तीन वर्षापुर्वी बांबु लागवडीच्या वेळी गावातील काही स्थानिकांशी या बाबतीत मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणुन चर्चा केली. त्यावर त्यांनी एक सृष्टीचा एक अलिखित नियमच सांगितला. कोणतेही झाड, रोप लावायचे असेल तर ते मिरगात च लावायचे. मिरीग जरी कोरडा गेला तरी रोपांची लागवड मिरगातच करायची. त्यानुसार आम्ही आमच्या कॅम्पसाईटवर बांबुची लागवड मिरगामध्ये केली. ज्या बांबुच्या रोपाला पुढ्च्या वर्षी फुलोरा आला, तेवढे सोडुन जवळ जवळ ९५% बांबुची रोपे जगली व पुढच्या वर्षी अगदी एप्रिल मे महिन्यामध्ये सुध्दा आमच्या बांबुंना जमीनीमधुन नवीन कोंब आले.

बॅकग्राऊंड ला वाढ झालेली बांबु लागवड दिसत आहे.
एक साधारण, कुठे ही न लिहिलेला फक्त तोंडी पिढ्यानपिढ्या ग्रामीण भागामधील शेतक-यापर्यंत आलेला हा नियम खरच उपयोगाचा आहे.
आपण भारतीय चांद्र कालगणना वापरतो. त्या कालगणनेनुसार मृग नक्षत्रावर आधारीत मार्गशीर्ष महिना साधारण पणे नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास येतो. मग जुनच्या सुरुवातीस पडणारा पावसाला मृग नक्षत्राचा पाऊस असे नाव आपल्या पुर्वजांनी कसे काय ठरवले असेल? अस्सल गावाकडच्या भाषेत मृग नक्षत्रालाच मिरीग म्हणतात.
नुसतेच मृग नव्हे तर आर्द्राचा पाऊस , हत्तीचा पाऊस, तरणा पाऊस,म्हातारा पाऊस, आसळकाचा पाऊस,सासुचा पाऊस,सुनांचा पाऊस, रब्बीचा पाऊस व शेवटी हत्तीचा पाऊस अशी आपल्या कडे पावसाला विविध नावे आहेत. ही सगळी नावे, त्या त्या काळात पडणा-या पावसाच्या प्रमाणावर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या त्या नक्षत्रावर अवलंबुन असतात. आपल्या कालगणनेनुसार चंद्राचे आकाशातील स्थान ज्या नक्षत्राजवळ असेल त्या नक्षत्रावरुन आपली महिन्यांची नावे ठरतात. पण आधी सांगितल्या प्रमाणे, जुन महिन्यातील पावसाला मृगाचा पाऊस असे नाव देण्यामागे कारण असेल? मृगनक्षत्र साधारण पणे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये चंद्राच्या जवळ दिसते. मग मार्गशीर्ष महिना नसतानादेखील ह्या पावसाला मृगाचा पाऊस हे नाव का दिले असेल? असा प्रश्न मला पडला, तुम्हाला असा प्रश्न आता पडला असेल. बरोबर ना?

Fire flies near Pune
चला तर मग, आपण बघुयात अशी नावे का दिली असतील ते.
मुळात पावसाला अशी विविध नावे देणे म्हणजे प्राचीन भारतीयांच्या खगोलीय ज्ञानाचे द्योतकच आहे. मृगाचा पाऊस असे नाव या पावसाला देताना आपल्या पुर्वजांनी सुर्याचे आकाशातील स्थानाचे निरीक्षण करुन, मोसमी वारे आणि सुर्याचे आकाशातील स्थान यांच्या कदाचित शतकांच्या निरीक्षणातुन, अभ्यासातुन एक निर्विवाद आणि अचुक असा सिध्दांतच मांडला आहे. आपले पुर्वजांना नुसतेच चंद्राच्या गतीचे ज्ञान होते असे नव्हते तर त्यांना सुर्याच्या गती आणि भ्रमणकक्षेचे देखील परीपुर्ण ज्ञान होते. नुसते ज्ञानच होते असे नव्हे तर, हे ज्ञान दैनंदिन जीवनात कसे वापरावे हे देखील आपल्या पुर्वजांना माहित होते. वर उल्लेख केल्याप्रमाणे मृगामध्ये झाडे लावण्याचा नियम उपयोगाचा आहे, हे आपण पाहिलेच. याचाच अर्थ आपल्या पुर्वजांनी नुसता अस्ट्रॉनॉमीचा अभ्यास केला नाही तर अप्लाईड अस्ट्रॉनॉमीचा अभ्यास केला. कोणत्याही अभ्यासक्रमाशिवाय, पाठ्यपुस्तकाशिवाय, शाळेशिवाय हे ज्ञान एका पिढी कडुन दुस-या पिढी कडे पाझरत आले. सध्याच्या आधुनिक खगोलीय साधनांचा उपयोग करुन, प्राचीन भारतीयांच्या ह्या सिध्दांताची सत्यता पडताळुन पाहता येईल.
मी तसे केले सुध्दा. स्टेलॅरीयम नावाचा एक कम्प्युटर प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम अगदी मोफत आहे. त्याचा उपयोग करुन मी आठ जुन ह्या दिवशी सुर्य आकाशामध्ये कोणत्या नक्षत्राजवळ असेल हे पाहण्याचा प्रयत्न केला. तर काय आश्चर्य, सुर्य मृगनक्षत्राजवळच (इंग्रजी मध्ये ओरायन) असेल असे दिसले.
याचा अर्थ आपल्याकडील खगोलशास्त्र नुसते खगोलशास्त्र नव्हते तर ते उपयोगाचे खगोलशास्त्र होते.
सुर्य आठ जुन ला मृग नक्षत्रात प्रवेश करील. त्याच्याच आसपास पावसाला सुरुवात होईल. पावसाच्या आगमनाची लक्षणे निसर्गदेखील दाखवतो. मृगाचे किडे, लाखोंच्या संख्येने काजवे दिसु लागले की समजावे मृगाचा पाऊस सुरु होणार.