पावसाळी सहली साठी पुण्याजवळील सह्याद्रीचे पाच घाट
नेमेची येतो मग पावसाळा, श्रावणात घन निळा, नभ उतरु आलं इत्यादी गीत काव्यांमधुन पावसाळ्याच्या अनुपम सौंदर्याला शब्दात बध्द करीत अनेक कवि गीतकारांनी पावसाळ्याला आणखी जास्तच सुंदर केले आहे.
मनुष्यमात्र सतत आनंदाच्या शोधात असतो. हा आनंद त्याला अनेक छोट्या मोठ्या गोष्टींमधुन मिळत असतो. मिळत नसेल तरी मनुष्याला हे चांगलेच ठाऊक आहे की आनंद कसा मिळवायचा. प्रत्येकाची आनंदाची अपेक्षा वेगवेगळी असली तरी भारतात मात्र मोसमी पावसाळ्यामुळे प्रत्येकाचा आनंद कित्येक पटीमध्ये वृध्दींगत होत असतो.
विशेषतः पश्चिमघाट माथ्यावर बरसणा-या या पावसाच्या धारा सजीवसृष्टी मध्ये नव चैतन्य निर्माण करतात यात शंका नाही. वृक्ष, वेली, झुडपे, गवताची सळसळणारी पाती, किट मुंग्या, गाई गुरे, जंगली प्राणी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतकरी,,, या सर्वांचा आनंद कित्येक पटीमध्ये वाढत असतो. व हा वृध्दींगत झालेला आनंद दृश्य स्वरुपात आपण अगदी याची देही याची डोळा पाहु शकतो. फक्त त्यासाठी यासा-यांकडे पाहण्याची एक निरलस दृष्टी मात्र आपणाकडे हवी.
तुम्ही पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये राहत असाल तर हा लेख तुमच्या साठीच आहे. आज आम्ही तुम्हाला पुण्याच्या जवळ अशा नयनरम्य निसर्गाचे दर्शन, कमीत कमी त्रासामध्ये आणि ट्राफिक जाम शिवाय कसे व कुठे घेता येईल हे सविस्तर व अचुकपणे सांगणार आहोत.
पुण्याइतके भाग्यवान शहर कदाचितच इतर कोणतेच नसेल. घाटमाथ्यापासुन साधारण ४० किमी अंतरावर घाटमाथा शहराच्या पश्चिमेला आहे. व पावसाळ्याच्या ख-या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी घाटमाथ्या शिवाय आणखी दुसरी कोणतीही सुंदर जागा दुसरी कोणतीही नाही यात संशय नाही. चला तर बघुयात पुण्याजवळ कुठे कुठे पावसाळी भटकंतीचा मस्तवाल अनुभव घेता येईल ते.
तस पाहता पुण्यापासुन १०० किमी अंतराच्या आत अक्षरक्षः ३० ते ४० ठिकाणे आहेत जिथे जाता येउ शकते. या सर्व ठिकाणी सह्याद्रीतील घोंघावणा-या वा-यावर स्वार होणा-या जलधारा आपण नुसत्याच पाहु शकत नाही तर प्रत्यक्ष अंगावर देखील घेऊ शकतो. या प्रत्येक ठिकाणी आपण सगळेच जाऊ शकतो असे नाही. काही ठिकाणी ट्रेकर्स, भटके, रॉक क्लांईबर्स च जाऊ शकतात. तर काही ठिकाणी जाणे जिकीरीचे होऊ शकते.
आज आम्ही तुम्हाला पुण्याच्या जवळ, तरीही घाटी पावसाचा आनंद घेण्यासाठी जिथे जाता येईल अश्या पाच सह्याद्रीच्या घाटांविषयी सांगणार आहोत. हे पाच घाट म्हणजे सह्याद्रीची पाच रत्नेच आहे जी पुण्यापासुन अगदीच जवळ आणि स्वर्गासम सुंदर आहेत.
-
मढे घाट –
अगदी पहाटे पासुन ते मध्यरात्री पर्यंत, पाऊस कसा कोसळतो, आपणासमोर पावसाच्या धारा कशा एका पाठोपाठ ढगातुन धरतीवर पडतात, नद्या, धबधबे कसे दुथडी भरुन वाहतात, हे सगळे निसर्गाचाच एक भाग बनुन अनुभवता येईल या पावसाळी सहलीमध्ये. धबधबा नुसताच पाहणे नाही,
हा घाट पुण्यापासुन ७० ते ९० किमी एवढ्या अंतरावर आहे. पुण्यापासुन इथे जाण्यासाठी बेंगलोर हायवे ने. बेंगलोर कडे निघावे व चेलाडी फाट्यापासुन उजवीकडुन, नसरापुर हुन पुढे वेल्हे गाठावे. वेल्ह्यामध्ये चहा नाश्ता करुन, मढे घाटावर जाता येईल. अंतर १७ किमी आहे. इथुन पुढे घाट रस्ता सुरु होतो. रस्ता अरुंद व वळणावळणाचा आहे. पटाईत गाडी चालवणारेच फक्त इकडे गाडी चालवु शकतात. त्यातच पाऊस सुरु असेल तर गाडी चालवणे आणखी अवघड जाते.
मढे घाट हा ऐतिहासिक घाट आहे. सिंहगडावर हौतात्म्य आलेले तानाजी मालुसरे यांचा मृतदेह याच घाटाने कोकणात त्यांच्या गावी नेला होता. बोली भाषेत मृतदेहास मढ म्हणतात त्यामुळे या घाटास मढे घाट असे नाव पडले. जुन्या घाट पाय-या अजुन ही इथे दिसतात. यासाठी तुम्हाला थोडे अधिक खाली उतरावे लागेल. पण पावसाळ्यात शक्यतो घाटात खाली उतरणे टाळावे.
साधारण १२० फुटांचा जलप्रपात तुम्हाला इथे अगदी समोरुन पाहता येतो. जीवाही काळजी घेत, कसलाही आगाऊ पणा न करता निसर्गाचा आनंद घ्यावा. मागील काही वर्षांमध्ये या घाटात, कड्यावरुन पडुन अनेकजणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे मद्यपान करुन या परीसरामध्ये फिरकणे टाळा. २४ तास पोलिस देखील असतात इथे त्यामुळे जर कुणी दारु पिताना सापडलाच तर त्याला तुरुंग वारी नक्कीच.
रस्ते अरुंद असल्याने शक्यतो १७ सीटर बस पेक्षा मोठी वाहनाने प्रवास करणे टाळा.

धुक्यात हरवलेला मढे घाट
मढे घाटाची सहल एका दिवसाचीच आहे. पण तुम्हाला जर मढे घाट पाहुन, मुक्काम करायचा असेल व सोबतच वॉटरफॉल रॅपलिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या कॅम्प्ससाईटवर तुमचे स्वागत आहे. वॉटर फॉल रॅपलिंगचा थरार काय असतो हे या व्हिडीयो मध्ये पहा.
निसर्गशाळा सह्याद्रीच्या कुशीत जरी असली तरी गाडीने तिथपर्यंत पोहोचता येऊ शकते. पुण्यापासुन अगदी ६०/७० किमी अंतरावर असलेल्या या कॅम्पसाईटपासुन राजगड, तोरणा, मधेघाट, उफांड्या घाट, गोट खिंड, रायलिंग पठार, लिंगाणा अशी पुण्यातील रत्ने अवघ्या काही किमी अंतरावर आहे. आयोजकांशी आधीच बोलुन तुम्ही यापैकी एखाद्या ठिकाणी जाण्याचा बेत तयार करु शकता. नळ चालु केल्यावर ज्याप्रमाणे पाणी बदाबदा पडते, त्याप्रमाणे कोसळणा-या पावसात तुमचा टेंट लागलेला असतो. तरीही पाण्याचा एकही थेंब या टेट मध्ये येत नाही. बाहेर थंड वारे घोंघावत असले तरी टेंट मध्ये मात्र उब असते. मध्यरात्री जेव्हा टेंट पडणा-या पावसाच्या थेंबांच्या आवाजाने तुम्हाला जाग येते तेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्यापासुन पाऊस फक्त एकच हाताच्या अंतरावर पडत असतो तरीही तो तुम्हाला स्पर्श करु शकत नाही. अशा या भन्नाट पावसाळी सहलीचा आनंद तुम्हाला घेता येईल फक्त निसर्गशाळेमध्येच.
मावळातील रानभाज्या – ओळख, गुणधर्म व पाककृती – हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
-
ताम्हिणी घाट – सदा सर्वदा सर्वांच्या आवडीचे मुळशी धरण परिसर
पुणेकरांचे सर्वात आवडते व लाडके पावसाळी डेस्टीनेशन म्हणजे मुळशी. मुळशी , ताम्हिणी घाट जरी सर्वांचे आकर्षण असले तरी या एक दिवसीय पावसाळी सहलीनंतर येणारा मनस्ताप व ट्राफिक जाम मध्ये तासनतास कंटाळवाण वाट बघण, पर्यटकांना नकोस वाटत. या ट्राफिक जाम मुळे फक्त पर्यटकांनाच त्रास होत नाही तर स्थानिकांना देखील खुप त्रासाला सामोरे जावे लागते. याला काही पर्याय आहे. असे काही करता येईल का की जेणेकरुन या ट्राफिकच्या समस्येचा त्रास थोडा का होईना कमी करता येईल? होय या ट्राफिक जाम च्या समस्येवर उपाय आहे. तो म्हणजे गुगल मॅप्सच्या मदतीने पर्यायी रस्ते शोधुन त्या पर्यायी रस्त्यांनी प्रवास करणे. कोणते आहेत हे पर्यायी रस्ते. चला तर मग आपण पाहुयात. मुळशीला जाताना फारसे ट्राफीक जाम नसते. मुख्य अडचण होते ती माघारी शहरात येताना. तर शहरात येताना तीन/चार मुख्य ठिकाणी खुप मोठे जाम होत असतात. हे जाम आपण टाळु शकतो.
पहिला आहे, पौड गाव. या गावचा ट्राफिक जाम टाळण्यासाठी, मुळशी वरुन माघारी येताना, माले गावापासुन पौड ला न येता, संभवे गावास जावे. संभवे गावातुन सरळ भादस, शिळेश्वर, आसदे,खुबवली, रावडे अशी गावे करीत पौड कोळवण रोड ला यावे. पौड कोळवण रोडला लागल्यावर पौड कडे वळुन, अगदी एक दोन किमी अंतरावरुन लगेच दारवली, आंबडवेट गावाकडे , डावीकडे वळावे. या रस्त्याने सरळ गेलात तर तुम्हाला भरे फाटा लागेल, तेथुन तुम्ही डावीकडे वळा व पुढे हिंजवडी किंवा सुस मार्गे पुणे गाठा. हा रस्ता सुरुवातीपासुन संभवे पासुन काही ठिकाणी खराब जरी असला तरी तुमचे ट्राफीक मधील किमान तीन तास वाचवु शकतो. या पर्यायी रस्त्याने तुम्ही पौड, घोटावडे फाटा, पिरंगुट, भुगाव, चांदणी चौक या सगळ्या ठिकाणचे ट्राफिक टाळु शकता. ट्राफिक टाळल्यामुळे नक्कीच तुम्ही केलेल्या पावसाळी सहलीच्या आनंदात विरजन पडणार नाही. आता आपण पाहु मुळशीमध्ये काय काय पाहता येऊ शकते ते. पळसे धबधबा, कुंडलिका दरी, इंडीपेंडन्स पॉईंट, तेलबैल, घनगड, मुळेश्वर म्हणजे मुळा नदीचे उगम स्थान. इत्यादी. ही सगळी स्थाने पाहताना लक्षात ठेवा माघारी येतानाचा तुमचा रस्ता संभवे-आसदे मार्गे असावा. मुळशीला जसे खरेखुरे निसर्गप्रेमी येतात तसे काही नाठाळ, असामाजिक, दारुडे, दंगाखोर लोक येत असतात. यांना आपण खरोखर आळा घालु शकत जरी नसलो तरी, त्यांच्या पासुन सावध राहणे देखील गरजेचे आहे. म्हणुन मुळशीला फिरायला येताना तुमच्या मोबाईल मध्ये पौड पोलीस चौकीचा मोबाईल नंबर आधीच सेव्ह करुन ठेवा. फोन नंबर आहे ०२०-२२९४३३३१. अथवा ठाणे अंमलदारांचा हा मोबाईल नंबर – 9850087499 देखील संग्रही ठेवा. तुम्हाला जर मुळशी परिसरामध्ये असे मद्यपी लोक दंगा आरडा ओरडा करताना दिसले तर लागलीच पोलीसांना कळवा. पोलीस तुमचे नाव उघड करणार नाहीत.
मुळशीतील नितांत सुंदर पर्यटन स्थळांव विषयी नेमही अपडेट राहण्यासाठी खालील पेज लाईक करा

अंधारबन व कुंडलिका सुळले, मुळशी
-
खंडाळा घाट – लोणावळा
नुकताच मी व्हॉट्सॲप वर एक व्हिडीयो पाहिला. भुशी डॅम रोडवर माणसांचा जाम असलेला तो व्हिडीयो पाहुन तुम्ही लोणावळ्याला पावसाळ्यात जाणारच नाही. मुंगीसारखी माणसे त्यात दिसताहेत. ही माणसे म्हणजे पुण्यामुंबईचे पर्यटक होय. काय लोणावळ्यामध्ये किंवा आसपासच्या परीसरात फक्त भुशी डॅम हे एकच पर्यटक आकर्षण आहे का? तर नाही.

सह्याद्रीचे अनुपम सौंदर्य
लोणावळा परीसरामध्ये एकापेक्षा भारी सरस दुसरं अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. काही अशी, खंडाळा घाट, भाजे लेणी, कार्ला लेणी, कोराईगड, तेलबैल, टाटा धरण, ड्युक्स नोज, राजमाची, लोहगड, विसापुर किला, बेडसे लेणी. अशा अनेक ठिकाणी आपण जाऊ शकता. लोणावळ्याला जाताना खरी मजा येते ती लोकल ट्रेन ने प्रवास करण्यात. लोणावळा पोलीस चौकीचा नंबर (०२११४२७३०३६) देखील सेव्ह करुन ठेवा जेणे करुन आपात समयी तुम्हाला वापरता येईल.
-
माळशेज घाट
माळशेज घाटातुन पावसाळ्यात गाडी चालवण्याची मज्जाच न्यारी. पण इथली अडचण वेगळीच आहे. रस्ते अरुंद आणि वाहनांची तुफान गर्दी. कित्येकदा पोलीस नाईलाजास्तव माळशेज घाट वाहतुकीसाठी बंदच करतात. त्यामुळे तुम्ही जर माळशेज घाटात फिरस्ती करण्याचा बेत आखत असाल तर आधी रस्ता वाहतुकी साठी खुला आहे की नाही याची चौकशी करा.
हा घाट साधारण १३० किमी अंतरावर आहे पुण्यापासुन. आळेफाटा सोडला की मग वाहनांची गर्दी सुरु होत असते. या घाटामध्ये एक ठिकाण असे आहे की तिथे उभे राहुन आपण जर हरिश्चंद्र गडाकडे तोंड केले तर, आपणास अनेक ठिकाणी एक उलटा धबधबा देखील दिसतो. उलटा म्हणजे वा-यामुळे जमीनीवर पडण्याऐवजी धबधब्याचे पाणी पुन्हा आकाशात उडताना दिसते. अतिशय दुर्मिळ आणि सुंदर असा देखावा दिसण्यासाठी नशीबाची साथ हवी असते.
माळशेज घाट परिसरामध्ये सह्याद्री जितका सुंदर आहे तितकेच मनमोहक या भागातील भव्य असे किल्ले देखील आहेत. सह्याद्रेतील स्वर्ग म्हणविला जाणारा हरिश्चंद्रगड याच परिसरामध्ये आहे. माळशेज घाटामधुन, आभाळ स्वच्छ असताना हरिश्चंद्र गड दिसतो. ट्रेकर्स, हाईकर्स साठी हा परिसर अनमोल असा ठेवा आहे.
माळशेज घाटाला जाताना किंवा येताना जर तुम्ही ओतुर मार्गे येणार असाल तर, ओतुर मधील कपर्दिकेश्वर मंदिर अवश्य पहा.
आळेफाटा पोलीस स्टेशन – ०२१३२-२६३०३३
-
वरंधा घाट
या पाच रत्नांच्या मालेमध्ये, शेवटचे पण तरीही मन मोहवण्याच्या बाबतीत इतर कोणत्याही घाटाला मागे टाकेल इतके हे रत्न सुंदर आहे. साधारण माळशेज घाटाइतक्याच अंतरावर असलेल्या या घाटाचे वैशिष्ट्ये म्हणजे घाटवाटेवरुन दिसणारा नवरा नवरीचा डोंगर. रस्त्यावर सर्रास तुमच्या अगदी जवळ येणारी माकडे, रस्त्यावर पडणारे धबधबे आणि सह्याद्रीचे आल्हाददायी रुप. या घाटामध्ये इतर घाटांइतकी गर्दी जरी नसली तरी अवजड वाहनांची वाहतुक नेहमीच असते. पुण्याकडुन पुणे बेंगलोर हाय वे ने भोर ला पोहोचुन पुढे महाड कडे जाताना वरंध घाट लागतो. या घाटातील प्रवास थरारक तर आहेच पण त्याहीपेक्षा जास्त तो मन प्रसन्न करणारा आहे. घाटातुन कोकणात उतरुन तुम्ही शिवथर घळ पाहु शकता. शिवथर घळ एका धबधब्याच्या मागे डोंगरात असलेली नैसर्गिक गुहा आहे ज्यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी दासबोध याच घळी मध्ये बसुन लिहिला. या घळीअध्ये समर्थांचे वास्तव्य दहा पेक्षा जास्त वर्षे होते.
या लेखामध्ये एक दिवसीय सहलीविषयी माहिती आहे. तुमच्याकडे जर वरील पैकी एखाद्या ठिकाणाविषयी जास्त व उपयोगाची माहीती असेल तर अवश्य कळवा. या लेखामध्ये, तुमच्या नावासहीत ती माहिती प्रकाशित केली जाईल.
लेख आवडला असेल शेयर करा. आनंदी आणि सुरक्षित सहलीसाठी शुभेच्छा
हेमंत सिताराम ववले
निसर्गशाळा, पुणे
९०४९००२०५३
नेहमीप्रमाणेच सुंदर लेखन , लेख वाचून सह्याद्रीत भटकंतीची इच्छा अधिक तीव्र होते
धन्यवाद मिलिंद सर