जीवन जगताना संघर्ष या पृथ्वीतलावरील सर्वच प्राण्यांच्या वाट्याला आलेला आहे. जंगली प्राण्यांच्या बाबतीत हा संघर्ष त्यांचे अस्तित्व वर्तमानात टिकवण्यासाठी असतो. अगदी याच प्रमाणे कधी काळी मनुष्य “प्राण्याचा” संघर्ष देखील वर्तमानामध्ये अस्तित्व टिकवण्यासाठीचा होता. जिवंत राहण्यासाठी स्पर्धा करावी लागत होतीच, पण ती स्पर्धा मनुष्या-मनुष्या मध्ये कमी होती व इतर प्राण्यांच्या सोबत जास्त होती. कधी बचाव तर कधी हल्ला अशा दुहेरी नीतीद्वारे मनुष्याने स्वःतला विकसीत केले आहे. अगदी आदीम काळापासुन हा संघर्ष सुरु आहे. आधुनिक काळामध्ये मात्र या संघर्षाची परिभाषा बदलली आहे. सध्या हा संघर्ष मनुष्य विरुध्द इतर प्राणी असा राहिला नसुन हा संघर्ष मनुष्य विरुध्द मनुष्य असा झालेला आहे. पण संघर्ष संपलेला नाही.

या संघर्षाच्या ओघामध्येच इतिहास, संस्कृत्या, सभ्यतांचा जन्म झाला. या शोधामध्ये मनुष्य आणि इतर प्राणी यांच्या मध्ये एक ठळक फरक मात्र मनुष्याचा लेखी स्पष्ट झाला. अगदी सगळ्याच मनुष्य जातीला जरी तो आकळलेला नसला तरी त्या त्या युगांमध्ये काही दुरदृष्टी असणा-या मोजक्या लोकांना तो स्पष्ट दिसला. हा फरक म्हणजे संघर्ष जर अटळ असेल तर तो वर्तमानासाठीच म्हणजे “आज जिवंत राहण्यासाठीच” न करता भविष्यासाठी म्हणजे “उद्या आणि येणा-या काळासाठी अस्तित्व टिकवण्यासाठी” करावा, असा झालेला सार्वत्रिक साक्षात्कार. असा साक्षात्कार होणारे पुरुष-स्त्रिया पृथ्वीतलावर वेगवेगळ्या कालखंडांमध्ये, वेगवेगळ्या भुभागावर होऊन गेले. याच लोकांच्या अनुभव, अभ्यास व साक्षात्काराच्या जोरावर आधुनिक काळातील सर्वच्या सर्व ज्ञान-विज्ञानाच विस्तार झालेला आहे. नुसते ज्ञान-विज्ञानच नाही तर श्रध्दा-अंधश्रध्दा आदींचा जन्म देखील याच व अशाच लोकांच्या चिंतन-मननामधुन झालेला आहे.

जगभर अशी भविष्य “पाहणारी” आणि ते भविष्य अधिक सुरक्षित व आनंददायी करण्यासाठी प्रयत्न करणारी माणसे होऊन गेली. आज ही आहेतच. आदीम काळात मनुष्याने जे काही प्रयत्न केले उन्नत जीवन जगण्यासाठी त्या प्रयत्नांच्या अग्रस्थानी शेती करण्याच्या कल्पनेला स्थान आहे. आणि ही शेती अधिक लाभदायी व शाश्वत करण्यासाठी म्हणुन ऋतुचक्राचा अभ्यास अनुषंगानेच आला. मनुष्याने जेव्हा कधी एकटक आपली दृष्टी रात्रीच्या अब्जावधी ता-यांकडे पहिल्यांदा लावली असेल तेव्हा त्यास किती विस्मय, आश्चर्य झाले असेल! याची कल्पनाच करवत नाही. आणि मग सुरु झाला आकाशीच्या तारांगणाचा, त्याच्या ठाव घेण्याचा एक अनुपम प्रवास. हा प्रवास कंटाळवाणा नाहीये. हा प्रवास त्रासदायक नाहीये. हा प्रवास शिण आणणारा नाहीये. हा प्रवास आनंददायी आहे. मनुष्याच्या आणि पर्यायाने या पृथ्वीच्या अगदी कःपदार्थ असल्याच्या साक्षात्काराचा हा प्रवास ऋतुचक्राचे अचुक ज्ञान देणारा तर ठरलाच पण याने आणखी एक महत्वाचा धडा मनुष्यास शिकविला. तो म्हणजे भविष्य सुरक्षित करण्याच्या अट्टाहासामध्ये आपण आपला आज, आता, वर्तमान मात्र आनंदात, कसल्याही किंतु परंतु शिवाय जगला पाहिजे.

यातुनच जगभरातील सर्वच्या सर्व संस्कृत्यांमध्ये तारांगणाच्या अभ्यास, त्या अभ्यासाचा वापर दैनंदिन जीवनात करणे सुरु झाले. आकाशामध्ये चम चम करणारे, लुक लुक करणारे जे काही आहे, ते सगळेच्या सगळे तारे म्हणजे तारका नसुन त्यातील काही ग्रह आहेत, याचे ही ज्ञान मिळाले. ग्रह,ता-यांच्या याच अभ्यासाला हल्ली आपण खगोल शास्त्र म्हणतो. इंग्रजी मध्ये यास astronomy म्हणतात.
[print_vertical_news_scroll s_type=”modern” maxitem=”5″ padding=”10″ add_link_to_title=”1″ show_content=”1″ modern_scroller_delay=”5000″ modern_speed=”1700″ height=”200″ width=”100%” direction=”up” ]
कोणत्याही निरभ्र रात्री चुकुन आपली दृष्टी जर आकाशाकडे गेली व आपल्या दृष्टीस काही चांदण्या दिसल्या तर आपण क्षणभर का होईना अचंबित होतोच. कोणताही माणुस असो, त्याला खगोलातील कसलेही ज्ञान नसले तरी देखील ता-यांनी गच्च भरलेले आकाश पाहुन सुरुवातीस तो आश्चर्याने आनंदीत होतो तर नंतर अंतर्मुख देखील होतोच. अगदी सामान्य माणुस खगोलशास्त्रामध्ये जरी रसहीन दिसत असला तरी एखाद्या रात्रीचे अनंत आकाशदर्शन त्याला देखील मोहित करतेच करते.

पृथ्वी सपाट आहे, चौकोनी आहे अशा अनेक आदीम कल्पंनापासुन दिर्घिका म्हणजेच आकाशगंगा (Galaxy) , दिर्घिकांच्या स्थानिक वस्त्या ते अगदी दृष्टी पलीकडच्या, आकलना पड्यालच्या दुरस्थ दिर्घिकांच्या अंतहीन जाळ्या इथपर्यंत आपण आज शोध घेऊ शकलो आहोत.
दर आठवड्याला आपण याच अनंत अतर्क्य अंतरिक्षातील अनेक अचंबित करणा-या गोष्टी अक्षरशः कथा-कहान्यांच्या रुपात, ज्ञानरंजक पध्दतीने पाहणार आहोत. ही लेखमाला वाचकाला खगोला विषयी नुसतीच उत्सुकता प्रदान करणार नाही तर कदाचित जीवनाचे सार देखील शिकवण्याचे काम करील. विद्यार्थ्यांमध्ये या क्षेत्राविषयी कुतुहल जागे करुन त्यांना खगोल अभ्यासाची कवाडे देखील कदाचित या लेखमालेमुळे खुली होतील.
भेटुयात तर मग प्रत्येक आठवड्याला, या ब्लॉगच्या माध्यमातुन, आणि जाणुन घेऊयात आकाशातील चित्तरकथा! यापुर्वी लिहिलेल्या आकाशातील चित्तर कथा तुम्हाला याच ब्लॉगवर वाचता येतील.
हेमंत ववले
निसर्गशाळा, पुणे
Share this if you like it..
नको पाटी पुस्तक,अन नको खडू फळा,
अजब, अनोखी आवडते मज निसर्ग शाळा
सुवर्णा सातपुते पुणे
खुपच सुंदर रचना निसर्गशाळेसाठी. खुप आभार आपले..