आणि धनुष्यांचा म्हणावा असा उपयोग झाला नाही. ते युध्द अलेक्झांडर हारला असेच माझे ठाम मत आहे. ते कसे या विषयी मी वेगळे सविस्तर लेखन आधीच केले आहे.  असो. तर मुद्दा असा आहे की बांबु केवळ दैनंदिन जीवनाचाच भाग होता असे नाही तर बांबु पासुन युध्दशस्त्रे देखील बनविली व वापरली गेली आहेत भारतात हजारो वर्षांपासुन.
शिवकाळात बांबुपासुन धनुष्य-बाण , तीर कामठा तर बनविला वापरला गेलाच सोबत विविध प्रकारचे भाले देखील बनविले जायचे. हे भाले वापर करणारा सैनिक पायदळातील असेल तर बांबुची लांबी-रुंदी वेगळी, अश्वरुढ असेल तर लांबी-रुंदी वेगळी असायची, हत्तीवरुन लढणारा असेल तर वेगळी. तर पोलादाच्या पात्यांची रचना देखील वेगवेगळी असायची. भाला म्हणजेच कुंत बनविण्यात बांबु खुप महत्वाचा घटक होता.

भाला असो वा धनुष्य-बाण असो, तो बनविण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया बांबु वर करावी लागायची. हल्ली ज्यास बांबु ट्रीटमेंट म्हणतात ना अगदी तेच पण शुध्द पणे ऑर्गनिक पध्दती पुर्वी वापरली जायची बांबुला टणकपणा आणण्यासाठी व त्याचा टिकाउपणा वाढविण्यासाठी. गोनिदांनी त्यांच्या एका पुस्तकात पारंपारिक बांबु प्रक्रिया कशी केली जायची या विषयी थोडक्यात लिहिले आहे.

एकलव्य व त्याचा तीर कमठा

ऋग्वेद तथा रामायणा मध्ये बांबु चा उल्लेख आढळतो. 

रामायण व ऋग्वेदामधील बांबुचा उल्लेख. माहिती साभार - डॉ अशोक काळे

बांबुचा शोध व त्याची उपयोगिता याबाबत प्राचीन भारताला कुणीही शिकविले नसावे, भारत बांबु या विषयात आत्मनिरर्भर होता.
बांबु आपल्या जीवनाचा खुपच अविभाज्य असा घटक होता. घरा-घरात बांबु व बांबु पासुन बनविलेली साधने होती. गावशिवारात बांबुची बेटे होती.

इतर झाडा-झुडूपांच्या बाबतीत जे झाले कदाचित बांबु बाबतीतही तेच होत आहे. बांबुचा दैनंदिन जीवनातील वापर कमी झाल्याने, बंद झाल्याने त्याचे उपयोगिता मुल्य संपल्याने त्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. पुर्वी गावागावात असणारी बेटे आता नाहीशी झाली आहेत. इतर कोणत्याही झाडा-झुडूंपापेक्षा बांबु खुप जास्त कार्बनडाय ऑक्साईड फिक्स करतो व तुलनेने जास्त प्राणावायु सोडतो. जलद गतीने वने पुन्हा उभी करण्यात बांबु खुप महत्वाची भुमिका निभावु शकेल. ग्लोबल वॉर्मिंग, बिघडते पर्यावरण या सा-या समस्यांवर बांबु एक प्रभावी उपाय आहे हे आपण नव्याने शिकले पाहिजे. शाळा-शाळांमध्ये पुनः बांबु कारागिरीचे प्राथमिक धडे देण्यास सुरुवात केली गेली पाहिजे. बांबुचा उपयोग दैनंदिन जीवनात वाढवला पाहिजे. आपण गम्मत अशी आहे की हे सर्व करण्यासाठी दुस-या कुणाकडे पाहण्याची अजिबात गरज नाहीये. आपणा स्वतः पासुन ही सुरुवात केली पाहिजे. आपण बांबु उपभोक्ता बनु शकता अथवा बांबु निर्माता / सृजन कर्ता बनु शकता. बांबु हे कल्प’तृण’ आहे हे जर आपण सर्वांस दाखवु शकलो, समजावुन सांगु शकलो तर त्यामुळे बांबुचे संरक्षण संवर्धन होणे अधिक सोपे होईल. बरोबर ना?

बांबुची आधुनिक काळातील उपयुक्तता या विषयी विस्ताराने पुन्हा कधीतरी लिहिणार आहेच.

जागतिक बांबु दिवसाच्या आपणा सर्वांस शुभेच्छा! चला बांबु चा वापर वाढवुयात व पर्यावरणाला पुरक जीवन जगुयात.

 

आपला

हेमंत ववले
निसर्गशाळा, पुणे

टिप – काटेकळक बांबुची रोपे उपलब्ध आहेत. संपर्क ः ९०४९००२०५३

Facebook Comments

Share this if you like it..

5 thoughts on “भारतातील बांबु – काल, आज आणि…

  1. Pradnya Sheth

    खूप छान आणि माहितीपूर्ण लेख…. दैनंदिन वापरात बांबुच्या वस्तूचा वापर करायचा नक्की प्रयत्न करणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *