आकाशातील चित्तरकथा – रोहिणी (भाग २)

आकाशातील चित्तरकथांमध्ये आपण पाहतोय रोहिणी नक्षत्राविषयी माहिती. मागील लेखात आपण रोहिणी नक्षत्राशी निगडीत प्राचीन खगोलीय घटनेविषयी माहिती घेतली. यावरुन आपणास हे समजते की भारतीय उपखम्डातील खगोल ज्ञान हे केवळ ऐकीव माहितीवर अवलंबुन नव्हते तर ते आकाशदर्शनातुन, निरीक्षणातुन, नोंदीवरुन, परिमाणांच्या अचुकतेवरुन आलेले होते.

रोहिणी म्हणजे २७ नक्षत्रांपैकी क्रमांक चार चे नक्षत्र

भारतासोबतच अन्य अनेक भुभागांत, संस्कृत्यांमध्ये आकाश दर्शनातुन विशिष्ट ज्ञानाचा उद्य झालेला दिसतो. मागील लेखातील रामायणातील कथेप्रमाणे जगभरात अनेक कथा ता-यांसी, नक्षत्रांशी जोडल्या गेल्या  आहेत.
आज आपण सर्वप्रथम हे पाहुयात की आकाशात रोहिणी नक्षत्र ओळखावे कसे?

या दिवसांत म्हणजे फेब्रुवारी मध्ये सायंकाळी सातच्या सुमारास तुम्ही मान वर करुन आकाशात पाहिले तर तुम्हाला बरोब्बर डोक्यावर पाहिले तर तुम्हाला इंग्रजी V आकाराचे Asterism दिसेल. यातील पुर्वेकडील तारा सर्वात जास्त प्रकाशमान दिसतो तसेच तो लालसर देखील दिसतो. रोहिणी ओळखण्याची आणखी एक सोपी पध्दत म्हणजे मृगनक्षत्र तारे समुहातील व्याध, व्याधाने मारलेल्या बाणातील पहिला तारा अश्या दोन ता-यांना जोडणारी रेष सरळ पश्चिमेकडे वाढवली तर ती पुढे ज्या ता-याला मिळेल तो म्हणजे रोहिणी नक्षत्रातील सर्वात तेजस्वी तारा.

वरील चित्रात रोहिणी नक्षत्र दिसत आहे रेषेच्या पश्चिमेकडील शेवटास. नक्षत्र हा शब्द आपण भारतीय वापरतो त्यालाच इंग्रजीमध्ये Constellation म्हणता येत नाही हे आपण समजले पाहिजे. भारतीयांनी नक्षत्र पध्दती मांडली त्यामागे कालगणना हा हेतु होता व अजुनही त्याच आधारावर भारतातील पंचांगे काम करतात. Constellation हा शब्द Asterism याच शब्दासाठी वापरला जातो. भारतात जशी २७ नक्षत्रे आहेत तशी अन्य कोणत्याही संस्कृतीमध्ये नाहीत. अर्थात अन्य भागांत asterism चा वापर केला जत होताच ढोबळ मानाने. नक्षत्रे म्हणजे पध्दतशीर, क्रमवारीनुसार निरीक्षणातुन निर्माण केलेली व्यवस्था होय. प्राचीन चीन मध्ये देखील २८ नक्षत्रांची रचना केलेली दिसते व त्यातील हे नक्षत्र ‘जाळे’ अश्या अर्थाच्या नावाने ओळखले जाते.  अशीच एक व्यवस्था ग्रीक-रोमनांनी देखील बनविली. ती बनविण्यामागचा हेतु ज्योतिष हा होता. या व्यवस्थेला राशी व्यवस्था म्हणतात. बारा राशी आहेत. आकाशातील तारे तेच आहेत पण आकृत्या मात्र वेगळ्या बनल्या. राशी व्यवस्थेतील क्रमांक दोन ची राशी म्हणजे Taurus. भारतीयांनी नंतरच्या काळात राशी भविष्य वापरण्यास सुरुवात केली. आपण Taurus ला वृषभ म्हणतो. या वृषभ म्हणजे बैल. तर बैलाच डोकं म्हणजे आपण पाहत असलेलं रोहिणी नक्षत्र. यातील सर्वात तेजस्वी ता-यास Bull’s Eye असेही म्हणतात. खालील चित्रात उजवीकडे पुर्ण वृषभ राशी म्हणजेच Tauraus दिसते आहे. बैलाला दावणीला बांधण्यासाठीची खुंटी म्हणजे कृतिका नक्षत्र. एका राशीमध्ये ढोबळमानाने दोन ते अडीच नक्षत्रे येतात.

या नक्षत्रातील सर्वात तेजस्वी तारा म्हणजे रोहिणीचा तारा यास इंग्रजी मध्ये अल्डेबरान अथवा अल्फा टॉरी असेही म्हणतात.
हा तारा सुर्यापासुन ६५ प्रकाशवर्षे इतका दुर आहे. रोहिणीतील सर्वात तेजस्वी तर आकाशातील तेजस्वी ता-यांमध्ये याचा क्रमांक १४वा येतो. अभ्यासकांचे असेही मत आहे की या ता-याभोवती गुरु ग्रहापेक्षाही मोठा असा एक ग्रह देखील आहे त्यास अल्डेबरान बी असे म्हणतात.

आकाराने हा तारा आपल्या सुर्यापेक्षा ४४ पट जास्त मोठा आहे, तर याच्या पृष्टभागाचे तापमान सुर्यापेक्षा खुपच कमी आहे. आकार मोठा असल्याने, तापमान कमी असुन देखील हा सुर्यापेक्षा ४०० पट जास्त प्रकाशमान आहे.

रोहिणी नक्षत्र मराठी माहिती

आपला सुर्य जो अगदी छोटा पिवळसर दिसतोय तो आणि मोठ्ठा , लालसर आहे तो रोहिणीचा तारा

१९७२ साली अमेरिकेने पाठविलेले पायोनियर १० हे अवकाश यान, २००३ साली संपर्क तुटल्यानंतर रोहिणी ता-याच्या दिशेने जात असावे व येत्या २० लक्ष वर्षांमध्ये ते रोहिणी पर्यंत पोहोचेल असा अदांज शास्त्रज्ञांनी केला आहे.

रोहिणीचा तारा अगदी उघड्या डोळ्यांना देखील स्पष्ट दिसतो, नुसताच दिसत नाही तर त्याचा लालसर रंग देखील दिसतो. तो अगदी उठुन दिसतो काळ्यामिट्ट काळोखातील इतर पाढुरक्या ता-यांमध्ये. भारतातील पुराणांमध्ये याबाबत एक कथा सांगितली जाते. रोहिणी ही प्रजापती दक्षच्या २७ मुलींपैकी एक. चंद्राशी या २७ कन्येंचा विवाह झालेला. चंद्राला मात्र २७ पैकी रोहिणी सर्वात जास्त आवडते व तो तिच्यासोबतच जास्त काळ घालवु लागतो. यावर बाकीच्या २६ मुली प्रजापतीकडे चंद्राची तक्रार करतात. प्रजापती मग चंद्राला क्षय होण्याचा शाप देतो. यावर रोहिणी क्रुध्द होते, तिला राग येतो इतका की ती रागाने लालबुंद होते. रोहित होणे म्हणजे रागाने, क्रोधाने लालबुंद होणे होय. आपल्या पुर्वजांना या ता-याच्या रंगाविषयी माहिती असल्यानेच त्यांनी अशी कथा गुंफली असे आपण बिनदिक्कत म्हणु शकतो. बर त्या २७ कन्या म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन आकाशातील २७ नक्षत्रे आहेत. प्रजापतीने दिलेल्या शापाचे पुढे काय झाले बरे? चंद्राने दक्षाला विनवणी केली तसेच त्याचे रोहिणीवरील प्रेम व रोहिणीचे ही त्याच्यावरील प्रेम लक्षात घेऊन प्रजापतीने उःशाप देखील दिला की क्षय होईल आणि पुन्हा वाढ देखील होईल. कथा म्हणजे पुराणांतील वाणगी आहे, त्यामागचा आशय व विज्ञान असे की चंद्र कलेकलेने रोज कमी होतो म्हणजेच त्याचा क्षय व पुन्हा वाढतो.

एका कथेमध्ये असे आढळते की प्रजापतीच्या शापानंतर चंद्राचा क्षय सुरु झाला. चंद्र आता मृत्युस पावणार या भयाने ग्रस्त झाला. नारदमुनींनी चंद्रास महादेव शिवाची आराधना करण्याचा सल्ला दिला. चंद्राने तपश्चर्या सुरु केली. एकेक दिवस सरत होता, तपस्या सुरुच होती पण शिवशंकर काही प्रसन्न होत नव्हते. चंद्राने आणखी खडतर तप आरंभले व मनोमन सर्व पत्न्यांना समान न्याय देण्याचा देखील संकल्प देखील केला. चंद्राचा क्षय होणार आणि चंद्र कायमचा संपणार, त्याची केवळ एकच काय ती कोर शिल्लक राहिली. अश्या स्थितीत महादेव त्यास प्रसन्न झाले व त्यांनी चंद्रास उःशाप दिला व त्यास स्वतःच्या मस्तकावर धारण केले. तो दिवस म्हणजे चतुर्दशी म्हणजेच शिवरात्र म्हणुन ओळखली जाते. शिवरात्र प्रत्येक महिन्यात येते.

प्राचीन मेक्सिकन कालगणनेमध्ये देखील या नक्षत्राचा समावेश होता. प्राचीन ग्रीक लोक या तारकापुंजास Lampadias अर्थात निंफ (वनदेवी, जलदेवी, अप्सरा) ती देखील हातात मशाल घेतलेली अश्या प्रकारे ओळखायचे. Nymphs या पर्यावरण व पृथ्वीच्या संतुलनाशी निगडीत देवता किंवा पवित्र अप्सरा मानल्या जायच्या. प्राचीन तसेच आधुनिक चित्रकारीतेला निंफ्स ने ब-यापैकी आकर्षित केलेले युरोपात दिसते.

कशी वाटली तुम्हाला ही आकाशातील चित्तरकथा रोहिणीची? अवश्य सांगा, शेयर करा.

धन्यवाद

हेमंत ववले
निसर्गशाळा

Facebook Comments

Share this if you like it..