आडवाटेने जाऊन अंतरिक्षाचा ठाव घेणारा अवलिया

मला नक्की आठवत नाही कधी ते, पण लहानपणी शाळेत असताना पाणी अडवा पाणी जिरवा ही घोषणा खुप जोरजोरात सरकारकडुन दिली जायची व शाळाशाळांतुन विद्यार्थ्यांकडुन म्हणवुन घेतली जायची. लहान असताना त्या घोषणेचे महत्व कदाचित तेव्हा नीटसे समजले नसेल. पण उत्तरोत्तर जसजसे वय वाढत गेले, पर्यावरण, निसर्ग हा आकर्षणाचा विषय होत गेला तसे तसे अनेक वर्षांपुर्वी ऐकलेली, घोकलेली ती घोषणा व त्या घोषणेचे महत्व किती आहे हे समजु लागले.

Jagdish Godbole

पवनाकाठचा धोंडी म्हणजे जगदीश गोडबोले

अकरावीत असताना मी पर्यावरण कार्यकर्ते, लेखक जगदीश गोडबोले यांच्या सहवासात काही आठवडे राहिलो. ते वय देखील तसे लहानच. विषयाचे गांभीर्य जरी नसले तर निसर्ग संस्कार तेव्हा नकळत होत होताच. जगदीश गोडबोलेंनी एकदा सहज गप्पा मारताना (माझ्याशी नव्हे) पाणी अडवा- पाणी जिरवा या घोषणेचा आधार घेऊन ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुण मुला-मुलींनी गावांमध्येच का राहिले पाहिजे हे सांगितले होते. ब्रेन ड्रेन झाल्याने आपल्या भागाचे, पर्यायाने देशाचे नुकसानच होत असते. त्यामुळे स्वतःस हुशार समजणा-या युवक-युवतींनी आपापल्या भागांमध्येच राहुन शक्य त्या प्रकारे समाजजीवन, पर्यावरण, शेती आदीं बाबतीत शक्य तसे योगदान दिले पाहिजे या तत्वावर दृढ निष्टा माझी अगदी तेव्हा पासुनच होती. कदाचित याचाच परिणाम असेल की मी सीडॅक पुर्ण केल्यानंतर बाहेर कुठेही नोकरी न करता आपल्या गावी, आपल्याच तालुक्यात राहुनच आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच भागाला करुन देता येईल म्हणुन मुळशी तालुक्यातील पिरंगुटच्या कनिष्ट महाविद्यालयात तुटपुंज्या मानधनात शिकविण्याची नोकरी करु लागलो. अर्थातच माझ्या त्या निर्णयावर मला आजही अभिमानच आहे. सोबतच असे जीवन, म्हणजे प्रवाहाच्या विरुध्द पोहण्याच्या जीवनात प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. प्रवाह इतक्या जोराने आणि जोमाने वाहत असतो के तुमचा कधीकधी अक्षरशः जीव देखील गुदमरतो. लाटांचे फटके इतके जिव्हारी बसतात की प्रसंगी तुम्ही हवालदिल होऊन स्वीकारलेला मार्ग सोडुन देऊ शकता. 

प्रवाहा विरुध्द पोहताहेत म्हणजे फार मोठे दिव्य करीत नाही बरका! असे पोहण्याचा निर्णय सर्वस्वी त्या त्या माणसाचाच असतो. त्या त्या माणसांनाच फार हौस असते म्हणुनच ते असे निर्णय घेतात व प्रवाहाच्या प्रचंड दबावाखाली गुदमरुन मरु नये म्हणुन सतत संघर्ष करतात.

जगदीश गोडबोलेंनी सांगितलेले ‘बुध्दी अडवा – बुध्दी जिरवा’ / ‘तरुण अडवा- तरुण जिरवा’ हे तत्व प्रत्यक्षात आणणारे, तसेच स्वतःचे जीवन जगणारे अजुन शेकडो, हजारो आहेत. प्रत्येकाची स्वतंत्र प्रेरणादायी, संघर्षाची कथा आहे. कुणी गोडबोलेंमुळे प्रभावित होतात तर कुणी स्वामी विवेकानंदांमुळे.

व्यक्तिविशेष - नायक

आज आपण अशाच एका व्यक्ति विषयी माहिती घेणार आहोत की ज्याने स्वतःच्या सदसद विवेक बुद्धीने प्रवाहाच्या विरुध्द पोहण्याचे ठरविले. या तरुणाची माहिती वाचताना तुम्हाला कदाचित स्वदेश सिनेमा आठवु शकतो. साधारण पणे एखाद्या गावखेड्यातुन शहरात जाऊन उच्च शिक्षण घेऊन सरकारी अथवा खाजगी नोकरी करुन स्वतःचे आयुष्य, जीवनमान उंचावणारे अनेक विध्यार्थी , तरुण तरुणी आपण पाहत असतोच. अनेक जण मोठमोठ्या शहरांत जाऊन नोकरी करतात. तर अनेकांना शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नाही तरी देखील कधी ना कधी नोकरी मिळेल व आपणाकडे पैसा येईल, आपण आपले तसेच कुटूंबाचे पांग फेडु असा आशावाद उराशी बाळगुन हजारो, लाखो तरुण अजुन ही धडपताहेत. लाखांच्या संख्येने इंजिनियर्स, शिक्षक अजुनही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत.

आपल्या कथेचा नायक , अगदी मिशी  न फुटलेला विशीतला गडी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई या महानगरापासुन सव्वाशे किमी अंतरावर पालघर तालुका आहे. या तालुक्यातील कासा नावाच्या एका दुर्गम खेड्यात आदीवासी कुटूंबात आपल्या नायकाचा जन्म झाला. पुढे एक आणि मागे एक अशी एकुण तीन भावंडे. यातील सर्वात मोठा लहानपणापासुनच अभ्यासात हुशार तर सर्वात धाकटा सोसो. मधवा अभ्यासात देखील मध्यमच. आई वडीलांचे शिक्षण नाही म्हणावे इतकेच. फार फार तर नोटांवरील आकडे तेवढे काय ते त्यांना वाचता येत. बाकी मुलांचे शिक्षण, करीयर इ गोष्टी फारच दुर. प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणासाठी तीन बंदाचे दप्तर (पिशवी) खांद्याला अडकवुन उड्या मारत मारत, रानावनातुन भटकत भटकत , कधी उन्हात घामाने भिजत तर कधी पावसात पर्जन्य धारांनी भिजत भिजत या भावंडांचे शिक्षण पार पडले.

आपल्या कथेच्या नायकाचा अभ्यासाकडे फारसा कल नव्हताच मुळी. तो रमायचा निसर्गात. तो रमायचा नद्या-नाल्या-ओढ्यांमध्ये. रानमेवा खाणे, कधी डोहात उड्या घेणे, कधी झाडांवर चढणे, कधी पारंब्यांना लटकणे तर कधी रानभाज्यांची फीस्ट करणे अशा सगळ्या गोष्टींमध्ये रमणारा आपला नायक रात्रीच्या अंधा-या आकाशातील असंख्य तारे-तारकांना न्याहाळण्यात देखील तासनतास रमुन जायचा. आईवडीलांसोबत कधी शेतातुन येताना उशिर झाला आणि अंधार पडला तर हा लहानगा मागेच कुठेतरी तारांगणाखाली बसुन रहायचा. काय असेल या काळ्या कभिन्न आकाशाच्या पलीकडे? हे चम चम करणारे जे काही आहे ते म्हणजे काय आकाश नावाच्या एका पडद्याला दोरीने लटकवलेले छोटे छोटे दिवेच असावेत कदाचित, ती दोरी तोडुन काय आपण त्यातला एखादा दिवा आपल्या तळहातावर घेऊन घरी जाऊ शकतो का? अशा अनेक बालबोध कल्पना आपल्या नायकाने बाल्यावस्थेत त्या नितळ, खोल आकाशातील महत तारांगण न्याहाळताना केल्या असतील. कधी तरी त्याला शाळेत समजले की हे चमचम करणारे जे काही आहे त्यांना तारे म्हणतात, ते स्वयंप्रकाशित असतात व त्यांना कुणीही दोरीने बांधुन ठेवलेले नाही. आपला सुर्य देखील असाच एक तारा आहे. तर मग जसे आपल्या सुर्यासाठी आपण आहोत तसेच काय आकाशातील या सा-या सुर्यांसाठी अजुन कुणीतरी, आपल्यासारखेच माणसासारखेच असावे का? त्याच्या बालपणात हे सगळे इतक्या अनाहुतपणे घडुन गेले व या सा-या कल्पना विलासाचा त्याच्या मनावर सुप्त असा संस्कार त्याच वेळी झाला.

शिक्षण - उच्चशिक्षण

हसत खेळत, निसर्गात बागडत बागडत इयत्ता दहावी झाली ते वर्ष होते १९९३. इयत्ता दहावी पास होणे हे देखील एक दिव्यच होते. १९९२ मध्ये ते दहावीला होते व परिक्षा दिली देखील पण गणित या विषयात त्याला गती नसल्याने गणितात चक्क नापास झाले. पुन्हा परिक्षा दिली आणि पुढील वर्षी म्हणजे १९९३ ला ते दहावी उत्तीर्ण झाले. निसर्गात रमणारा हा मुलगा अभ्यासात जरी कच्चा असला तरी मोठ्या भावाचे मार्गदर्शन मिळत गेल्याने अभ्यासात खुप गुण वगैरे जरी मिळाले नाहीत तरी वाचनाची आवड त्यांना लागली. वडील एका किराणा मालाच्या दुकानात कामाला जायचे. त्या दुकानात रद्दी मध्ये आलेली मासिके, वर्तमान पत्रे मालकाच्या परवानगीने वडील घरी घेऊन यायचे व हे बंधु त्या रद्दीचा अक्षरशः फडशा पाडायचे. अक्षर न अक्षर ते वाचुन काढायचे. त्यांच्या लहाणपणी रेडीयो हेच त्यांचे सोशल मीडीया, व्हॉट्सॲप होते. त्यांच्या घरी टिव्ही देखील नव्हता.

दहावीनंतर हो नाही , हो नाही करीत करीत वडीलांनी त्याला अकरावीला प्रवेश घेण्यासाठी परवानगी दिली. मोठा भाऊ आधीच महाविद्यालयात शिक्षण घेत होता त्याचा खर्च सुरु होताच आणि आता दुस-या मुलाच्या शिक्षणाचा खर्च वडीलांना परवडणारा नव्हता तरीही वडीलांनी पुढील शिक्षणास परवानगी दिलीच. पालघर मधील एका कनिष्ट महाविद्यालयात प्रवेश मिळाला खरा पण शहरात राहण्याची सोय मात्र होऊ शकली नाही वसतिगृहात प्रवेशासाठी दहावीला उत्तम गुण मिळविणे आवश्यक असायचे त्यामुळे वसतिगृहात त्याला प्रवेश मिळाला नाही. एका दुरच्या नातेवाईकाच्या घरी मुक्काम करुन शिक्षण सुरु झाले.
१९९५ मध्ये बारावीची प्रवेश परिक्षा द्वीतीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. लागलीच वरिष्ट महाविद्यालयीन शिक्षण देखील सुरु झाले.  पदवीच्या परिक्षेत त्याने चक्क महाविद्यालयात (राज्यशास्त्र विषयात) प्रथम क्रमांक तर इतिहास या विषयात आदीवासी विद्यार्थ्यांच्या श्रेणीत प्रथम क्रमांक मिळविला. याच यशाच्या जोरावर त्याला पुढे बी. एड. च्या प्रवेशासाठी केवळ ६०० रुपयेच मोजावे लागले.

दहावी नंतर पुढे शिक्षण होणार की नाही याची खात्री नसलेला एक ग्रामीण विद्यार्थी आता शिक्षण शास्त्राचे म्हणजे अध्यापन शास्त्राचे धडे गिरवु लागला. त्यातही या तरुणास ऊर्जा देणारी गोष्ट अशी की या अभ्यासक्रमात त्यांना विविध शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शिकविण्याचे पाठ घ्यावे लागत. या सा-याच शाळा अत्यंत नावाजलेल्या. बालमोहन आणि शारदाश्रम! शारदाश्रम तर सचिन तेंडुलकरची शाळा म्हणुन जगप्रसिध्द आहेच. शाळा सुटते की राहते याची खात्री नसलेला विद्यार्थी चक्क जगदविख्यात प्रशालेत पाठ घेऊ लागला होता. नापास होणारा विद्यार्थी असा अनुभव गाठीशी असल्याने अशा अगदी सर्वात जास्त मठ्ठ मुलाला देखील कसे सांगितल्याने समजेल हे तंत्र सहजच या तरुणास अवगत झाले. लहानपणी शाळांमधुन वकतृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याने देखील शिक्षकी पेशाचे काम फार अवघड गेले नाही उलट खुपच आवडीचे झाले.

बालमोहन शाळेत पाठ घेताना

बालमोहन शाळेत पाठ घेताना

कॉलेज, अभ्यास, पाठ अवांतर वाचन असे करण्यात त्यांचे शिक्षणातील शेवटचे वर्ष गेले. कॉलेजला सुट्टी असल्यावर मात्र या तरुणाची पावले वळायची ती जवळच असलेल्या एका तारांगणाकडे. लहाणपणी त्यांनी जे तारांगण स्वतःच्या डोळ्यांनी रानाशिवारातुन पाहिले त्याची आठ्वण त्याला ‘तारांगण’ हा शब्द उच्चारल्याने येई. आता तो मोठा झाला होता. स्वतंत्र विचार करु शकत होता, वाचन करु शकत होता. आणि त्यातच त्याला सहाय्य मिळाले ते नेहरु तारांगणाचे. शनिवार व रविवार असे दोन्ही दिवस हा तरुण तारांगणातच रमायचा. अंतरिक्ष किती विस्तीर्ण आहे, त्याचा थांग अद्याप ही मानवाला लागलेला नाही याचे ज्ञान त्याला पुनश्चः साक्षात्काराच्या रुपाने झाले. शाळा महाविद्यालयांमध्ये  या विषयी वाचले जरी होते तरी प्रत्यक्ष खोल खोल अंतरिक्षाचा खोल खोल विचार झाला नव्हता. नेहरु तारांगणात अनेक पुस्तके त्याला वाचावयास मिळाली. दुर्बिण कशी असते ते पहायला मिळाले.  तसेच दुर्बिणीतुन प्रत्यक्ष ग्रह-तारे त्याने प्रथम पाहिले ते देखील नेहरु तारांगणामधुनच.

नोकरी - द्वंद्व

बघता बघता एक वर्षाचा अभ्यासक्रम पुर्ण झाला ते वर्ष होते सन २०००. वडील बंधु आता नोकरीत होते तसेच मधव्याने देखील नोकरी करावी व सेटल व्हावे असे सर्वांना वाटु लागले. सुदैवाने लागलीच एका शासकीय आश्रमशाळेत अधीक्षक या पदावर या तरुणास नोकरी मिळाली. लग्न ही झाले. वास्तविक याचे शिक्षण शिक्षकाचे व काम अधीक्षकाचे मिळाले. वय व अनुभवाच्या मानाने हे काम या तरुणासाठी खुपच मोठे होते. तरीदेखील जबाबदारीचे योग्य निर्वाहन करीत याने सहा वर्षे अधीक्षक पदावर काम केले. या नोकरीत पगाराच्या नावाखाली अगदी तोटकेच मानधन मिळत असे तरी देखील हा तरुण खुप आनंदी असायचा कारण याला सरळ सरळ ग्रामीण आदीवासी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळाली होती. हा तरुण याच्या कामात खुपच गुंतून जायचा. थोरल्या भावाला मात्र याची काळजी असायची. इतक्या कमी पगारात हा पुढील जीवन कसे काय जगणार? मुले बाळे झाली तर त्यांचे भवितव्य काय होईल अशी चिंता मोठ्या भावास असायची.

लग्नाची हळद लागताना

नुसतं पगार हेच चिंतेच कारण नव्हते. हा तरुण स्वतःच्या कामात इतका गढुन गेला होता की पैसा, करीयर, स्थायी तसेच निश्चिंत सरकारी नोकरी अशा गोष्टींकडे याचा कल कधीच नव्हताच. कधी मोठा भाऊ बोललाच तर हसण्यावारी विषयांतर करण्यात हा तरुण तरबेज होता. गाडी, पक्के फ्लॅट सारखे घर, ऐषेआरामाच्या वस्तुं मध्ये कधीही याचे मन रमायचे नाही. साधारण वयाच्या या टप्प्यात प्रत्येक जण ‘सेटल’ होण्यासाठी धडपडत असतो. आणि या तरुणाच्या डिक्शनरीत ‘सेटल होणे’ हा शब्दच जणु नसल्यासारखा हा रहायचा. आदीवासी आश्रमशाळेतील मुलांसाठी काम करताना अनेक चांगले अनुभव त्याला आले तसेच कडु अनुभव देखील आलेच. आदीवासी मुला-मुलींच्या शिक्षणामध्ये अनंत अडचणी आहेत, कौटुंबिक समस्या देखील प्रत्येकाच्या वाट्याला असतातच. या समाजातील मुले व पर्यायाने समाज व आधुनिक प्रगत शिक्षित समाज असे द्वंदव, तौलनिक अभ्यास नकळत त्याच्या मनात व्हायचा. आश्रमशाळेचा अधीक्षक म्हणुन काम करताना त्याने अनेक प्रकारची माणसे पाहिली . जे सारेच उच्चशिक्षित आहेत, सरकारी नोकरीत आहेत, चांगले पगार आहेत तेच सारे आर्थिक भ्रष्टाचारासारखे काम करताना पाहुन या तरुणास खुपच वेदना होई. कोणत्याही माणसाने शिक्षण-उच्चशिक्षण काय अशा प्रकारे भ्रष्टाचार करण्यासाठी घेतलेले असते का? आपण भ्रष्टाचार केला पाहिजे अशी प्रेरणा या नोकरदारांना तसेच जनप्रतिनिधींना नक्की कशातुन मिळत असते. याउलट सामान्य गरीब शेतकरी, आदीवासी यांचे जीवन या तरुणास खुपच भावायचे. दोन्ही विश्वे याने आता पाहिली होती. मनात काही तरी उलथापालथ होत असावी. शब्दांच्या पलीकडील अशांतीने मनात काहुर उठायचे. या समाजाचे काय होणार, शिक्षणाने माणसे अशीच भ्रष्टाचारी घडणार आहेत तर शिकावे कशासाठी बरे? शाळा जर मुलांना जीवनाचे उच्चतम आदर्श शिकवु शकत नाहीत तर मग या शाळा आहेत कशासाठी नेमक्या? शिक्षकांचे पोट भरण्यासाठी? शिक्षकांना वेतन आयोगाचे लाभ मिळवुन देण्यासाठी? शिक्षकांना गावे सोडुन शहरांत रहायला घेऊन जाण्यासाठी? सदनिका विकत घेण्यासाठी? की मोटारकार घेण्यासाठी? अर्थात या सर्व सोई सुविधांवर शिक्षकाचा १००% हक्क आहेच पण शिक्षणातुन जो शिक्षक चारित्र्य घडवु शकत नाही, शिक्षणातुन जी शाळा सामान्य जनतेला उच्च जीवनमुल्ये देऊ शकत नाही त्या शाळा किती कामाच्या आहेत? असे अनेक प्रश्न य तरुणाच्या मनात येऊन गेले असावेत. हा कलह अंतर्मनातच होत असे.  कुणाशी बोलुन कुणाला समजेल असेही या तरुणास वाटत नव्हते म्हणुन त्याने हा वैचारिक संघर्ष आपल्या मनांतच ठेवला नेहमी.

अंतर्मनातुन काहीसा नकारात्मक जरी असला तरी नेटाने कामे मार्गी लावणे, प्रसंगी शासकीय पातळीवर शाब्दीक, पत्र व्यवहाराद्वारे संघर्ष करणे त्याने सोडले नव्हते.

प्रवाहासोबत की प्रवाहाच्या विरुध्द - नीरक्षीर विवेक

मोठ्या भावाने काळजीपोटी कधीही मधव्या  भावासाठी कायमस्वरुपी, ‘सेटल’ करणारी  नोकरी शोधण्याचे काम थांबविले नव्हतेच. मोठ्या भावाच्या प्रयत्नांना यश आलेच. मुंबईतील अतिशय प्रथितयश पारले टिळक प्रशालेत आपल्या कथेच्या नायकास कायमस्वरुपी नोकरी मिळाली. शिक्षण सेवक म्हणुन तीन वर्षे काम केल्यानंतर कायमस्वरुपी नोकरी, पाचवा वेतना आयोग, भला मोठा पगार, सहज कर्जाद्वारे सदनिका, गाडी अशी सगळी ‘सेटल’ होण्याची लक्षणे , भविष्ये या तरुणाच्या, त्याच्या मोठ्या भावाच्या दृष्टीक्षेपात आली. केलेल्या कष्टाचे चीज होऊ घातले होते. आई-वडील आंनदले. पत्नी देखील आनंदी झाली. आपल्या या कथेचा गोड शेवट इथे व्हायलाच पाहिजे असेच आपणास वाटत असेल, बरोबर ना?

पण तसे घडले नाही कारण तसे घडणार नव्हते. इथे नियतीचा खेळ नव्हता! नियती मोकळ्या मनाने प्रसन्न झाली होती, काय काय हवे तुला असे विचारत होती पण आपल्या कथेच्या नायकाने मात्र इथे नियतीने देऊ केलेले सर्वच्या सर्व चक्क नाकारले. अवघे दोन तीन महिने नोकरी केल्यानंतर हा तरुण अजुनही अस्वस्थ होऊ लागला. त्याला समोर चालुन आलेले सर्वस्व नको होते. त्याला साद घालित होता त्याचा गाव. तेच गाव ज्या गावामध्ये त्याचे बालपण गेले. तेच गाव ज्या गावामध्ये अद्यापही जगण्यासाठी संघर्ष जरी मोठा असला तरी जगण्याचा दर्ज्या मात्र खुपच विकसित होता, उच्च होता. गावाकडील जीवनशैलीमध्ये कुठेही, कसलाही  आव आणण्याची गरज कधीही पडत नाही. बॅंक बॅलंस करुन ठेवायची गरज ग्रामीण जीवनशैलीत कधीही नव्हती आणि अजुनही नाहिये. पण तथाकथित शिक्षणातुन हे्च ग्रामीण जीवन मात्र कमालीचे जखमी होत आहे. ग्रामीण संस्कृती शहरी हव्यासाच्या मोठमोठ्या लाटांच्या खाली गुदमरुन जात आहे. माणुस मोठा, तो जगत असलेली शाश्वत जीवनमुल्ये मोठी हे त्रिकालाबाधित सत्य पैशाच्या झगमगाटापुढे फिके पडु लागले आहे.

आपली ग्रामीण जीवनशैली अधिक प्रगल्भ आहे. आपल्या संस्कृतीमध्ये मनुष्याला सुखी समाधानी करण्याची प्रचंड मोठी क्षमता होती व अजुनही आहे. पण ही जीवनशैली जगणे म्हणजे मागास असणे, काळाच्या मागे राहणे, स्पर्धेत न टिकणे असा जो गैरसमज आज तयार झालेला आहे तो ग्रामीण लोकांना अजुनच दुरदूर घेऊन जात आहे. हे दुरदूर जाणे म्हणजे मृगजळाचा पाठलाग करण्यासारखेच आहे अशी प्रचीती आपल्या सत्यकथेच्या नायकास अगदी तारुण्यात आली. आश्रमशाळेत नोकरी करीत असताना मनात उठलेल्या विचारांचे काहुर आता नेमके शब्द-रुप घेत होते. आयुष्यात नक्की काय करायचे आहे व काय करायचे नाही असा नीर-क्षीर निर्णय घेण्याची वेळ समीप आली. आणि आपल्या कथेच्या नायकाने नियतीने कृपाळु होऊन मुक्तहस्ताने दिलेले सर्वस्व त्यागण्याचा निर्णय घेतला. कायमस्वरुपाची नोकरीची मळलेली वाट सोडुन आपल्या कथेचा नायक आपल्या उगमाकडे म्हणजेच कासा या गावी निघाला. गावी जाऊन राहायचे, शेती करायची , जमेल तसे शिकत रहायचे, जमेल तसे शिकवीत रहायचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आनंदी व समाधानाचे जीवन जगण्याचा नुसता निर्णयच घेऊन हा तरुण थांबला नाही तर त्याने तातडीने आपल्या निर्णयावर अंमल देखील केला. वाचताना कुठेतरी तुम्हाला असे वाटले असेल की असा उलट दिशेने प्रवास करणे म्हणजे निव्वळ मुर्खपणाच होय. ज्यावेळी आपल्या नायकाने हा निर्णय घेऊन नोकरी सोडुन गावी आला तेव्हा मित्रमंडळी, हितचिंतक, कुटूंब , वडीलधारे अशा अनेकांच्या रोषास त्याला तोंड द्यावे लागले. लोक हसले, टिंगल केली, वेडा ठरवले. कधीही मी केलेले बरोब्बरच आहे असे इतरांना समजावुन सांगण्यामध्ये त्याने वेळ दवडला नाही.

जगदीश गोडबोलेंकडुन मला समजलेलं ते ‘पाणी अडवा – पाणी जिरवा’ च्या धर्तीवर सांगितलेलं एक तत्व म्हणजे ‘ब्रेन ड्रेन थांबवणं’ याचं मला उमगलेलं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या कथेचा नायक चंद्रकांत घाटाळ. वर्ष २००८ मध्ये त्यांनी नोकरी सोडली व गावाकडची वाट धरली.

चंद्रकांत घाटाळ यांची उन्हाळी भातशेती

प्रवाहाच्या विरुध्द दिशेने प्रवास करणे, प्रवाहाच्या विरुध्द दिशेने पोहणे अवघड आहे, दमछाक करणारा आहे, अतिशय अवघड आहे असे आपल्या सारख्या त्रयस्थांस वाटु शकते. समवयस्क मित्रमंडळी गाडी-बंगला घेण्यात दंग असताना चंद्रकांत मात्र गावातील मातीत हात मळवीत आहे.  कालपरवा मी त्यांना एक प्रश्न विचारला की सर तुमचे कॉलेज मधील वर्ग-मित्रमंडळी आता चांगल्या हुद्यांवर, अधिक चांगल्या पगारावर, सातव्या-आठव्या वेतन आयोगावर असतील. त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता झालेली असेलच. त्यांच्याकडे पाहुन तुम्हाला तुमचे काही चुकले आहे असे वाटत नाही का? त्यावर घाटाळ सरांनी मला दिलेले उत्तर खुपच मार्मिक होते. ते म्हणाले, “ नोकरी सोडतेवेळी माझी भुमिका अशी बनली होती की मला सुखाचे, समाधानाचे, परिपुर्ण आयुष्य जगायचे आहे. माझ्या सुखाच्या कल्पनांमध्ये उपभोगाच्या साधनांना स्थान देऊन मला स्वतःला त्या महान जाळ्यात, मायेच्या महाजालामध्ये अडकायचे नाही. माझ्या सुखाच्या कल्पनांमध्ये दोनवेळचे जेवण मिळेल असे काम करीत राहणे, की ज्यामध्ये मला कधीही कुणालाही फसविण्याची गरज वाटु नये असे काम करावे ; अशा गोष्टी होत्या. निसर्गाच्या सानिध्ध्यात राहुन, निसर्गाला , पर्यावरणाला कमीत कमीत त्रास आपल्या जिवितासाठी झाला पाहिजे. धरती माते कडुन प्रेम भावनेने, पुत्रवत मिळेल तेवढे घेणे व जीवनयापन करणे असेच सुरुवातीस मी ठरविले होते. छोटेसे घर, कुटूंबाला भरपुर वेळ देणं, मुलाचे बालपण अनुभव, त्याला घडवणं, शिकविणे, पत्नीला वेळ देणं. माझे ते वर्गमित्र किती आनंदी आहेत, समाधानी आहेत या विषयी मी खात्रीपुर्वक काही सांगु शकणार नाही. पण मी आणि माझे कुटूंब मात्र खुपच आनंदी आहोत, समाधानाने जीवन जगतो आहोत. सर्वकाही भरुन पावले आहे.”

चंद्रकांत घाटाळ या माणसाने फार विशेष काही विशेष केलेले नाही असेच तुम्हाला वाटले असेल. पण तसे नाहीये. चंद्रकांत घाटाळ यांचे आयुष्य म्हणजे मृगजळाच्या मागे धावुन धावुन थकलेल्या, जीवनमुल्यांपासुन ढळलेल्या, स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रसंगी नीतीमत्तेचा त्याग करणा-या सुशिक्षितांसाठी एक आदर्श आहे. ग्रामीण जीवनशैलीला प्रतिष्टा प्राप्त करुन देण्याचे हे जिवंत काम आहे. हे नुसतं तत्वज्ञान नाहीये तर तत्वज्ञानावर आधारीत प्रत्यक्ष जीवन आहे. हे जीवनदर्शन आहे.

चंद्रकांत घाटाळ सरांच्या सत्यकथेचा गोड, आदर्श शेवट आता तरी व्हावा असे आपणास वाटले असेल, बरोब्बर ना? तर नाही. घाटाळ सर नुसते गावी राहिले नाहीत तर गावी राहुन त्यांनी गावाकडील मुलांसाठी दुर्लभ असे ज्ञान-विज्ञान गाव खेड्यात आणले.

आडवाट निघाली अंतरिक्षाकडे

नोकरी सोडुन गावी आल्यावर, आडवाटेने वस्तीपासुन थोडे दुर शेतात जाऊन पती-पत्नी असे दोघांनी निसर्गातील संसाधनांचाच वापर करुन एक झोपडी बनविली. वडिलोपार्जित शेती करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या झोपडी गाव-वस्तीपासुन खुपच दुर आहे. तिथे जाण्यासाठी गाडीवाट नव्हती, तसेच दुर असल्याने तिथे वस्तीतील प्रकाश देखील अजिबात नव्हता अद्यापही नाहीये. दिवसभर शेतात घाम गाळुन चंद्रकांत शेणाने सारवलेल्या मऊ अशा त्याच्या झोपडीच्या अंगणात आडवा पडायचा तर त्याच्या समोर आकाशातील तारांगणच जणु खेळ खेळु लागायचे. बी.एड. चे शिक्षण घेत असताना नेहरु तारांगण येथुन मिळविलेली माहिती आता प्रत्यक्ष पडताळुन पाहण्याची त्याला संधी मिळाली. तारकासमुह, नक्षत्रे, ग्रह-तारे यांचे हे तारांगण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहताना आपल्या ब्रह्मांडाच्या अवाढव्यतेची कल्पना चंद्रकांत घाटाळ यांच्या मनात यायची. वर्ष २००१ मध्ये त्यांनी एक छोटीशी दुर्बिण विकत घेतली होती. गावी आल्यानंतर दिवसा शेतात कामे करुन, रात्री तासनतास त्या दुर्बिणीतुन चंद्रकांत सरांनी आकाश निरीक्षणे केली. त्यांनी केलेली निरीक्षणांच्या नोंदीही ते करीत गेले. ब्रह्माम्डाचे हे अफाट कोडे जितके उलगडत जाईल तितके ते अधिक जटील देखील होत जात आहे असा अनुभव त्यांना येऊ लागला. अनंत कोटी चंद्र-सुर्य, पृथ्वीसारखे अवकाशीय पिंड अनंत कोटी अफाट विस्तीर्ण पोकळीमध्ये भ्रमण करीत आहेत. ब्रह्मांडाच्या या पसा-यात आपल्या सुर्याचे स्थानच एखाद्या वाळुच्या अत्यंत छोट्या, नखाच्या टोकावर सहज मावेल इतक्या कणा सारखे आहे. अवघ्या पृथ्वीला प्रकाशमान करणारा, ऊर्जा देणारा, प्रत्येक सजीवात प्राण फुंकणारा आपला सुर्यच इतका तुच्छ आहे या ब्रह्मांडाच्या योजनेत तर आपली पृथ्वी किती मोलाची म्हणावी. आणि मग मनुष्य म्हणुन माझे तरी स्थान या ब्रह्मांडाच्या महान योजने मध्ये किती सुक्ष्मातीसुक्ष्म आहे. अनंत आकाशगंगाच्या पसा-या मी किती कमाविले, मी किती मोठा बंगला बांधला, मला किती प्रसिध्दी मिळाली या अशा गोष्टी अगदीच क्षुद्र नव्हेत काय! ब्रह्मांडाच्या या अंतहीन पसा-यात ‘मी मोठा माणुस होणार आहे’ असे म्हणणे म्हणजे एक विनोदच नव्हे काय! आपण आजपर्यंत ज्यास निसर्ग म्हणत आलोय तो निसर्ग म्हणजे हे ब्रह्मांडच होय. या महान योजनेमध्ये आपली जी भुमिका आहे ती व्यवस्थित पार पाडणे महत्वाचे आहे. ही भुमिका नक्की काय आहे तर निसर्गाशी संघर्ष न करणे व अधिकाधिक तादात्म्य या निसर्गाशी पावणे, निसर्गाशी एकरुप होणे.

आकाश दर्शनच नव्हे; हे तर जीवनदर्शन

अहाहा, आकाशदर्शन, आकाशनिरिक्षण करता करता समग्र जीवन-दर्शनाचा साक्षात्कार व्हावा असे काहीसे हे आहे. चंद्रकांत घाटाळ सरांनी आकाशनिरीक्षणांतुन जे काही ज्ञान मिळविले ते स्वतःपुरते ठेवले नाही. ग्रामीण भागीतील मुलांना त्यांनी हे ज्ञान मुक्तहस्ताने वाटण्यास सुरुवात केली.  त्यांनी कासा या गावी ‘अनुजा आकाश निरीक्षण केंद्र’ सुरु केले. आहे त्याच छोट्या दुबिणीची विद्यार्थ्यांना ओळख करुन देणे, अवकाशीय पिंड दाखवणे, त्या विषयी माहीती सांगणे सुरु झाले. राहत्या घरालाच प्रदर्शन मंडपाचे रुप त्यांनी दिले. विविध चार्ट्स, नकाशे, माहितीपर फलक त्यांनी लावले. भुषण सर आणि अन्य मित्रमंडळींनी देखील सहभाग घेऊन हातभार लावण्यास सुरुवात केली. केंद स्थापने नंतर.. शैलेश घारपुरे ( सामजिक कार्यकर्ता), अपूर्वा जाखडी ( स्पेस एजुकेटर-नासा), अरविंद परांजपे ( संचालक – नेहरू तारांगण) , जतिन राठोड ( अधिकारी- नेहरू तारांगण), डॉ नरेंद्र माळी, डॉ मठ ,भूषण नोक्ती (खगोल अभ्यासक) यांचे नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन मिळाले व अजुनही मिळत आहेच. कालांतराने त्यांनी अजुन एक मोठी दुर्बिण देखील विकत घेतली. अनुजा आकाश निरीक्षण केंद्रास आजवर अनेक शाळांतील मुलांनी भेट दिली आहे. अनेक नामवंत खगोलशास्त्रींनी देखील आवर्जुन कासा येथील घाटाळ सरांच्या कामाचे कौतुक प्रत्यक्ष कासा येथे येऊन केले आहे. लहान असताना केलेल्या बालबोध कल्पनाविलासाला आता बळकट पंख मिळाले आहेत. परग्रह व अंतरिक्षातील जीवन या विषयावर चंद्रकांत घाटाळ यांचे एक पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. विविध बातम्यांच्या वाहिन्यांनी त्यांच्या कामाचे दखल घेत महाराष्ट्रभर त्यांचे कार्य बातमीच्या रुपाने पसरविले. विविध वर्तमान पत्रे, मासिके यांत घाटाळ सरांचे कौतुक तसेच लेखन छापुन आले. दिनदर्शिकेत भारतातील अनेक शास्त्रज्ञांच्या नावांच्या व फोटोंच्या पंक्तीमध्ये चंद्रकांत घाटाळ ही झळकु लागलेत.

चंद्रकांत घाटाळ यांच्या या सत्यकथेचा हा तरी गोड शेवट असावा असे मलाही वाटले म्हणुन मी त्यांना म्हंटले की सर तुम्ही आता खुपच समाधानी आणि आनंदी असणार कारण इतक्या कमी काळात तुम्ही खुप काही केले आहे व समाजाने देखील तुमच्या कामाची दखल घेतली आहे, भरभरुन कौतुक केले आहे. तुम्हाला काय वाटते?
त्यावर ते म्हणाले की मी अमुक-तमुक काहीतरी करायचे होते वा आहे म्हणुन मी काही केले नाही. या महान ब्रह्मांडाने माझ्यासाठी (एकुणच मनुष्यजातीसाठी) जी भुमिका (वर उल्लेख केला आहे) ठरविली आहे आपण तिचे पालन करीत रहावे. प्रामाणिक प्रयत्न करावेत. फळ जे काही मिळायचे असेल ते मिळो अथवा न मिळो, आपण कर्म करणे सोडायचे नाही.

याचाच अर्थ चंद्रकांत घाटाळ यांच्या या सत्यकथेचा गोड शेवट अशी काहीही गोष्ट नाही. त्यांच्या दृष्टीने गोड-कटु हे दोन्हीही सारखेच. आपल्या सारख्यांच्या डोळ्यांवर चांगले-वाईटाचा चष्मा असतो म्हणुनच आपणास तो गोड-अथवा कटु वाटतो.

बुध्दीमत्ता अडवा, बुध्दीमत्ता जिरवा याचे जिवंत उदारहण असलेले चंद्रकांत घाटाळ यांचे जीवन अगदी साधे, सोपे, सरळ आहे. यात कुठेही डावपेच नाहीत, कुणाहीपेक्षा मोठे व्हायची इच्छा नाहीये, कुणावर कुरघोडी करण्याची इच्छा नाहीये, अपेक्षांची ओझी नाहीत की मृगजळामागे धावणे नाहीये, संघर्ष नाहीये. यांच्या जीवनात तादात्म्य आहे; निसर्गाशी तादात्म्य, समाजाशी तादात्म्य, विद्यार्थ्यांशी तादात्म्य, ब्रह्मांडाशी तादात्म्य. त्यांच्या साधेपणात मला महानता दिसते. प्रेरक चरित्र दिसते. ग्रामीण जीवनाला पुन्हा प्रतिष्टा प्राप्त करुन देणारा तत्वदर्शी दिसतो. त्यांच्याकडे पाहुन आपण देखील प्रेरणा घेऊयात व आपापले जीवन अधिकाधिक उन्नत करुयात. आडवाटेने जाऊन अंतरिक्षाचा ठाव शोधणा-या या अवलियाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

हेमंत सिताराम ववले
निसर्गशाळा, पुणे
९०४९००२०५३

Facebook Comments

Share this if you like it..