आकाशातील चित्तरकथा मृगनक्षत्राची – भाग १

मागील महिन्यात एका निरभ्र रात्री आकाशदर्शन कार्यक्रमात मृगनक्षत्राविषयी माहिती सांगत होतो. ही माहिती सांगताना, व्याध व व्याधाने मारलेला बाण हे देखील सांगितले. मृगनक्षत्राविषयी माहिती सांगण्याआधी स्वाभाविकच रोहिणी विषयी सांगितली होतीच. निसर्गशाळेचा आकाशदर्शन कार्यक्रम एकतर्फी नसतो, त्यात सहभागी झालेल्यांना सोबत घेऊन, त्यांना कितपत समजतय याचा अंदाज घेऊनच पुढे जात असतो. आणि प्रसंगी सहभागी झालेल्या लोकांकडुन शिकण्याची देखील आमची तयारी असतेच. तर मृगनक्षत्राविषयी माहिती सांगताना पोहेकर नावाच्या आमच्याकडे एका दुस-यांदा येणा-या मॅडम ने मृगनक्षत्र, रोहिणी आणि व्याध यांविषयी एक कथा सांगण्याची परवानगी मागितली. मी लागलीच हो म्हणालो. तर कथा  थोडक्यात अशी ..

प्रजापती दक्षची एक कन्या रोहिणी. रोहिणी खुपच रुपवान व तेजस्वी होती. तिचे तेज व सौंदर्य पाहुन दक्ष तिच्यावार भाळला. त्याला याचाही विसर पडला की ती आपली स्वतःचीच मुलगी आहे. तिने सुटका करुन घेण्यासाठी पळ काढला व महादेव शंकराचा धावा करीत राहिली. दक्ष तिच्या मागोमाग धावला. दक्षाने पाठलाग करताना हरणाचे म्हणजे मृगाचे रुप घेतले. तर रोहिणीच्या आर्त हाकांनी प्रसन्न होऊन भगवान शंकर तिच्या मदतीला धावले. महादेवाने व्याधाचे म्हणजे शिका-याचे रुप घेतले व त्यांनी एक बाण दक्षाला की जो मृगाच्या रुपात होता त्यास मारला. मारलेला बाण वर्मी बसला.

ही कथा किंवा आपण याला दंतकथा किंवा पुराणातील वानगी देखील म्हणु शकतो; त्यात मुल्य काय आहे की नाही हा प्रश्न देखील गौण अनुत्तरीत राहिल कदाचित, किंवा दक्ष इतका व्यभिचारी कसा काय होता असा नवीनच प्रश्न देखील पडेल किंवा असेही वाटेल की हे सारे केवळ थोतांड आहे. या सा-या शंका किंवा प्रश्नांची उत्तरे देणे हा या लेखाचा हेतु नाही हे आपण आधी समजुन घेऊयात. तरीही कुणाला याविषये अधिक माहिती करुन घ्यायची असेल तर त्यांनी मला व्यक्तिशः संदेश अथवा कमेंट द्वारे प्रश्न विचार्ले तर यथाशक्ती उत्तर देण्याचा प्रयत्न करीलच. असो!

तर मुद्दा हा आहे की हीच कथा भारतातील अनेक प्रांतांत थोड्या अधिक फरकाने ऐकावयास मिळते. पिढ्यानपिढ्या ही कथा व अन्यही कथा भारतात सांगितल्या गेल्या आहेत हजारोवर्षांपासुन. मग या कथा सांगण्याचा हेतु काय बरे असावा? आपण या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करुयात.

मागील लेखामध्ये मी तुम्हाला Asterism विषयी सांगितलेच आहे. Asterism म्हणजे ता-यांना काल्पनिक रेषांनी जोडुन, आभासी, काल्पनिक आकृती बनविणे. असे केल्याने आकाशाचा तो भाग ओळखणे खुप सोपे होते. Asterism च्याच सोबतीला पिढ्यानपिढ्या वरील सारख्या कथा देखील भारतात सांगितल्या जातात ज्यामुळे केवळ आकाशाचा एक छोटासा भागच नाही तर बराच मोठा भाग ओळखणे एकाच कथेने सहज सोपे होऊन जाते. एकदा कथा समजली तर तारकासमुह समजणे खुप सोपे कारण तारका समुह कथेतील पात्रांप्रमाणे गुणवैशिष्ट्ये असणारेच असतात.

निसर्गशाळा येथुन दिसणारे मृगनक्षत्र

उदा- वरील कथेत रोहिणी तेजस्वी आहे असे सांगितले आहे. आपण या काळात रात्रीच्या आकाशात पाहिले तर सुंदर (लालसर रगामुळे) आणि तेजस्वी दिसणारा रोहिणीचा तारा कथेतील रोहिणी या पात्राप्रमाणेच भासतो, तर शेपटी, डोके व धड असलेले हरीणरुप घेतलेला दक्ष म्हणजे मृगनक्षत्रातील मृग म्हणजे हरीण असल्यासारखे वाटतो. व्याध सर्वात जास्त तेजस्वी दिसणारा तारा तर त्याने मारलेला बाण म्हणजे मृगाच्या पोटात रुतलेला बाण होय. पुराण व त्यातील कथा यांचा असा उपयोग भारतात अगदी प्राचीन काळापासुन होत आला आहे. ही कथा आणि Asterism मुळे बनलेले चित्र याच तर आहेत निसर्गशाळेच्या आकाशातील चित्तरकथा.

चला तर मग आपण मृगनक्षत्र व त्याच्या आणखी काही चित्तरकथांविषयी माहिती घेऊयात.

मृगनक्षत्रास पश्चिमेकडील देशांमध्ये विशेषतः ग्रीकोरोमन संस्कृतीमध्ये ओरायन Orion असे म्हणतात. Orion या शब्दाचा अर्थ शिकारी किंवा योध्दा असा आहे. Orion हा शब्द बहुधा एकटा वापरला जात नाही. यास ‘Orion – The warrior’ असे संबोधले जाते. Orion हेच नाव आधुनिक खगोलविज्ञानाने या नक्षत्रास संबोधण्यासाठी घेतले. अर्थात भारतातील मृगनक्षत्र व पश्चिमेकडील Orion हे दोन्ही एकाच Asterism शी संबंधीत आहे तरीही यांच्या कथा व संदर्भ मात्र भिन्न आहेत. आपण ज्यास मृगनक्षत्र म्हणतो त्यास पश्चिमेत Orion म्हणतात. बेबिलोनियन संस्कृती मध्ये यास स्वर्गातील मेंढपाळ म्हंटले गेले. प्राचीन इजिप्त मध्ये Orion कडे साह (Sah) नावाचा एका देव म्हणुन पाहिले जायचे. तर आपण ज्यास व्याध म्हणतो त्यास सोप्डीट नावाची देवी म्हणुन पाहिले गेले. भारतीय, ग्रीक, रोमन, चीनी यांप्रमाणेच अर्मेनियम नावाची एक संस्कृती हजारो वर्षांपासुन अस्तित्वात होती. ती केवळ संस्कृतीच होती, त्यांचा एक देश होण्यासाठी रशियाच्या विभाजन होईपर्यंत अर्मेनियम लोकांना प्रतिक्षा करावी लागली. १९९१ साली अर्मेनिया एक देश म्हणुन अस्तित्वात आला. तर या अर्मेनियम संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती होती व तिची स्थापना हायक नावाच्या एका योध्द्याने केली असे मानले जायचे. हा काळा ख्रिस्तपुर्व हजारेक वर्षांच असावा. तर अर्मेनियम लोकांनी हजारो वर्षांपासुन हायक नावाच्या त्यांच्या संस्कृती संस्थापकाचे स्मरण म्हणुन Orion (आपण यास मृगनक्षत्र म्हणुन ओळखतो हे विसरु नका) कडे हायक च्या रुपानेच पाहिले.  प्राचीन चीन मध्ये देखील कालगणनेसाठी भारतामध्ये केली तशी नक्षत्रीय रचना आढळते. आपण २७ नक्षत्रे मानतो तर चीनी लोक २८. या २८ पैकी आपण ज्यास मृगनक्षत्र म्हणतो त्यास शेन् म्हणजे तीन (आकडा ३) असे म्हणतात. हा शेन् म्हणजेच ते तीन तारे ज्यास आपण व्याधाने मारलेला बाण म्हणतो व ग्रीकोरोमन ज्यास ओरायनचा बेल्ट म्हणतात ते तीन तारे. युरोपातील हंगरी प्रदेशातील परंपरांमध्ये आर्चर किंवा रीपर असे म्हणतात. त्याच हंगेरीयन परंपरेमध्ये व्याधाच्या बाणास न्यायाधीशाचा दंड म्हणजे लाठी असे म्हणायचे. स्कंदीनेवियन सभ्यतेमध्ये ओरायन बेल्ट कडे फ्रिग या देवतेच्या हातातील रेशीम गुंडाळी करण्यासाठी वापरण्याची दांडके किंवा छोटी छडी म्हणुन पाहण्यात आले आहे. सायबेरीयन लोकप्रथांमध्ये देखील ओरायन या asterism ला शिकारी म्हणुन पाहिले गेले तर ज्यास आपण रोहिणी चा तारा म्हणतो तो म्हणजे या शिका-याने मारलेला बाण असे सायबेरियन लोक मानीत.

Orion Constellation Depiction as Warrior

इंडॉलोजी नावाची एक अभ्यासशाखा अस्तित्वात आहे हे तुम्हाला माहिती आहे का? या अभ्यासशाखेत इंडिया विषयी, इंडियाच्या प्राचीनत्वाविषयी अभ्यास केला जातो. या विषयाचा अभ्यास प्रामुख्याने ब्रिटीश काळात ब्रिटीश अभ्यासकांनीच सुरु केला. ब्रिटीशांच्या चष्म्यातुनच भारताचा अभ्यास करण्याचा पायंडा गुलाम इंडियामध्ये पडला. हा अभ्यास, संशोधन भारत कधीही संपन्न, सुसंस्कृत नव्हताच, तो गुलाम बनण्याच्याच योग्यतेचा आहे केवळ हे भारतीयांना दाखवण्यासाठीच केला गेला व आजही असेच होत आहे. फरक एवढाच तेव्हा गोरे ब्रिटीश हा अभ्यास करायचे आता काळे ब्रिटीश म्हणजे गुलाम मानसिकता असलेले भारतीयच असे निष्कर्ष काढताहेत. इंडोलोजी विषयी लिहण्याचे कारण असे की या इंडोलोजीने भारतातील सर्वात प्राचीन व पवित्र मानला जाणारा ग्रंथ ऋग्वेद याचा काळ इसपु १५०० वर्षे असा ठरवला. आजही असेच मानले व शिकविले जाते. पण जसजसे विज्ञान तंत्रज्ञान सहज साध्य होऊ लागले, तसतसे यातील रोचक तथ्ये समोर येऊ लागली. ऋग्वेदामध्ये काही ठिकाणी अवकाशीय पिंडाचे वर्णन येते. ग्रह-तारे-तारकासमुह-नक्षत्रांच्या स्थानाविषयी माहिती मिळते. आज जेव्हा संगणकीय पध्दत वापरुन नक्षत्रांची ऋग्वेदात सांगितलेली स्थिती, नेमकी कधी म्हणजे भुतकाळात केव्हा होऊन गेली तेव्हा तश्या स्थिती चार हजार, आठ हजार तसेच अगदी दहा हजार वर्षांपुर्वी होत्या हे समजते. म्हणजे दहा वर्षापुर्वी केलेल्या आकाशदर्शनाची नोंद ऋग्वेदामध्ये आढळते. याच ऋग्वेदामध्ये सर्वप्रथम मृग नक्षत्राचा उल्लेख आढळतो.

मृग-तारका समुहातील म्हणुन ओळखला जाणारा व्याध हा जो तारा आहे त्यास आधुनिक खगोलीय भाषेत Sirius असे म्हणतात तर ग्रीकोरोमन चित्तरकथांमध्ये यास ओरायनचा मोठा कुत्रा असे संबोधले आहे म्हणजेच जागतिक स्तरावर प्रमाणित तारकासमुहांच्या यादीतील Canis Major. ओरायन द वॉरीयर किंवा शिकारी त्याच्या सोबत कुत्रे घेऊन फिरतो. हो कुत्रे, एकापेक्षा जास्त. मग दुसरा कुत्रा कुठाय बरं? तर तो देखील आहे. त्याला Canis Minor म्हणजे छोटा कुत्रा म्हणतात. तो नेमका कुठय हे तुम्हाला खालील चित्रात समजेल. या छोट्या कुत्र्यास प्रमाणित यादीप्रमाणे प्रोसिऑन Procyon असे म्हणतात. भारतात यास लघुलुब्धक म्हणजेच व्याधाचा छोटा कुत्रा असे म्हटले गेले आहे.

व्याधाने जो बाण मारलाय हरणाला, तो बाण म्हणजे एका सरळ रेषेत असणारे तीन तारे. हे तीनही तारे आकाशात असताना पटकन नजरेत भरतात.पहिला व दुसरा आणि दुसरा व तिसरा या दोहोंतील अंतर डोळ्यांना सारखेच दिसते. आपण त्याला बाण म्हणतो तर ग्रीकोरोमन चित्तरकथांमध्ये त्यास ओरायनच्या कमरेचा पट्टा म्हंटले गेले आहे. ओरायनस बेल्ट हा अगदी परवलीचा शब्द आहे आकाशप्रेमींमध्ये. आणि हेच तीन तारे म्हणजे चीनी खगोलातील शेन् होय.

या तारकासमुहामध्ये आधुनिक खगोलींना अनेक आश्चर्यकारक तथ्ये आढळली आहेत आणि गम्मत म्हणजे ही तथ्ये खुप सुंदर देखील आहेत. लेखाच्या पुढील भागामध्ये आपण जाऊयात मृगाच्या अंतरंगात.

कळावे

आपलाच
हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..