जुलै महिन्यामध्ये नदी, नाले, ओढे यांना अक्षरशः पुर आणणारा असा झोडपुन काढणारा पाऊस आपण अनुभवला. नदी नाले ओढेच काय घेऊन बसला, आपल्या रस्त्यांवर देखील पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यातच आपले रस्ते व रस्त्यावरील खड्डे यामुळे तर सर्वांनाच हैरान करुन टाकले. मुंबई मधील रस्त्यांवरील महापुर, वाहतुकीच्या समस्या, रेल्वेचे अपघात, दरडी कोसळणे, बांध फुटणे हे सर्व याच महिन्यात होत असते.
यावर्षी अतिशय समाधानकारक असा आषाढातील पाऊस झालेला आहे. आषाढातील या पावसाचे हेच तर वैशिष्ट्ये आहे. उन्हाळ्यामध्ये तप्त झालेल्या धरेला तृप्त करणारा, पावसाळ्याच्या सुरुवातीचा पाऊस पेरण्यांसाठी खुप गरजेचा असतो. एकदा पेरण्या झाल्या, भाताची रोपे वीतभार वाढली की मग भातलावणी सुरु होते. या भातलावणी साठी मात्र हलका पाऊस काही कामाचा नसतो. मुसळधार पाऊस पडला नाही तर भात-खाचरे पाण्याने तुडूंब भरणार नाहीत. शहराच्या पश्चिमेला असलेल्या मावळपट्ट्यात, आषाढामध्ये भातलावण्या पुर्ण होतात. श्रावण सुरु होण्यापुर्वीच भात लावण्या झालेल्या असतात.
शेतकरी एव्हाना भातलावणी करुन, पेरण्या करुन मोकळा झालेला असतो. अत्यंत धामधुमीचा आषाढ शेतक-यंसाठी कष्ट करण्याचा असतो. आषाढ संपला की मग मात्र सुरु होतो आनंदोत्सव. हा आनंदोत्सव नुसता शेतक-यांसाठीच नसतो, तर तो असतो अवघ्या सृष्टीसाठी. वादळ-वारे एव्हाना शांत झालेले असतात. मुसळधार, झोडपुन काढणारा पावसाची जागा रिमझिम श्रावण सरींनी घेतलेली असते. उन पावसाचा लंपडाव सुरु होतो. त्यातच सप्तरंगी इंद्रधनुष्य, कुठेना कुठे क्षितिजावर मनमोहक नजारा तयार करीत असतो.
आषाढातील जीवघेण्या पावसाने सर्वांनाच अक्षरशः नकोसे झालेले असते. मनुष्य जेव्हा शेतीच्या कामात व्यस्त असतो आषाढामध्ये तेव्हा, निसर्गातील इतर प्राणी, पक्षी देखील या जीवघेण्या पावसापासुन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कष्ट उपसत असतात. सर्वांनाच आतुरता असते श्रावणाच्या शुभागमनाची.
इतके दिवस पावसाने कहर केलेला असल्याने निसर्गाकडे, निसर्गाच्या सौंदर्याकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही. पण श्रावणात मात्र उसंत मिळालेल्या माणसाला निसर्गामध्ये झालेल्या अदभुत अशा बदलांचे दर्शन होते. श्रावणातील निसर्गाने भारतातील प्रत्येक भाषेतील साहित्यिकांना मोहीनी घातलेली आपणास दिसते. मराठी मध्ये तर श्रावण आणि कविता, सुमधुर गीते असे समीकरणच झालेले आहे.
चला तर मग जाऊयात एका अदभुत अशा श्रावण सफरीवर. विविध कवि, कवयित्रींनी रचलेल्या अजरामर अशा श्रावण-कविता, श्रावण-गीतांनी मराठी मनावर कायमची छाप उमटवलेली आपणास दिसते.
मंगेश पाडगावकर कवि म्हणुन प्रसिध्द तर आहेतच पण या श्रावणाने त्यांच्यातील हळवा तत्वज्ञानी, सत्यान्वेषी देखील आपणास दाखवला. श्रावणात त्यांना गवसलेल्या अंतर्यामीच्या सुराचा किनारा मात्र त्यांना सापडला नाही. लता मंगेशकरांच्या सुमधुर आवाजातील हे गीत श्रावणात होणा-या अंतर्यामीच्या मृदुल हिंदोळ्यांचे रुप आपणास शब्दात आणि सुरांत दाखवतात.
श्रावणात घन निळा बरसला
श्रावणाचे नाव घ्यावे आणि बालकवींच्या ‘श्रावणमानसी हर्ष मानसी’ य कवितेच्या ओळी आठवणार नाहीत असा मराठी माणुस शोधुन सापडणार नाही.
श्रावणमासी हर्ष मानसी
कवी कुसुमाग्रजांना श्रावण हासत नाचत येताना दिसतो. गानसम्राज्ञी पद्मजा यांच्या आवाजातील हे श्रावणगीत, कुसुमाग्रजांच्या श्रावण विश्वाचे दर्शन घडाविणारे आहे.
हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला
श्रावणात निसर्गाने जणु एक आगळेच, विलोभणीय रुप घेतलेले असते. निसर्गाचे हे रुप कवयित्री इंदिरा संत यांना, एखाद्या मनस्वी चित्रकाराने चितारलेले निसर्गचित्रच भासते. या निसर्गचित्रामध्ये स्पदने आहेत. जिवंतपणा आहे. चेतना आहे.
इंदिरा संत यांची कविता – श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण?
संगीतकार कौशल इनामदार यांचे देखील श्रावण आणि पावसावर खुप प्रेम आहे. त्यांच्या अनेक रचनांपैकी श्रावणाच्या आणि पावसाच्या रचनांमध्ये त्यांनी स्वतःचा प्राण ओतल्याचे आपणास दिसुन येते. इनामदार यांनी शांता शेळके यांच्या श्रावणाच्या या कवितेवर अतिशय मधुर आणि हृद्याला स्पर्श करणारी रचना केली आहे. शांता शेळके यांच्या विषयी ते पुढील शब्दांत लिहितात.
“शांताबई शेळकेंच्या गीतलेखनात एक सिनेमॅटिक क्वॉलिटी आहे. एका गीतातून आपल्या डोळ्यांसमोर ते पात्र, तो प्रसंग, ते वातावरण सगळं उभं राहतं. त्यांच्या चित्रपटबाह्य गीतांतूनही आपल्याला हा गुण दिसतो. मग ते ‘तोच चंद्रमा नभात’ असो किंवा ‘जिवलगा राहिले दूर घर माझे’ असो. नुसत्या चित्रमयतेच्या पलीकडचा हा गुण आहे.” , कौशल इनामदार
शांताबाईंनी लिहिलेली एक कविता आहे –
रिमझिम बरसत श्रावण आला
साजण नाही आला
श्रावण जसा निसर्गाच्या अनुपम रुपासाठी ओळखला जातो तसाच तो प्रेमी युगलांच्या प्रेम-भावनेच्या अभिव्यक्ति साठी देखील ओळखला जातो. सुमन कल्याणपुरकर यांचे हे भाव-गीत तुम्हाला मंत्रमुग्ध केल्यावाचुन सोडणार नाही. शांता शेळके यांची रचना तुम्हाला नक्कीच आवडेल. मला हे गीत विशेष आवडते कारण यातील भाव गायिकेने अक्षरशः प्रत्यक्षात आणला आहे. गे गीत ऐकताना आपण शांत होऊन जातो. डोळे बंद करावे आणि पुढील हे गीत ऐकावे.
झिम झिम झरती श्रावणधारा
शंकर महादेवन यांच्या आवाजातील हे श्रावणगीत तुम्ही कदाचित ऐकले नसेल. आधुनिक संगीत शैलीमध्ये श्रावणाचे तेच मनमोहक रुप आपणास या सुर संगीतामध्ये दिसते.
ओल्या सांजवेळी
वेगवेगळ्या सिनेमांमध्ये देखील श्रावण व श्रावणामध्ये फुललेल्या हळुवार भाव-भावनांचे चित्रण गीतांच्या माध्यमातुन होते.
लोकशाहिर, विनोदी सिनेकलाकार दिवंगत दादा कोंडकेंच्या कल्पकतेलादेखील श्रावणाने भुरळ घातली. त्यांच्या वाजवु का या सुपरडुपर हिट चित्रपटातील हे गाणे देखील छान आहे.
श्रावण आला ग वनी (सिनेमा – व-हाडी आणि वाजंत्री) हे गीत तुम्हाला जुन्या काळात घेऊन जाईल.
श्रावण म्हणजे जसा निसर्गाचा उत्सव तसाच भारतीय संस्कृतीचा देखील. श्रावणापासुन पुढे अनेक सण-वारांची जणु श्रृंखलाच सुरु होते. आपले हे सारे सण आपणास निसर्गाशी जोडण्यासाठीच आपल्या पुर्वजांनी योजलेले आहेत. नागपंचमी मध्ये नागाची पुजा करण्याची पध्दत काही नवीन नाही आणि जुनी जरी असली तरी विनाकारण नाहीये. कृषि-संस्कृतीमध्ये नाग-सर्प यांना खुप महत्वाचे स्थान आहे. विविध सण-वारांना निसर्गातील विविध घटकांशी मनुष्य जोडला जाईल व मनुष्य हा निसर्गाचा भाग आहे हे विसरणार नाही याची काळजी घेतली आहे.
नागपंचमी, मंगळागौर हे सगळे उत्सव स्त्रियांच्या बहरण्यासाठीचेच आहेत.
१९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या जिवाचा सखा या चित्रपटातील नागपंचमीचे हे गाणे देखील तुम्हाला आवडेल.
पुर्वीच्या काळी नव्या नव-या मंगळागौरीची आतुरतेने वाट पहायच्या. आपल्या नव-याच्या दिर्घायुष्यासाठी यात पुजा धरण्याची प्रथा होती पुर्वी. ही पूजा करायची म्हणजे नव्या नवरी सगळ्या नटून थटून येतात. काही हौशी मुली तर नऊवार साडी आणि त्याला साजेसे सगळे दागिने घालतात.. थाटच असतो छान! शंकराची पिंड करून त्याची पूजा केली जाते. पूजा होईपर्यंत उपास केला जातो. नंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सुग्रास जेवण जेवतात. दुपारच्या वेळी थोडंसं झोपून आपली मंगळागौरीची पूजा छान फुलांनी सजवली जाते आणि वाट पाहातात ती रात्रीच्या जागरणाची. मंगळागौर म्हणजे रात्रीच्या जागरणाचीच ओढ असते. रात्रभर खेळ खेळून, गाणी म्हणून ही मंगळागौर जागवली जाते. ‘पिंगा ग पोरी पिंगा’ हे गाणे तुम्ही कदाचित बाजीराव मस्तानी या चित्रपटात पाहिले असेल. पण हे आणि अशी अनेक गाणी गात-नाचत खेळत नवविवाहिता रात्र जागवुन काढायच्या. नव्यानेच सासुरवाशीन झालेल्या त्या सुकुमार मुलीला तिचे मन मोकळे करण्यासाठीचे हे व्यासपीठ देखील फार जुनी परंपरा आहे. खालील व्हिडीयो मध्ये पहा जुन्या काळातील मंगळागौर सणाचा खेळ.
रक्षाबंधन जसे बहिण-भावाचे नाते वृध्दींगत करते तसेच श्रावणी अमावस्येला येणारा पोळा म्हणजे बैलपोळा, शेतक-याचा आत्मा असणा-या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे.
असा हा श्रावण येतोय, नव्हे आलाय. श्रावणामध्ये सर्वांगसुंदर होणा-या निसर्गाप्रमाणेच आपले जीवनदेखील सर्वांगसुंदर व्हावे. यांत्रिकी विचारांपासुन फारकत घेत आपण उपजत हळव्या भावविश्वात रमावे. आपण मनुष्य आहोत, आपण ही याच निसर्गाचा एक घटक आहोत या भावनेला पुन्हा उराशी धरावे. मानवी नात्यांमध्ये मधुरता यावी तसेच मनुष्य व निसर्ग यांच्या नात्यामध्ये देखील प्रेमाचा ओलावा यावा. मनुष्याने ओरबाडण्याची वृत्ती त्यागावी व वत्सला धरणी मातेच्या कुशीमध्ये कधीतरी तिच्या हळुवार वा-यारुपी स्पर्शाने भावविभोर व्हावे. झिमझिम झरणा-या रेशीमधारांरुपी मंगल वर्षावामध्ये न्हाऊन निघावे. मनुष्याने मनुष्य व्हावे.
आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर अवश्य शेयर,फॉरवर्ड करा.
आपला
हेमंत सिताराम ववले
निसर्गशाळा, पुणे.
nisargshala is a camp site near Pune, which offers opportunity for city dwellers to reconnect with nature with the help of various experiences like night under stars, hiking a fort, rappelling a waterfall, observing flora and fauna of the western ghat near Pune. Kindly call 9049002053 (whatsapp also) for details and registration.
Share this if you like it..
ऐखदम सुंदर…… गीत संग्रह उत्तम ……
Superb, really nice to read & listen such a combination of songs.