आकाशातील चित्तरकथा – मेष – अश्विनी व भरणी

stargazing near Pune

आपण आपल्या दैनंदिन जीवनात खगोलशास्त्रा विषयी जेवढे ऐकले नसेल त्यापेक्षा जास्त आपण ज्योतिष या विषयाबद्दल ऐकले वाचले असेल. ज्योतिष राशींवर आधारीत आहे तर खगोलशास्त्र नक्षत्रांवर! भारतीय ज्योतिष आणि खगोलशास्त्र या दोहोमध्ये एक साम्य आहे व ते म्हणजे दोन्हींची सुरुवात एकाच तारकापुंजाने होते. राशींमधील पहिली राशी मेष मानली जाते तर नक्षत्रांमधील पहिले नक्षत्र अश्विनी मानले जाते. राशी १२ आहेत तर नक्षत्र २७ आहेत. राशी किंवा नक्षत्र म्हणजे नेमके काय? तर आकाशातील मुख्यत्वे करुन रात्रीच्या आकाशातील तारे-तारकापुंजाच्या विशिष्ट कल्पिलेल्या आकृत्यांना विशिष्ट नावे दिली जातात. ही नावे देताना , त्या ता-यांना जोडुन तयार होणा-या एखाद्या आकारावरुन, आकृतीवरुन नावे ठरविली गेली. अशाप्रकारे आकाशात दिसणा-या ता-यांच्या विविध आकारांवरुनच त्यांना अशी नावे दिली गेली.

मेष म्हणजे मेंढा

यापुर्वी आपण आकाशातील जेवढ्या ही चित्तरकथा पाहिल्या त्या सर्वांमध्ये आपण पाहिले की बहुतेक करुन जगातील सर्वच संस्कृत्यांमध्ये विशिष्ट तारका समुहास जे नाव आहे, अगदी त्याच अर्थाची नावे अन्य संस्कृत्यांमध्ये दिसुन येतात. हा निव्वळ योगायोग आहे का?

आकाशामध्ये मेष(Aries) व त्या मधीलच अश्विनी व भरणी नक्षत्रे कसे दिसतात ते आधी आपण पाहुयात.

 

या काळात, म्हणजे जानेवारी नंतर, हा तारकासमुह पुर्ण अंधार पडेपर्यंत अगदी डोक्यावर आलेला असतो.

सध्या, म्हणजे फेब्रुवारीच्या च्या सुरुवातीस, कोणत्याही रात्री आपण पुर्वेकडे तोंडकरुन उभे राहीलो व तसेच सरळ रेषेत आपण मान हलवत, नजर वरच्या दिशेने, अगदी बरोब्बर डोक्यावर नेली तर अगदी डोक्याच्या वर आपणास वरील आकृतीमधील, वर्तुळात दाखवलेली आकृती दिसेल. तेच आहे मेष. मेष राशी मध्ये एकुण चार तारे आहेत. त्यातील सर्वात शेवटचा म्हणजेच पुर्वेकडचा तारा सोडुन, पहिल्या तीन ता-यांचे मिळुन अश्विनी नक्षत्र बनते. व मेष मधील चौथा तारा म्हणजे भरणी नक्षत्रातील मुख्य तारा. एकदा अश्विनी नक्षत्र ओळखता आले की, भरणी लागलीच समजते. अश्विनी नक्षत्राच्या खालोखाल,पुर्वेकडे थोडस उजवीकडे आपणास एक त्रिकोण सदृश्य आकार दिसेल, ते म्हणजे भरणी नक्षत्र. सोबतची आकृती पहा.

वर्तुळांकीत केलेली दोन्ही नक्षत्रे

प्रत्येक राशीमध्ये २७ नक्षत्रांपैकी सव्वा दोन नक्षत्रे मोजली आहेत. त्यामुळे मेष राशीमध्ये अश्विनी भरणी सोबतच, कृत्तिका नक्षत्राचा एक चतुर्थांश भाग देखील येतो. कृत्तिकां चित्तरकथा वाचण्यासाठी व हाय डेफिनिशन फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मेंढ्याची चित्तरकथा

एक युनानी प्राचीन-पुराण कथा मेंढ्या विषयी आहे. या कथेतील मेंढा नुसता मेंढाच नाहीतर सोनेरी मेंढा असुन तो आकाशामध्ये उडाण देखील भरु शकत होता.

बिओशिया नावाच्या एका राज्यातील ही गोष्ट आहे. राजाचे नाव अथॅमस. या राजाला दोन पत्न्या (बायका) होत्या. यातील पहिल्या पत्नी नफाली पासुन दोन मुल होती. मुलगा फ्रिक्सस आणि मुलगी हेली. काही कारणामुळे अथॅमस व नफालीमध्ये नाराजे झाली व राजाने दुसरे लग्न आयनो नावाच्या शेजारच्या राज्यातील एका राजकन्येशी केले. आयनोला स्वःतच्या मुलासाठी राजगादी पाहिजे होती त्यामुळे तिने राज्यात कृत्रिम दुष्काळ निर्माण केला. व देवदुतांमार्फत खोटा संदेश राजाजवळ पोहोचवला. त्यात फ्रिक्सस च बळी दिल्यास दुष्काळ निर्मुलन लागलीच होईल असा आदेश होता. त्याप्रमाणे राजाने फ्रिक्ससचा बळी देण्याची सर्व तयारी केली.

ऐनवेळी नफाली म्हणजे फ्रिक्सस ची आईने, फ्रिक्सस ला व हेली ला वाचवण्यासाठी तिने आकाशातुन एक पंख असलेली मेंढी/मेंढा की ज्याच्या अंगावर साधारण लोकर नसुन चक्क सोनेरी लोकर होती. फ्रिक्सस व हेली दोघेही त्या मेंढ्यावर बसले. मेंढा आकाशात उडु लागला. अशा प्रकारे नफाली ने आपल्या मुलांचे प्राण वाचवले. आकाशातुन उडताना, अचानक हेली ची पकड सैल झाली व ती आकाशातुन खाली पडुन, मृत्युमुखी पडली. ती ज्या ठिकाणी पडली त्या जागेला ग्रीकांनी हेलेस्पॉन्ट असे नाव, तिच्या स्मरणार्थ दिले आहे व ते आजही वापरले जाते.

सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर, फ्रिक्सस ने त्याच सोनेरी मेंढ्याचा बळी ग्रीक आदी देव झिऊस ला दिला. त्यानंतर त्या मेंढ्याची सोनेरी लोकर एका राजाला भेट दिली. पुढे जाऊन नफालीने, झिऊस करवी त्या मेंढ्याला आकाशात कायमचे स्थापित केले. आकाशात स्थापित केलेला तो मेंढा म्हणजेच मेष राशी.

त्यानंतर ब-याच काळानंतर, अथॅमस च्या राज्यामध्ये यादवी होऊन पेलीयस राज्य बळकावतो. राज्याचा खरा उत्तराधिकारी असतो जेसन.  फ्रिक्सस च्या मृत्युनंतर फ्रिक्ससचे भुत, अथॅमस मध्ये येऊन पेलीयस कडुन राज्य पुन्हा जेसन ला देण्याचे वचन घेते. त्यावेळी पेलीयस एक अट घालतो की जर जेसन ती सोनेरी लोकर माघारी घेऊन आला तरच त्याला राज्य मिळेल. पुढे जेसन त्याच्या साथीदारांसह ती सोनेरी लोकर मिळविण्याच्या मोहीमेवर जातो.

जेसन च्या मोहीमेवर आजवर अनेक इंग्रजी चित्रपट बनवले गेले आहेत. जेसन ॲन्ड ऑर्गोनॉट्स या नावाने!

ग्रीक, रोम, युनान या सा-यांमध्ये थोड्या अधिक फरकाने हीच कथा पहावयास मिळते.

प्राचीन चिन  मध्ये देखील या तारकासमुहास ओळखले गेले होते. प्राचीन चिनी खगोलशास्त्रानुसार. या नक्षत्रास लोव किंवा लासो असे म्हणतात. याचा अर्थ, बळी देण्यासाठी धरुन आणलेला प्राणी म्हणजे रेड किंवा मेंढा. ज्यावेळी प्राचीन चिनी खगोल शास्त्रानुसार त्यांनी कालगणना सुरु केली त्यावेळी वसंत ऋतुतील एकसमान दिवस व रात्र असणारी वेळ, याच तारका समुहाने ओळखली गेली. त्यामुळे भारतीय खगोलामध्ये ज्याप्रमाणे अश्विनी हे पहिले नक्षत्र मानले जाते, तसेच चिनी खगोलशास्त्रदेखील याच तारकासमुहाने सुरु होते.

भारतामधील विविध प्राचीन, आर्ष ग्रंथामध्ये अश्विनी व भरणी (सर्वच नक्षत्रांविषयी) माहिती मिळते. मुळ पौराणिक कथेनुसार, दक्ष प्रजापती राजास, त्याच्या वीरणी नावाच्या पत्नीपासुन ६० कन्या झाल्या. त्यातील २७ मुलींचा विवाह, सोम, म्हणजेच चंद्रासोबत केला गेला. या २७ कन्या म्हणजेच २८ नक्षत्रे होत. चंद्र दररोज २७ पैकी एका पत्नीसोबत राह्तो. अशी आख्यायिका आहे.

भारतीय प्राचीन साहित्यांत आणखी कथा सापडते, ती अशी! अश्विनी म्हणजे सुर्याची पत्नी आहे. सुर्याचे तेज सहन न झाल्याने ती सुर्याला सोडुन जाऊन, घोडीचे रुप घेऊन तप करीत असते. अश्विनी म्हणजे घोड्याचे तोंड असलेली. जेव्हा सुर्यदेवास तिच्याविषयी समजते, तेव्हा तो देखील घोड्याचे रुप घेऊन तिची समजुत काढण्यासाठी जातो. त्यांच्या मिलनातुन दोन तेजस्वी बालकांचा जन्म होतो. त्या बालकांस अश्विनीकुमार असे म्हंटले आहे. अश्विनीकुमार ज्ञान-विज्ञान आणि औषधींचे आदीदेव म्हणुन भारतीय ग्रंथांमध्ये अग्रस्थानी मानले जातात.

चला आता आपण या तारका समुहाविषयी वैज्ञानिक सत्यापित माहिती घेऊयात.

मेष या तारका समुहामध्ये करुन ४ मुख्य ता-यांचा व अन्य अनेक फिकट तारे व काही आकाशगंगांचा (गॅलक्सीज) चा समावेश होतो.

या ४ मुख्या ता-यांपैकी जो सर्वात जास्त तेजस्वी दिसतो त्यास हमल या नावाने ओळखले जाते. हा तारा पृथ्वीपासुन ६६ प्रकाशवर्षे इतका दुर आहे. या सोबतच शेरेटन (५९ प्रकाशवर्षे दुर) व मेसेट्रिम (१६४ प्रकाशवर्षे दुर) असे आणखी दोन तारे हमल पेक्षा फिकट यात दिसतात.

मेष तारकासमुहामध्ये ता-यांच्या सोबतच काही आकाशगंगा देखील आहेत. एकुण ४ आकाशगंगा असुन त्यातील एनगीसी ७७२ ही त्यापैकी सर्वात जास्त प्रकाशमान असुन ती वर्तुळाकार/सर्पिल आकाशगंगा आहे. या तारकासमुहातील ३ क्रमांकाचा कांतिमान असलेल्या ता-याच्या जवळ पाहिल्यास ही आकाशगंगा दुर्बिणीमधुन दिसु शकते. अन्य आकाशगंगा अधिक मोठ्या दुर्बिणीतुन पाहाव्या लागतात.

NGC772 ही आकाशगंगा कशी आहे?

ही आकाशगंगा आपल्या दुग्धमेखला आकाशगंगेपेक्षा दुप्पट मोठी आहे. हिच्या अवतीभवती अनेक छोट्या उपआकाशगंगा आहेत. त्यातील एक खुजी आकाशगंगा म्हणजे NGC 770 होय. NGC772 मध्ये दोन सुपरनोव्हा देखील आढळुन आले आहेत.

 

NGC772 ही आकाशगंगा

मेष तारकासमुह विविध उल्का वर्षावासाठी देखील ओळखला जातो. दिवस होणारे उल्कावर्षाव (हे डोळ्यांना दिसत नाहीत यासाठी रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो), डेल्टा एरिटीड उल्कावर्षाव (दरवर्षी ८ डिसेंबर ते १४ जानेवारी, आणि ९ डिसेंबर सर्वाधिक उल्का पडण्याची रात्र) व ऑटम एरिटीड (७ सप्टे ते २७ ऑक्टोबर व सर्वाधिक उल्का पडाण्याची रात्र ९ ऑक्टो) अशा तीन उल्का वर्षावांचे केंद्र/उद्गम मेष तारका समुह आहे.

या तारकासमुहा मध्ये काही सुर्यमाला देखील सापडल्या असुन, आपल्या पृथ्वीच्या पेक्षा दहापट आकाराने व वस्तुमानाने मोठे काही ग्रह HIP 14810 या ता-याभोवती सापडले आहेत. HD 12661, व HD 20367 असे आणखी दोन तारे व त्याभोवती अनुक्रमे २ व १ ग्रह फिरताना आढळले. आपल्या सुर्यमालेच्या बाहेर, अन्य सुर्यासम ता-याभोवती सापडणा-या ग्रहांना एक्सोप्लॅनेट असे म्हंटले जाते.

संपुर्ण आधुनिक खगोगशास्त्रामध्ये भारतीय नावांचा वापर क्वचितच आढळतो. या तारकासमुहामधील ४ मुख्य ता-यांपैकी शेवटचा तारा “भरणी” या नावाने आधुनिक खगोलशास्त्रामध्ये अधिकृत रित्या ओळखला जातो. आपण आधी पाहिल्याप्रमाणे, भरणी हे एक स्वतंत्र नक्षत्र मानले गेले आहे प्राचीन भारतीय खगोलशास्त्रामध्ये!

भरणी नक्षत्र

वैदिक काळामध्ये या नक्षत्रास अप-भरणी असे म्हणत. या नक्षत्रामध्ये तीन तारे असुन ते योनिच्या रुपात, एक साधारण समभुज त्रिकोणाच्या रुपात, मेष तारकासमुहामध्ये आहे. भरणीचा अर्थ आहे भरणा पोषण धारण करणारी. चंद्राच्या २७ पत्न्यांपैकी (नक्षत्रांपैकी) ही देखील एक.

हे नक्षत्र आपणापासुन १६६ प्रकाशवर्षे इतके दुर आहे.

मेष तारकासमुहाच्या उत्तर-पश्चिम दिशेला त्रिभुज (ट्रायंग्युलम) व देवयानी सर्पिल आकाशगंगा (Andromeda Galaxy) आहे. साध्या दुरबिणीतुन देखील ही आकाशगंगा पाहता येते. आणि आकाश जर स्वच्छ असेल, प्रकाश व वायु प्रदुषण अजिबात नसेल तर नुसत्या डोळ्यांना देखील ही आकाशगंगा दिसते. हि तिच आकाशगंगा आहे जी आपल्या दुग्ध मेखला या आकाशगंगेकडे सातत्याने सरकत आहे व भविष्यात आपली आकाशगंगा व देवयानी आकाशगंगा एकमेकांनावर आदळुन, दोन्हीपासुन एकच आकाशगंगा तयार होईल. त्यावेळी आपल्या आकाशगंगेतील सर्वच्या तारे, सुर्यमाला , ग्रह यांच्या दशा व दिशा दिशा बदलुन जातील. कित्येक तारे, ग्रह कायमचे नष्ट ही होतील. होय असे होणार आहे. पण कधी? आज पासुन जवळ जवळ ६,००,००,००,००० इतक्या वर्षांनी या दोन्ही आकाशगंगा एकमेकांवर आदळाणार आहेत. त्यामुळे आपणास तुर्त तरी काळजी करण्याची गरज नाहीये.

देवयानी आकाशगंगेविषयी अधिक माहिती साठी खालील व्हिडीयो अवश्य पहा!

https://www.youtube.com/watch?v=_P1xKh_kZFU&vl=en

थोडक्यात आढावा

मेष (अश्विनी, भरणी) पाहण्यासाठी उत्तम काळ कोणता? – हिवाळा (नोव्हे ते जाने)

योग्य वेळ – संध्याकाळ ते रात्री १० पर्यंत

कुठे पहायचे – पुर्वे आकाशामध्ये

सर्वाधिक प्रकाशमान तारा – हमल

दुर अंतरीक्षातील इतर घटक – ४ आकाशगंगा

जवळील लक्षणीय घटक – हा तारकासमुह मावळताना, त्याच्या जवळील देवयानी आकाशगंगा पाहता येते.

आकाशातील चित्तरकथा तुम्हाला कशी वाटली याविषयी अवश्य तुमचा अभिप्राय कळवा. आमच्या नवनवीन लेखांविषयी माहिती मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज अवश्य लाईक करा.

nisargshala facebook page -->

Upcoming.

Star gazing Party near Pune

Feb 5th And Feb 26th ; 2022

Facebook Comments

Share this if you like it..